Cyclone Tauktae: वादळाचे राज्यात ६ बळी; ९ जखमी

आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मुख्यमंत्री ठाकरेंनी घेतली नुकसानीचा आढावा
Cyclone Tauktae: वादळाचे राज्यात ६ बळी; ९ जखमी
Summary

आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मुख्यमंत्री ठाकरेंनी घेतली नुकसानीचा आढावा

Tauktae Cyclone Updates : केरळ, कर्नाटकपाठोपाठ तौत्के चक्रीवादळाचा तडाखा महाराष्ट्र, गोवा या राज्यांना बसला. अरबी समुद्रात निर्माण झालेले तौत्के चक्रीवादळाने भीषण रुप धारण केले. हे वादळ गुजरातच्या दिशेने जात आहे. रविवारी रात्री नऊ वाजल्यापासूनच या चक्रीवादळाचा परिणाम मुंबईत जाणवू लागला. वादळ पुढे सरकेल तसेतसे मुंबईतील वाऱ्याचा वेग कमी होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (tauktae cyclone live updates Mumbai Kokan Maharashtra Gujarat IMD)

राज्यात ६ बळी, ९ जखमी; नुकसानीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

तौक्ते चक्रीवादळाचा धोका कमी झाला असला तरी जिल्ह्यांनी मदत कार्य वेगाने सुरु ठेवावे आणि परिस्थिती पूर्वपदावर आणावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. चक्रीवादळाचा प्रवास गुजरातकडे होत असला तरी कोकणातील मुसळधार पाउस व जोरदार वारे पाहता सावधगिरी बाळगण्याच्या आणि यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी झाले आहेत. एकूण १२ हजार ५०० जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. किनाऱ्यावरील जिल्ह्यांमध्ये काही नुकसान व पडझड झाली असली तरी कोविड रुग्णालयांना वीज पुरवठा खंडित होऊ देण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे पुरवठ्याची पर्यायी व्यवस्था सक्षमपणे सुरु आहे, याबद्दलची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली.

चक्रीवादळामुळे मुंबई विमानतळ सकाळी 11 पासून बंद आहे. सकाळी सुरुवातीला 3 तासासाठी विमानतळ बंद करण्यात आलं होतं. त्यानंतर दिवसभरात तीन वेळा दोन-दोन तासांसाठी बंदचा कालावधी वाढविण्यात आला असून आता रात्री 8 वाजेपर्यंत विमानतळ बंद राहणार असल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले आहे.

देशात चक्रीवादळ तौक्तेमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी नागरी प्रशासनाला लष्करानं पुरविलेल्या मदतीचा आढावा घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक बैठक घेतली.

दिलीप गुप्ते मार्ग माहीम सरस्वती लाडू डेपोकडे गाडीवर झाड कोसळून अपघात झाला. सुदैवाने गाडी चालकाला काही दुखापत झाली नाही.

फळबागांचं नुकसान, पंचनामे करुन नियमानुसार मदत देणार

तौक्ते चक्रीवादळामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांत मोठे नुकसान झाले आहे. यापासून फळबागांही वाचलेल्या नाहीत, त्यामुळे प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले असून नियमानुसार मदत केली जाईल. तसेच अतिरिक्त मदत देण्याबाबतही विचार करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. कोकणात वीज पुरवठा खंडीत झाला आहे. काही बोटींवरील नाविक बेपत्ता आहेत. त्यांचा तपास सुरू आहे. पीककर्ज तीन लाखापर्यंत शून्य टक्के व्याजाने देणार असून पीककर्जात कुणीही अडथळा आणू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारला खतांचे दर कमी करण्याबाबत विनंती केली आहे, पण खतांचे दर कमी झाले नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फ आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

श्रीवर्धनमधील आंबा बागायतदारांचं नुकसान

श्रीवर्धन परिसरातील आंबा बागायतदारांचं तौक्ते चक्रीवादळानं नुकसान केलं आहे. झाडावरील आंबा खराब झाला आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. गेल्यावर्षीही निसर्ग चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. यंदा तौक्ते चक्रीवादळानं पुन्हा शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागत आहे. शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे.

  • समुद्र खवळला; मरीन ड्राईव्हवर मोठमोठ्या लाटा

  • हिरण्यकेशीने ओलांडली धोक्याची पातळी

    आजरा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे हिरण्यकेशी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. मे महिन्यातच अतिवृष्टी झाल्याने आजरा तालुक्यातील नागरिक हैराण झाले आहेत. किटवडे आणि घाटकरवाडी भागात २८० मिमी पाऊस होण्याची ही पहिलीच वेळ आहे. हिरण्यकेशी नदीवरील बंधाऱ्यांची दारे न उघडल्याने नदीने प्रवाह बदलला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

  • रत्नागिरीत विक्रमी पाऊस

    दुसरीकडे रत्नागिरीमध्येही विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. वादळी वारे आणि त्याच्यासोबतीला आलेल्या पावसाने किनारी भागातील नागिरकांना रात्रभर झोप आली नाही. गेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी १३२ मिमी तर रत्नागिरी तालुक्यात २७४ मिमी म्हणजे ११ इंच इतकी मे महिन्यातील विक्रमी पावसाची नोंद झाली.

    सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

  • रायगडमध्ये एकाचा मृत्यू; ८३८३ नागरिकांचे स्थलांतर

    तौत्के चक्रीवादळाने (tauktae cyclone) रायगड जिल्ह्यातील (Raigad district) १ हजार १०४ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे, तर एका घराचे पूर्णतः नुकसान झाले आहे. एका व्यक्तीचा मृत्यू आणि दोन व्यक्ती जखमी झाल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण २ हजार २९९ कुटुंबांचे मिळून एकूण ८ हजार ३८३ व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. अद्यापही काही दुर्गम भागातील गावांशी संपर्क झालेला नाही. सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

  • पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी तौक्ते चक्रीवादळाबाबत चर्चा केली. आणि महाराष्ट्रातील परिस्थितीबाबत माहिती घेतली. पंतप्रधानांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेणार आहेत.

  • रायगड जिल्ह्यात RED ALERT! १२ हजार ४२० जणांचे स्थलांतर

    महाराष्ट्रात किनारपट्टीलगतच्या परिसरात राहणाऱ्या एकूण १२ हजार ४२० लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर या तीन जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर रायगज जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

  • वादळी वारे वाहत असताना प्रवास टाळा

  • महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून उत्तरेकडे प्रवास करण्यास तौक्ते चक्रीवादळाने सुरवात केली आहे, मात्र त्याची तीव्रताही वाढली आहे. अत्यंत तीव्र चक्रीवादळात त्याचे रुपांतर झाले आहे. चक्रीवादळाच्या केंद्राभोवती असलेल्या वाऱ्याचा वेग ताशी १८० ते १९० पर्यंत पोहोचला असून काही वेळा ताशी २०० किमी वेग गाठत आहे. चक्रीवादळाचे केंद्र वसईपासून पश्चिमेला जवळपास २०० किमी अंतरावर आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत गुजरात किनारपट्टीजवळ वादळ पोहोचण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

  • चक्रीवादळ गुजरातकडे सरकले असले तरी महाराष्ट्रातील मुंबई, पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांवर वादळी वाऱ्यांचा प्रभाव राहणार आहे. तसेच रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा आणि घाट परिसरातही जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे वारे वाहत असताना प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, सातारा, नाशिक आणि घाट क्षेत्रात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असे हवामान खात्याने सांगितले आहे.

  • मुंबईतील रस्त्यांवर पाणीच पाणी

  • मुंबई विमानतळावरील कामकाज ४ वाजेपर्यंत ठप्प

    मुंबई विमानतळावरील सर्व ऑपरेशन्स दुपारी ४ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने (MIAL) ने घेतला आहे. त्यामुळे चार वाजेपर्यंतची सर्व उड्डाणे आणि लँडिंग बंद राहणार आहेत. तसेच मुंबईला येणारी तीन विमाने सूरत, लखनऊ आणि हैदराबादकडे वळविण्यात आली आहेत.

  • डोक्यात विजेचा खांब पडून तरुणाचा मृत्यू

    रविवारी रात्री सुटलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे पामबीच (Palm Beach Road) मार्गावरील सानपाडा (Sanpada) येथे विजेचा खांब स्कुटीवर पडल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा सहकारी जखमी झाल्याची घटना घडली.

    सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

  • नौदल सज्ज

    चक्रीवादळामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरी प्रशासनाला मदत करण्यासाठी नौदलाची बचाव पथके आणि हेलिकॉप्टर सज्ज ठेवण्यात आली आहेत. अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे आज महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडत आहे, तसेच तुफानी वारे वाहत आहेत. त्या परिस्थितीत कोणताही अनुचित प्रसंग उद्भवल्यास स्थानिक प्रशासनाला मदत करण्यासाठी मुंबईत कुलाबा, वरळी, घाटकोपर, मानखुर्द, मालाड येथे नौदलाची पूरपरिस्थितीसाठीची बचाव आणि मदत पथके सज्ज आहेत. गेल्या २४ तासात कल्याण-डोंबिवली परिसरात २२ वृक्ष उन्मळून पडले, अशी माहिती कल्याण-डोंबिवली अग्निशमन विभागाने दिली आहे.

  • देवगड तालुक्यात दोन बोटी बुडाल्या; खलाशाचा मृत्यू तर दोनजण बेपत्ता

    तौक्ते चक्रीवादळाच्या (Tauktae Cyclone) फटक्यामुळे देवगड (Devgad) तालुक्यातील आनंदवाडी बंदर (Anandwadi port) येथे नांगरून ठेवलेल्या दोन बोटी बुडाल्या. या दुर्घटनेमध्ये एका खलाशाचा मृत्यू झाला असून दोघेजण बेपत्ता आहेत.

    सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

  • तौक्तेचा मोर्चा गुजरातकडे

    तौक्तेने आपल्या मोर्चा गुजरातकडे वळवण्यास सुरवात केली आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत गुजरातच्या सागरी किनारपट्टीपर्यंत पोहोचेल. भावनगर जिल्ह्यातील पोरबंदर आणि महुवा या शहरांना रात्री ८ ते ११ च्या दरम्यान चक्रीवादळ धडक देईल. यावेळी वाऱ्याचा वेग १५५-१६५ किमी प्रतितास ते १८५ किमी प्रतितास असेल, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने (IMD) दिली आहे.

    दुसरीकडे सौराष्ट्र, गिर सोमनाथ, अमरेली, भावनगर, जुनागढ, बोटड आणि दीव या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच वलसाड, नवसारी आणि दमण, दादरा नगर हवेलीमध्ये पावसाच्या सरी बरसतील, असा इशारा आयएमडीने दिला आहे.

  • गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची शहांशी चर्चा

    तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसाबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांशी बोललो. चक्रीवादळामुळे झालेल्या व्यापक नुकसानीची माहिती त्यांना दिली असून परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी सर्व केंद्रीय एजन्सींकडून सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन गृहमंत्रालयातर्फे देण्यात आली आहे, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

  • लाटा पाहायला जाऊ नका; प्रशासनाकडून आवाहन

    प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या सूचनेनुसार सोमवारी (ता.१७) ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला. मालवण ते वसई या समुद्र किनाऱ्यावर ३.३ मीटर ते ६.२ मीटर उंचीच्या लाटा रात्री ११.३० वाजेपर्यंत उसळणार आहेत. वेंगुर्ले ते वास्को या किनारपट्टीवर लाटांची उंची ३.२ मीटर ते ६.० मीटर इतकी असणार आहे. त्यामुळे या काळात नागरिकांनी तसेच मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये. समुद्राच्या जवळ लाटा पाहण्यासाठी उभे राहू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

  • मध्य रेल्वे धीम्या मार्गावरील वाहतूक पूर्ववत

    मध्य रेल्वेच्या घाटकोपर विक्रोळी दरम्यान सकाळी ९ वाजून १० मिनिटाच्या सुमारास झाडाची फांदी कोसळून लोकल सेवा बाधित झाली होती. धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावरून वळवण्यात आली होती. आता हे पडलेलं झाड तिथून हटवण्यात आलं आहे. त्यामुळे ११:१० वाजता मार्ग पूर्ववत सुरू झाला आहे.

मुख्यमंत्री ठाकरेंची मुख्य सचिवांशी चर्चा; किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांचा घेतला आढावा

  • तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव, तसेच मदत व पुनर्वसन सचिवांकडून सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील १२ हजार ४२० नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

  • मुंबईत सुरू असलेल्या मोनोरेलचे कामकाज थांबविण्यात आले आहे. मोनोरेलचे काम करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेच्या हेतूने हा निर्णय घेतला गेला असल्याचे सांगितले जात आहे.

  • दादर हिंदमाता परिसरात पाणी भरलं आहे, त्यामुळे वाहतूक मंदावली आहे. नागरिक पाण्यातून वाट काढत जात आहेत. त्यामुळे तेथील वाहतूक वळवण्यात आलीय.

  • चक्रीवादळाचा फटका सध्या मुंबईतील समुद्र किनारी राहणाऱ्या रहिवाशांना बसलाय. वरळी कोळीवाड्यातील अनेक रहिवासी गल्ल्यांमध्ये पाणी शिरले आहे. तर काहींच्या मोरीतून पाणी घरात येत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

  • उपमुख्यमंत्र्यांनी घेतला 'तौक्ते'चा आढावा

    राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (ता.१७) सकाळी मंत्रालयातील आपत्कालीन व्यवस्थापन व नियंत्रण कक्षास भेट दिली. यावेळी राज्यातील चक्रीवादळाच्या परिस्थितीचा, बचाव व मदतकार्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी तसेच मुंबई महापालिका आयुक्तांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून चर्चा केली. तसेच बचाव व मदतकार्यासाठी पूर्वतयारीची माहिती घेतली.

  • साताऱ्यात संततधार, महाबळेश्वरमध्ये जोरदार पाऊस

    सातारा शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात साेमवारी (ता.१७) सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. सकाळी आठ वाजता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार महाबळेश्वर, तापाेळा भागात जोरदार पाऊस झाला असून जिल्ह्यातील विशेषतः कराड, पाटण तालुक्यातील ग्रामीण भागात घरांची पडझड झाली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

  • मुंबई विमानतळावरील कामकाज बंद राहणार

    'तौत्के' चक्रीवादळामुळे मुंबई विमानतळावरील सर्व ऑपरेशन्स सोमवारी (ता.१७) सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने (MIAL) ने घेतला आहे.

  • रायगडमधील ७ हजार ८६६ जणांचे स्थलांतर

    'तौक्ते' चक्रीवादळाचा फटका रायगड जिल्ह्यालाही बसला असून समुद्र किनारी भागात राहणाऱ्या ७ हजार ८६६ नागरिकांचे आतापर्यंत स्थलांतर करण्यात आले आहे, अशी माहिती रायगड जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. अलिबाग, मुरुड, माणगाव, महाड आणि श्रीवर्धनला सर्वात जास्त फटका बसला आहे. अलिबागमधील ६०५, मुरुड १०६७, माणगाव १३०९, महाड १०८०, श्रीवर्धन ११५८, म्हसळा ४९६, रोहा ५२३, सुधागड १६५, तळा १३५, पोलादपूर २९५, खालापूर १७६, कर्जत ४५, उरण ४५१, पनवेल १६८ आणि पेणमधील १९३ नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्यात आलं आहे.

  • सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस

    अरबी समुद्रावर घोंगावणार्‍या चक्रीवादळाने आपला मोर्चा गुजरातच्या दिशेने वळवला असला तरी सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचा कहर अजूनही सुरूच आहे. गेल्या चोवीस तासात किनारपट्टीसह काही तालुक्यांत सरासरी २०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरू असून सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

  • मुंबई ओलीचिंब

  • तौक्ते चक्रीवादळाचे केंद्र हे मुंबईपासून १७० किमी अंतरावर अरबी समुद्रात आहे. हे वादळ मुंबईला धडकणार नसले तरी त्याचा परिणाम मुंबईसह इतर भागात दिसण्यास सुरवात झाली आहे. नवी मुंबई, ठाणे, तसेच इतर शहरांमध्ये जोरदार वारे वाहू लागले आहे. काळे ढग जमा झाले असून काही भागात पावसाला सुरवात झाली आहे.

  • पुढील चार-पाच तास मुंबईत अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकणार असल्याने दुपारी दोननंतर परिस्थितीत बदल होतील. सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

  • मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीसह राज्याच्या किनारपट्टी भागात पुढील ६ तासांत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता मुंबईतील प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच पावसासह ७५ ते ८५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

  • मुंबईत चक्रीवादळामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाईट रविवारी (ता.१६) रात्रीपासून ३९ वाहतूक पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत.

  • तसेच मुंबईत रात्रीपासूनच पावसाला सुरवात झाली होती. त्यामुळे वांद्रे वरळी सिलिंक हा परिस्थितीनुसार बंद करण्याचाही निर्णय घेण्यात आलेला आहे.

  • चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ५८० कोरोना रुग्णांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्यात आलं आहे.

  • जोरदार वाऱ्यामुळे पोलिसांनी लावलेले रस्त्यावरील बॅरिकेड्स उडून पडले आहेत.

  • शिवाजी पार्क रस्त्यावर एक झाड पडल्यामुळे वरळीला जाणारा रस्ता बंद आहे. एकमार्गिका सुरू ठेवण्यात आली आहे.

  • समुद्रात उंच लाटा तर घाट भागात जोरदार पावसाची शक्यता

    तौक्ते चक्रीवादळाचे केंद्र मुंबईपासून सुमारे १५० किमी अंतरावर अरबी समुद्रात आहे. या वादळाच्या प्रभावामुळे गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात वादळी वारे आणि समुद्राच्या उंच लाटा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर आणि घाट क्षेत्रात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

    दुसरीकडे नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, काही ठिकाणी मोठ्या सरी बरसतील. त्यामुळे सोमवारी दिवसभर घाटातून प्रवास करणे टाळावे, किनारपट्टी भागात वादळी वाऱ्यांमुळे झाडे पडणे, विजेचे खांब कोसळणे, विजेच्या तारा, होर्डिंग्ज, कच्च्या भिंती पडणे, तसेच घरांवरील पत्रे उडून जाण्याच्या घटना घडू शकतील, त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी.

    नाशिकमधील अपडेट्स जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

  • रत्नागिरी, सिंधुदुर्गला मोठा तडाखा; अनेक गावांना फटका

    अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने रविवारी (ता.१६) रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना मोठा फटका बसला. चक्रीवादळाच्या प्रभावाने सोसाट्याच्या वाऱ्यांसह कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे किनारपट्टी भागात कोट्यवधींचे आर्थिक नुकसान झाले. मुंबईतही पाऊस कोसळत आहे. केरळ, कर्नाटक आणि गोव्यात अद्यापही पाऊस कोसळत आहे. या वादळाचे अतितीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले असून ते वादळ सोमवारी (ता. १७) संध्याकाळी गुजरातच्या किनाऱ्याला धडकण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.

    महाराष्ट्राच्या किनारपट्टीला समांतर जाणाऱ्या तौक्ते चक्रीवादळामुळे किनारपट्टीसह सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूरसह विदर्भातही पाऊस कोसळला. काल दुपारी चक्रीवादळाच्या गतीत बदल झाल्याने त्याचे अतितीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले. त्याचा फटका रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसला. काल रात्रीपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र जोरदार वारे आणि पाऊस झाला. दुपारी हे वादळ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्रातून रत्नागिरी जिल्ह्याकडे सरकले. जिल्ह्यात सुमारे ८० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. या काळात जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या सर्व खबरदारीमुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून किनारपट्टीवरच्या एकूण १३७ कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.

Cyclone Tauktae: वादळाचे राज्यात ६ बळी; ९ जखमी
Corona : ग्रामीण भागासाठी केंद्राची नवी नियमावली
  • भारतीय हवाई दलाची C-130J आणि An-32 ही दोन विमाने १६७ जवानांसह १६.६ टन आवश्यक साहित्य घेऊन कोलकात्याहून अहमदाबादकडे रवाना झाली आहेत, अशी माहिती एनडीआरएफने दिली आहे.

  • अतितीव्र चक्रीवादळात रुपांतर

    तौक्ते या चक्रीवादळाचे अतितीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले असून ते वेगाने गुजरातच्या दिशेने सरकत असल्याचे हवामान विभागाने रविवारी जाहीर केले. सोमवारी (ता. १७) संध्याकाळी ते गुजरातच्या किनाऱ्याला धडकण्याचा अंदाज असून १८ तारखेला सकाळी ते भावनगरच्या पुढे जाईल, असे सांगण्यात आले आहे. गुजरात तसेच, दीव-दमणसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. १८ मेपर्यंत चक्रीवादळातील वाऱ्यांचा वेग ताशी १५० ते १६० पर्यंत जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळून जाताना चक्रीवादळातील वाऱ्यांचा वेग ताशी ७०-८० किमी इतका आहे.

https://www.windy.com/?17.853,70.928,5

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()