जयपूर : चारचाकी वाहनाचे वजन फक्त तीन किलो, त्याची क्षमता मात्र ५० प्रवाशांची. वाहनाची नोंदही खरेदीपूर्वीच. हे कोणते नवतंत्रज्ञानाच्या मदतीने बनविलेले वाहन नाही तर राजस्थानात परिवहन विभागाने वाहनांच्या नोंदीत घातलेला सावळागोंधळ आहे. नियंत्रक आणि महालेखापाल (कॅग) यांनी या नोंदीतील त्रुटी उघड केल्या आहेत. राजस्थानच्या विधानसभेत कॅगचा यासंदर्भातील अहवाल नुकताच मांडण्यात आला.
राजस्थानच्या परिवहन विभागातील ही एकमेव नोंद नाही तर तब्बल १५,५७० वाहनांचे वजन शून्य ते तीन किलो असल्याची अविश्वसनीय नोंदही विभागाच्या वाहन व सारथी या पोर्टलमधील अर्जांवर करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर ११९ वाहनांची खरेदीपूर्वीच नोंद करण्यात आली असून १४ वाहनांचे वजन एक लाख किलोपेक्षा अधिक असल्याचे दाखवीत दुसरे टोकही गाठले आहे. परिवहन विभागाने इंजिनाचा बनावट क्रमांक असलेल्या ७१२ वाहनांची नोंदणी केल्याचेही कॅगला आढळले.
कॅग’ने परिवहन विभागाच्या वाहन व सारथी या संकेतस्थळांवर एप्रिल २०१६ ते मार्च २०२१ दरम्यानच्या नोंदी तपासल्या. यात दुचाकी व तीनचाकी वगळता इतर सर्व वाहनांच्या नोंदीचा समावेश होता. ‘वाहन’ मधील डेटाची विश्वासार्हता जपणे तसेच तपासणीमध्ये सदोष आढळलेल्या नोंदणीत सुधारणा करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे, वाहनांच्या डेटाची अखंडता व अचूकता राखण्यास मदत होईल, अशी सूचनाही कॅगने आपल्या अहवालात केली आहे.
राजस्थानच्या परिवहन विभागाने अनेक उलटसुलट नोंदी केल्या आहेत. एकीकडे मालवाहू व कमी आसनक्षमतेच्या वाहनांच्या नोंदणीत अनेक प्रवाशांची क्षमता दाखविली आहे, दुसरीकडे बससारख्या किमान १० पेक्षा अधिक प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या १,०१८ वाहनांची आसन क्षमता एक ते तीन प्रवासी असल्याची नोंदणीही केली आहे.
दरम्यान, वाहनांच्या चुकीच्या नोंदीत दुरुस्ती करण्याची सूचना दिल्याचे उत्तर राजस्थान सरकारने डिसेंबर २०२३ मध्ये दिले होते. त्यानुसार, परिवहन विभागाने काय पावले उचलली, हे तपासले असता जानेवारी २०२४ मध्येही या चुकांची दुरुस्ती व्हायची असल्याचे कॅगच्या निदर्शनास आले. आपल्या प्रणालीतील दोष ओळखून ते दुरुस्त करण्यासाठी योग्य पावले उचलण्याची गरजही कॅगने व्यक्त केली.
महसुल बुडतोय
मोटार वाहन कायदा, १९८८ची अंमलबजावणी करण्यासाठी वाहन व सारथी या पोर्टलची रचना करण्यात आली आहे. मात्र, या नियमांची नीट अंमलबजावणी होत नसल्याचे अनेक उदाहरणांवरून दिसते. त्यामुळे, सरकारी महसूल बुडत असल्याचे ताशेरेही कॅगने ओढले आहेत.
अशीही नोंदणी
१६६
१८ वर्षांखालील व्यक्तींना दिलेले शिकाऊ परवाने
१,२१९
आसन क्षमतेच्या सदोष नोंदी केलेली वाहने
१२०
आसन क्षमता दाखविलेली मालवाहू वाहने
०७
१० ते ५० प्रवासीक्षमतेच्या मोटारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.