नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील काही वकिलांना विविध उच्च न्यायालयांचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती देण्याचा आपण गंभीरपणे विचार करत आहोत, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटले आहे. सुप्रिम कोर्ट बार असोसिएशन''ने आयोजित केलेल्या सत्कार कार्यक्रमात सरन्यायाधीश बोलत होते. सर्वोच्च न्यायालयातील वकिलांना उच्च न्यायालयांमध्ये पदोन्नती देण्याची मागणी बार असोसिएशनने केली.
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मंजूर केलेल्या किमान १२ न्यायाधीशांच्या यादीला केंद्र सरकारकडून अजूनही मंजुरी मिळालेली नसल्याच्या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीशांचे ताजे वक्तव्य लक्षणीय मानले जाते. सध्या केवळ उच्च न्यायालयांमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांनाच संबंधित उच्च न्यायालयात पदोन्नती दिली जाते, अशी परंपरा आहे. याबाबत एक नवीन आणि आगळीवेगळी परंपरा सुरू करण्याचा वर्तमान सरन्यायाधीशांचा मनोदय असल्याचे यातून दिसून येते.
प्रस्तावित न्यायाधीशांच्या नियुक्त्यांबाबत आपण संबंधित उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांना कल्पना देऊ आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या पदोन्नतीच्या संधीशी तडजोड होणार नाही, याचीही आपण खात्री करून घेऊ असेही सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, की ‘उच्च न्यायालयातील काही न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली करणाऱ्यांना न्यायाधीश म्हणून नियुक्ती करता येईल त्यांच्या नावांची यादी तयार आहे. मी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांशी चर्चा केल्यावर ती प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करेन.‘‘
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.