Vande-Mataram student movement: हैद्राबाद संस्थांनात शिक्षण संस्थांमध्ये म्हणजे शाळा महाविद्यालयात वंदे्मातरम् हे गीत म्हणण्यास सक्त बंदी होती. मराठवाडा मुक्ती लढ्याचे पडसाद विद्यार्थ्यांच्या मनावर उमटू नयेत, म्हणून निजाम सरकार या अशा गोष्टी करत होते. इ.स. 1938 हे वर्ष निजाम सरकार विरूद्ध प्रतिकाराचे वर्ष होते. विद्यार्थी वर्गाच्या मनात निजामशाहीविषयी असंतोष हा खदखदत होता.
त्या काळात उस्मानिया विद्यापीठात वरंगल, गुलबर्गा व औरंगाबाद येथे इंटरमिजिएट कॉलेजेस होती. औरंगाबाद कॉलेजमध्ये विद्यार्थी हे निजामशाहीच्या अत्याचारामुळे बैचेन होते. गोविंदभाई श्रॉफ विद्यार्थ्यांना चिथावणी देतात म्हणून त्यांना नोकरीतून काढण्यात आले होते. पुढे अचानक विद्यार्थ्यांनी 14 नोव्हेंबर, 1938 रोजी वसतिगृहामध्ये ‘वंदेमातरम्’ म्हणण्यास प्रारंभ केला आणि लगेच सरकारने त्यावर बंदी आणली. आणलेली ही बंदी स्विकारायला विद्यार्थी तयार नव्हते.
16 नोव्हेंबर, 1938 रोजी विद्यार्थ्यांनी अन्नत्याग सत्याग्रह केला. 18 नोव्हेंबर, 1938 रोजी विद्यार्थ्यांची या प्रश्नावर रितसर बैठक झाली आणि 30 नोव्हेंबर, 1938 रोजी विद्यार्थ्यांनी संप पुकारला. या घटनेचे पडसाद हैदराबादमध्येही उमटले. विद्यार्थ्यांना गणवेशाची सक्ती करण्यात आली. त्यास देखील विद्यार्थ्यांनी प्रखर विरोध केला. शेवटी वंदे्मातरम् प्रश्नावर बेमुदत संप पुकारला. यात एकूण 1 हजार 200 विद्यार्थी संपावर गेले. केवळ औरंगाबाद शहरात 300 विद्यार्थी वंदेमातरम् चळवळीत उतरले होते.
वंदे्मातरम् आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक विद्यार्थ्यांना कॉलेजमधून काढून टाकण्यात आले. विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडीत झाले. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू टी. जे. केदार यांनी उदार अंत:करणाने उस्मानिया विद्यापीठातील काढून टाकलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. मराठवाड्यातील शालेय विद्यार्थ्यांची येवला, खामगाव व अहमदनगर येथे सोय करण्यात आली.
त्रिपुरा कांग्रेस अधिवेशनात वंदेमातरम् चळवळीस पाठिंबा देण्यात आला. नेताजी सुभाषचंद्र बोस व पं. जवाहरलाल नेहरू यांनी तरुणांच्या या उठावाला पाठिंबा दिला होता.
विद्यार्थ्यांनी दिलेल्या या अभूतपूर्व लढ्यामुळे हैदराबाद संस्थांनात पुढे जी आंदोलने झाली, त्यासाठी राजकीय कार्यकर्ते व नेते वंदेमातरम् चळवळीतून मोठ्या प्रमाणात मिळाले. वंदेमातरम् चळवळीने विद्यार्थी विश्वात फार मोठी जागृती घडवून आणली. 1938 ते 1948 पर्यंतचा काळ हा मुक्ती संग्रामाचा कालखंड म्हणून ओळखला जातो. या काळात सर्व आघाड्यांवर बहुतेक वंदेमातरम् चळवळीतील तरुण कार्यकर्ते होते.
हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामात आणि मराठवाडा मुक्ती संग्रामात विद्यार्थी व युवाशक्तीने वंदेमातरम् चळवळीच्या माध्यमातून जे अभूतपूर्व चैतन्य दाखवले , ते प्रशंसनीयच मानले पाहिजे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.