Kashmir Files: काश्मिरी विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात : उमर अब्दुल्ला

विविध भागांत शिक्षण घेणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांवर हल्ले होऊ शकतात अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
उमर अब्दुल्ला
उमर अब्दुल्ला Sakal
Updated on

श्रीनगर : ‘दि काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचा संदर्भ देत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि ‘नॅशनल कॉन्फरन्स’चे उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला यांनी या चित्रपटामुळे देशभर काश्मिरींबाबत द्वेषाची भावना निर्माण झाली असून विविध भागांत शिक्षण घेणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांवर हल्ले होऊ शकतात अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

कोणत्याही राज्यामध्ये काश्मिरी विद्यार्थ्यावर हल्ला झाला तर त्याची जबाबदारी ही केंद्र आणि संबंधित राज्य सरकारची असेल. काश्मिरी मुस्लिम हे इतरांच्या श्रद्धांचा आदर ठेवत नाहीत असे मत तयार केले जात आहे. याचा मोठा धोका बाहेरील राज्यांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आहे. आता सध्या वयाची विशी गाठलेले हे विद्यार्थी १९९० मध्ये जन्मले देखील नव्हते. आता याच विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला आहे असे त्यांनी नमूद केले.

‘‘दि काश्मीर फाईल्स या चित्रपटाचे कथानक कपोलकल्पित असून अनेक खोट्या गोष्टी त्यात मांडण्यात आल्या आहेत. जेव्हा हे सगळे घटले १९९० च्या सालामध्ये राज्यात ‘नॅशनल कॉन्फरन्स’चे सरकार नव्हते. राज्यात राज्यपालांची राजवट होती तर केंद्रामध्ये व्ही.पी. सिंह यांचे सरकार सत्तेत होते.’’ असे त्यांनी नमूद केले. ‘‘ मुळात ही कलाकृती डॉक्युमेंट्री आहे की सिनेमा हेच स्पष्ट होत नाही. या चित्रपटामध्ये अनेक असत्य गोष्टी मांडल्या असून त्यातील सर्वांत मोठे असत्य हे तेव्हा राज्यामध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे सरकार होते हे दर्शविण्यात आले आहे. प्रत्यक्षात हे सगळे घडले तेव्हा राज्यपालांची राजवट होती. केंद्रामध्ये भाजपच्या पाठिंब्यावरील व्ही. पी. सिंह यांचे सरकार होते. या काळामध्ये केवळ काश्मिरी पंडितांचीच हत्या झाली नाही तर मुस्लिम आणि शिखांना देखील ठार मारण्यात आले होते. मुस्लिम आणि शिखांना देखील काश्मीर सोडावे लागले होते.’’ असे उमर यांनी नमूद केले.

सरसंघचालकांकडून स्तुती

नवी दिल्ली : जे लोक सत्य जाणून घेऊ इच्छितात किंवा ज्यांना त्याची आस आहे त्यांनी ‘दि काश्मीर फाईल्स' हा चित्रपट अवश्य पहावा, अशा शब्दांत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी या बहुचर्चित चित्रपटाला आपल्या पसंतीची पावती दिली.

‘दि काश्मीर फाईल्स’ हा काश्मीर खोऱ्यात १९९० मध्ये काश्मिरी पंडितांचा जो नरसंहार झाला त्याची भयावह कथा चित्रबद्ध करणारा चित्रपट सध्या सर्वत्र गाजत आहे. ११ मार्चला प्रदर्शित झाल्यावर जेमतेम ४-५ दिवसांतच या चित्रपटाने कमाईचे व चर्चेचे सारे विक्रम मोडले आहेत. पंतप्रधान नरेद्र मोदी व भाजप नेत्यांनी या चित्रपटाचे जाहीर कौतुक केले आहे. या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक अग्निहोत्री व पल्लवी जोशी यांनी सरसंघचालकांची नुकतीच भेट घेतली. दरम्यान, संघाने होळीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात अनौपचारिकरित्या बोलताना एका ज्येष्ठ संघनेत्यांनी मात्र अशी भेट झाल्याचे वृत्त नाकारले.

दिग्दर्शकांना ‘वाय’ सुरक्षा

नवी दिल्ली : ‘दि काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना केंद्र सरकारने ‘सीआरपीएफ’ कमांडोंचा समावेश असलेली ‘वाय’ दर्जाची सुरक्षा देऊ केली आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर निर्माण झालेला वाद आणि त्यावरून व्यक्त होणाऱ्या टोकाच्या प्रतिक्रिया लक्षात घेता अग्निहोत्री यांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याचे दिसून येते, त्यामुळेच त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

‘सीआरपीएफ’चे सात ते आठ कमांडो हे चोवीस तास अग्निहोत्री यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतील. केंद्रीय गृहमंत्रालयाने अग्निहोत्री यांना सुरक्षा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे अनेक भाजपशासित राज्यांनी हा सिनेमा करमुक्त केला असून विरोधकांनी याच मुद्यावरून केंद्र सरकारवर टीकेचे प्रहार केले आहेत. हा चित्रपट एकांगी असून त्यातील चित्रण हिंसक असल्याचा आरोप विरोधी नेत्यांकडून करण्यात आला आहे.

दि काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाने परखड सत्य मांडले असून काश्मिरी पंडितांना भोगाव्या लागलेल्या यातना आणि त्यांचा संघर्ष यातून दिसून येतो.

- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.