Chennai News : सुंदरराजन यांचा अवमान; कनिमोळींना पदोन्नती

लोकसभा निवडणुकीनंतर तमिळनाडूत दोन महिला नेत्या चर्चेत.
dr tamil sai soundararajan and kanimozhi
dr tamil sai soundararajan and kanimozhisakal
Updated on

चेन्नई - तमिळनाडूमधील दोन महिला राजकीय नेत्या गेल्या आठवड्यात चर्चेत होत्या. त्यापैकी एक तेलंगणच्या माजी राज्यपाल आणि भाजपच्या नेत्या डॉ. तमिळसाई सुंदरराजन तर दुसऱ्या द्रमुकच्या वरिष्ठ नेत्या कनिमोळी. सुंदरराजन यांच्या अवमानाचा निषेध होत असून द्रमुकमध्ये महत्त्वाच्या स्थानी नियुक्ती झाल्याने कनिमोळी चर्चेत होत्या.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या शपथविधीवेळी व्यासपीठावर बसलेले केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा हे सुंदरराजन यांच्याशी संभाषण करीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यातून अमित शहा यांनी माजी राज्यपालांची कानउघडणी केल्याची चर्चा सुरू झाली होती.

सुंदरराजन यांना त्यावर खुलासा करावा लागला होता. शहा यांच्याबरोबर झालेल्या संभाषणाबद्दल गैरसमज निर्माण झाले असून शहा यांनी राजकारण आणि मतदारसंघात चांगले काम करण्याचा सल्ला मला दिला, असा दावा सुंदरराजन यांनी नंतर केला.

सुंदरराजन यांनी द्रमुकच्या विद्यमान खासदार तमिझाची थंगपंडियान यांना चुरशीची लढत दिली होती. पण त्यांना हार पत्करावी लागली. राज्यपालपद गमावले आणि लोकसभेतही पराभव झाल्याने सुंदरराजन यांना दुहेरी फटका बसला. निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी भाजपचे तमिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांना लक्ष्य केले होते.

आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या शपथविधीवेळी मंचावर बसलेले माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांना नमस्कार करून जात असताना सुंदरराजन यांना परत बोलावून शहा यांच्याशी काही बोलले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. स्वतःच्या पराभवाला सुंदरराजन यांनी तमिळनाडूतील भाजपच्या नेत्याला जबाबदार धरल्याने शहा नाराज झाल्याची चर्चा नंतर सुरू झाली.

‘भाजपने अण्णाद्रमुकशी युती कायम ठेवली असती तर तमिळनाडूत त्यांच्या अजून काही जागी निवडून आल्या असत्या,’ असे विधान अण्णाद्रमुकचे नेते वलूमणी यांनी केले होते. त्याचे समर्थन सुंदरराजन यांनी केले होते. यावर शहा यांनी आक्षेप घेतला आहे, असे पक्षाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. शहा यांनी कानउघाडणी केल्याच्या चर्चेला उधाण आल्यानंतर सुंदरराजन यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट करीत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी म्हटले आहे, की मतदानानंतरची स्थिती आणि आव्हानांबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांनी (अमित शहा) मला बोलाविले होते. मी ते विस्ताराने सांगत होते. पण वेळेची मर्यादा असल्याने शहा यांनी राजकारण आणि मतदारसंघात चांगले काम करण्याचा सल्ला दिला. मला त्याने खूप धीर मिळाला.

तमिळनाडूत शहांबद्दल रोष

अमित शहा यांनी जाहीर कार्यक्रमात महिला नेत्याची कानउघडणी करणे हे तमिळनाडूच्या जनतेला रूचलेले नाही. विविध राजकीय पक्षांतील अनेक कार्यकर्ते, सामान्य नागरिकांना शहा यांची वर्तणूक बिलकूल आवडलेली नाही. एका तमीळ महिलेला अशा प्रकारे अपमान करून शहा यांनी संपूर्ण तमीळ जनतेचा अवमान केल्याची भावना व्यक्त होत आहे. तमिळसाई यांना काँग्रेसकडूनही अनपेक्षित समर्थन मिळाले आहे.

तमिळनाडू काँग्रेस समितीचे अध्यक्ष के. सेल्वापेरूंतगाई आणि माजी अध्यक्ष ई.व्ही.के.एस एलागोवन यांनी शहा यांच्या या कृतीचा निषेध केला आहे. ‘‘शहा यांनी योग्य केले नाही. सुंदरराजन यांच्याबद्दल नाराजी असेल तर ते त्यांना कार्यालयात बोलावू शकले असते किंवा फोनवर बोलू शकले असते. त्यांची बदनामी करून शहा यांनी सर्व तमीळ महिलांची बदनामी केली आहे,’’ असे एलानगोवन म्हणाले.

कनिमोळींवर महत्त्वाची जबाबदारी

सुंदरराजन यांच्या अपमानाची चर्चा राज्यात सुरू असताच सत्ताधारी द्रमुकने महिला नेत्याला दिलेली महत्त्वाची जबाबदारी राज्याच्या विकासाची महत्त्वपूर्ण मानली जात आहे. द्रमुकचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी त्यांची सावत्र बहीण कनिमोळी यांची द्रमुकच्या संसदीय नेतेपदी नियुक्ती करून धक्कादायक निर्णय घेतला आहे. कनिमोळी या सध्या पक्षाच्या उपसरचिटणीस आहेत.

द्रमुकचे खजिनदार आणि ज्येष्ठ नेते टी.आर.बालू यांच्या जागी कनिमोळी यांची नियुक्ती झाली आहे. पक्षाच्या संसदीय नेतेपदी पदोन्नती दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले आहेत. थोटुकुडी लोकसभा मतदारसंघातून त्या दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. त्या आता द्रमुकचा केंद्रातील चेहरा असणार आहेत. कनिमोळी यांनी भाजप तसेच अन्य पक्षांमधील राष्ट्रीय नेत्यांशी सौहार्दाचे संबंध स्थापन करून तमिळनाडूच्या मागण्यांचा पाठपुरावा करावा, अशी द्रमुकची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.