झुनझुनू (राजस्थान) : जम्मू- काश्मीरच्या राज्यपालपदाची सूत्रे आपल्याकडे असताना कोणताही दहशतवादी श्रीनगरच्या ५० ते १०० किलोमीटरच्या परिसरामध्ये फिरकू शकला नाही पण आता मात्र परिस्थिती बदलली असून गरिबांना ठार मारले जात असल्याचे मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे.
मलिक यांच्याकडे ऑगस्ट २०१८ ते ऑक्टोबर २०१९ दरम्यान जम्मू- काश्मीरच्या राज्यपाल पदाची सूत्रे होती. या काळामध्येच केंद्र सरकारने या राज्याला वेगळा दर्जा देणारे ३७० वे कलम रद्दबातल ठरविले होते तसेच या भागाची दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागणी केली होती. मध्यंतरी मलिक हे काही काळ गोव्याचे देखील राज्यपाल होते. काश्मीरमधील हिंसाचाराबाबत त्यांनी नुकतेच उघडपणे भाष्य केले आहे.
प्रदेश भाजप आक्रमक
काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांनी चार परप्रांतीयांची हत्या केल्यानंतर खोऱ्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. जम्मू- काश्मीर भाजपचे अध्यक्ष रविंदर रैना यांनी या हिंसाचाराचा निषेध केला आहे. या हत्याप्रकरणात सहभागी असलेल्या एकाही दहशतवाद्याला सोडले जाणार नाही, या भागातील दहशतवादाचा पूर्णपणे सफाया करण्यात येईल असे त्यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये चार परप्रांतीय मजूर ठार झाले होते यात बिहारमधील तीन उत्तरप्रदेशातील एकाचा समावेश आहे. मागील २४ तासांमध्ये श्रीनगर, पुलवामा आणि कुलगाममध्ये विविध ठिकाणांवर दहशतवाद्यांनी हल्ले केले होते.
‘भाजप पुन्हा सत्तेवर येणार नाही’
कृ षी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या केंद्र सरकारने पूर्ण केल्या नाहीत तर हे सरकार पुन्हा सत्तेवर येऊ शकणार नाही, असा इशारा मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिला. शेतकरी आंदोलनाला मलिक यांनी समर्थन देत हे आंदोलन संपुष्टात कसे आणता येईल, याचा सल्लाही त्यांनी दिला.
झुणझुण येथे एका कार्यक्रमासाठी मलिक रविवारी आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की जर मोदी सरकारने किमान आधारभूत किमतीच्या (एमएसपी) हमीवर कायदा करायला हवा. ‘एमएसपी’वर कायदा झाल्यावर शेतकऱ्यांचे आंदोलन थांबेल आणि या प्रकरणात निश्चितपणे मार्ग काढता येईल. उत्तर प्रदेशात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक गावात भाजप नेते आज प्रवेश करू शकत नाहीत. मी मूळचा मेरठचा आहे. माझ्या भागात भाजपचा एकही नेता गावात फिरकू शकत नाही.
ते म्हणाले की, मी शेतकऱ्यांसोबत आहे आणि त्यासाठी पद सोडण्याची सध्या तरी काही गरज नाही, पण जर आवश्यकता भासली तर मी पदावरून पायउतार होईन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.