प्रसिद्ध टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा (Ratan Tata) यांच्या दानशूरपणाची आपल्याला वेळोवेळी प्रचिती येतच असते. त्यांच्या 'दिलदार'पणाचा अंदाज आपल्याला बऱ्याचवेळा सोशल मीडियावर पहायला मिळतो. आपल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत देखील टाटा खूपच सवेदनशील आहेत, तर कोरोनाकाळात टाटांनी आपल्या दानशूर वृत्तीची बऱ्याच वेळा प्रचिती करुन दिलीय. त्यामुळे 'माणूस' असावा तर 'रतन टाटां'सारखा अशी क्रेझ समाज माध्यमांवर दिसतेय. मध्यंतरी टाटांना राष्ट्रपती करण्याची मागणी देखील नेटिझन्सकडून केली जात होती. आता त्याच समूहाच्या टाटा मोटर्सने (Tata Motors) एक मोठी घोषणा केली असून ऑलिम्पिकमध्ये पदक न मिळलेल्या खेळाडूंना आता महागडी अल्ट्रोज गाडी (Altroz Car) भेट देणार असल्याचे कंपनीने एका पत्रकात नुकतेच जाहीर केलेय.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये जबरदस्त कामगिरी केल्यानंतर भारतीय खेळाडू नुकतेच मायदेशी परतले आहेत.
नुकत्याच झालेल्या टोकियो आलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भारताची सुरुवात रौप्य पदकाने झाली, तर शेवट सुवर्ण पदकाने झाला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने एकूण सात पदकं जिंकली. यात एक सुवर्ण, दोन रौप्य, चार कांस्य पदकांची कमाई केलीय. भारताची ऑलिम्पिकमधली आजवरची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. याआधी लंडन ऑलिम्पिक 2012 मध्ये भारताने 6 पदकं जिंकली होती. यात दोन रौप्य आणि चार कांस्य पदकांचा समावेश होता. मात्र, या ऑलिम्पिकमध्ये आपल्या काही खेळाडूंना निराशजनक कामगिरीमुळे पदकाला मुकावे लागले, तर काहींना फायनलपर्यंत मजल मारुनही अपयश पत्करावे लागलेय.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये जबरदस्त कामगिरी केल्यानंतर भारतीय खेळाडू नुकतेच मायदेशी परतलेत. यावेळी भारतात या विजेत्या खेळाडूंचे जंगी स्वागत देखील करण्यात आले, तर पदक विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव देखील होताना दिसतोय. बक्षिसांच्याबाबतीत उद्योगपती रतन टाटा मागे राहतील तर नवलच! टाटा यांच्या मालकीच्या टाटा मोटर्सने एक मोठी घोषणा केली असून ही घोषणा पदक विजेत्यांसाठी नसून थोड्यात पदक हुकलेल्यांसाठी म्हणजेच, टोक्यो ऑलिम्पिकमध्ये वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या खेळाडूंसाठी आहे. टाटा मोटर्स टोक्यो ऑलिम्पिकमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या, पण थोडक्यात पदक हुकलेल्यांना 'अल्ट्रोज' ही महागडी गाडी भेट देणार आहे. या खेळाडूंच्या कामगिरीने तरुण खेळाडूंना प्रेरणा मिळाली असल्याने त्यांच्या सन्मार्थ आम्ही ही भेट देत असल्याचे कंपनीने एका पत्रकाव्दारे जाहीर केलेय.
टाटा समूहाबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात अपार आपुलकी आहे, ती त्यांच्या या देशप्रेम आणि दानशूरपणामुळेच. भारतामध्ये स्वत:ला घडवलेल्या आणि मेहनतीने स्वत:ला सिद्ध करणाऱ्या खेळाडूंना धन्यवाद देण्यासाठी आम्ही हे करत असल्याचेही कंपनीने म्हटलेय. कंपनीच्या पॅसेंजर उद्योग विभागाचे प्रमुख शैलेश चंद्रा यांनी सांगितले, की भारतानं टोकियो आलिम्पिकमध्ये जबदरस्त कामगिरी केलीय. त्यांच्या याच महत्वपूर्ण कामगिरीमुळे देशातील नव तरुणांना प्रेरणा मिळालीय. त्यामुळे आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्यांचा सन्मान करताना आम्हाला देखील खूपच आनंद होत आहे. एवढ्या दबावाखाली खेळताना या खेळाडूंनी आपलं दाखवलेलं कौशल्य नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी आहे, त्यामुळे आम्ही या खेळाडूंना आमची सर्वात प्रिमियम हॅचबॅक कार अल्ट्रोज गाडी भेट देणार आहोत. ही गाडी हाय स्ट्रीट गोल्ड रंगातील असून लवकरच ती खेळाडूंना भेट दिली जाईल, असंही कंपनीनं स्पष्ट केलंय.
टाटाने अद्याप किती खेळाडूंना गाड्या देणार याची यादी जाहीर केली नसली, तरी किमान 20 खेळाडूंना या गाड्या दिल्या जाऊ शकतात. यात गोल्फर अदिती अशोक, कुस्तीपटू दीपक पुनिया व भारतीय महिला हॉकी संघाचा समावेश असेल. अल्ट्रोज गाडीची किंमत सहा लाखांपासून साडेनऊ लाखांपर्यंत आहे. तर टाटा मोटर्सच्या अल्ट्रोजने सुरक्षा, डिझाइन आणि कामगिरीमध्ये देखील गोल्डन दर्जा मिळवला आहे. त्यामुळे ही दर्जेदार कार खेळाडूंसाठी खूपच सुंदर भेट असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.