नवी दिल्ली : देशात ओमिक्रॉनच्या (Omicron) रुग्णांची संख्या वाढत असल्याने उत्तर प्रदेशमधील निवडणूक प्रचारावर बंदी घालावी आणि निवडणूक तूर्त स्थगित ठेवावी, या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आवाहनाला मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी प्रतिसाद दिला. पुढील आठवड्यात ‘यूपी’चा दौरा करून तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य निर्णय घेऊ, असे त्यांनी शुक्रवारी सांगितले. (UP Election 2022)
उत्तराखंडमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. तेथील निवडणुकीच्या तयारीची पाहणी करण्यासाठी चंद्रा यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाचे पथक आज डेहराडूनला आले होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. कोरोनाची तिसरी लाट आणि ओमिक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता निवडणूक प्रचारावर बंदी घालण्याचा आणि निवडणूक पुढे ढकलण्याचा विचार करावा, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने केंद्र सरकार व केंद्रीय निवडणूक आयोगाला काल सुचविले होते.
उत्तराखंडच्या निवडणुकीची तयारी
चंद्रा म्हणाले की, उत्तराखंड सरकारचा कार्यकाळ २५ मार्च २०२२ रोजी पूर्ण होत आहे. राज्यात निष्पक्ष आणि खुल्या वातावरणात निवडणूक घेण्यासाठी आयोग तयार आहे. कोरोनाचा धोका कायम असल्याने उत्तराखंडमध्ये मतदान केंद्रांतील मतदारांची संख्या यावेळी कमी करण्यात आली आहे. आधी एका केंद्रात पंधराशे मतदार होते. आता ही संख्या बाराशे केली आहे. राज्यात ६२३ नवी मतदान केंद्रे तयार केली असून एकूण संख्या ११ हजार ६४७ आहे.
उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी...
- मतदानासाठी एक तासाची वाढीव मुदत
- मतदानाची वेळ सकाळी आठ ते सायंकाळी सहापर्यंत
- दिव्यांग मतदारांसाठी विशेष पाच केंद्रे
- अशा केंद्रावर दिव्यांगांना मदतीसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती
- संपूर्णपणे महिला कर्मचारी असलेले १०० महिला मतदान केंद्रे उभारणार
- मतदान केंद्रावर येऊ शकत नसलेल्या ८० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांना मतदान करता यावे म्हणून निवडणूक आयोग त्यांच्या घरी जाणार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.