अंदमानमध्येही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे.
नवी दिल्ली : बंगालच्या (Bengal) उपसागरात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र आज कायम राहण्याची शक्यता असून असानी चक्रीवादळाचं (Asani Cyclone) आगमन होण्याची शक्यता आहे. जीवित आणि मालमत्तेची होणारी हानी लक्षात घेता लष्करालाही सतर्क करण्यात आलंय. तसेच अंदमान आणि निकोबार बेटांमधील (Andaman and Nicobar Islands) मच्छिमारांना समुद्रात प्रवेश नाकारण्यात आलाय. तर, अंदमान प्रशासनानं सखल भागातून स्थानिक लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केलीय. दरम्यान, अंदमानमध्ये मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता आहे. तसेच पुढील दोन दिवस देशाच्या उत्तर-पश्चिम भागात तापमानात घट होण्याचा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवलाय.
भारतीय हवामान विभागाचे संचालक मृत्युंजय महापात्रा (Mrutyunjay Mohapatra) यांनी सांगितलं की, हे कमी दाबाचं क्षेत्र दक्षिण बंगालपासून अदमान आणि निकोबार बेटांपर्यंत पोहोचलंय. अंदमान निकोबारमार्गे म्यानमार आणि बांगलादेशकडं वळेल. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, प्रथम जोरदार वाऱ्यासह वादळ येईल आणि ते मजबूत होऊन चक्री वादळात रूपांतरित होईल. त्याचबरोबर अंदमानात आज वाऱ्याचा वेग ताशी 65 ते 75 किमीपर्यंत पोहोचू शकतो. तर, सायंकाळपर्यंत त्याचा वेग आणखी वाढेल. अंदमान समुद्र, आग्नेय आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरावर समुद्राच्या हालचाली तीव्र होण्याची शक्यता आहे. याशिवाय, पूर्व-मध्य व लगतच्या नैऋत्य आणि ईशान्य बंगालचा उपसागर इथंही सागरी हालचाली तीव्र झाल्या आहेत. आज (सोमवार) अंदमान बेटांवर बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
वातावरणातील बदलामुळं राजस्थानमध्ये 25 ते 35 किमी वेगाने वारे वाहतील. त्याच्या प्रभावामुळं पश्चिम हिमालयाच्या काही भागात पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते. तर केरळ (Kerala), तामिळनाडू, पाॅंडेचेरी, कराईकल, रायलसीमा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात (Karnataka) पुढील पाच दिवस हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.