नवी दिल्ली : येत्या १६ फेब्रुवारीला मतदान होणाऱ्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आणि काँग्रेसने आपापल्या उमेदवारांच्या पहिल्या याद्या आज जाहीर केल्या. एकूण ६० जागांपैकी भाजपने ४८ तर काँग्रेसने १७ उमेदवार जाहीर केले आहेत.
भाजपने संभाव्य मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत अग्रेसर असलेल्या केंद्रीय मंत्री प्रतिमा भौमिक, मुख्यमंत्री डॉ. माणिक साहा, प्रदेशाध्यक्ष राजीव भट्टाचार्य यांना तर कॉंग्रेसने सुदीप राय बर्मन यांना उमेदवारी दिली आहे. माजी मुख्यमंत्री विप्लव देव यांचे तिकीट भाजपने कापले आहे.
भाजपच्या यादीत दोन मुस्लिम उमेदवारांचीही नावे आहेत. माकप सोडून कालच भाजपमध्ये दाखल झालेले महम्मद मोबेशर अली यांना कैलाशहरमधून तर तफजल हुसेन यांना बॉक्सनगरमधून तिकीट देण्यात आले आहे.
याशिवाय या यादीत ११ महिलांचीही नावे आहे. मोदी सरकारमध्ये सामाजिक न्याय राज्यमंत्री असलेल्या प्रतिमा भौमिक धानपूरमधून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. प्रतिभा भौमिक या मोदी सरकारमध्ये सामाजिक न्याय राज्यमंत्री आहेत.
प्रदेशाध्यक्ष राजीव भट्टाचार्य यांना बनमालीपूरमधून तिकीट देण्यात आले आहे. मुख्यमंत्री साहा त्यांच्या बोरदोवली शहरातूनच निवडणूक लढवणार आहेत. गेल्या वेळी याच जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत विजय मिळवून ते विधानसभेत पोहोचले होते.
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची (सीईसी) बैठक काल पक्षाच्या मुख्यालयात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर सदस्य उपस्थित होते.
या बैठकीत त्रिपुरासाठीची पहिली यादी निश्चित करण्यात आली. आज यादी जाहीर झाल्यावर डॉ. साहा यांनी ट्विट करून उमेदवारांचे अभिनंदन केले. भाजपच्या यादीत स्वप्ना मुझुमदार (राजनगर सीट), रणजीत दास (अमरपूर), गौतम सरकार (बेलोनिया), दीपयन चौधरी (हरिश्मुख) आदी प्रमुख उमेदवार आहेत.
कॉंग्रेसकडून बर्मन, चौधरी यांना तिकीट
काँग्रेसने ज्या १७ उमेदवारांना तिकीट दिले आहे. त्यात मुख्यमंत्रिपदाचे दावेदार सुदीप रॉय बर्मन, प्रशांत सेन चौधरी, सिस्ता मोहन दास, आशिष कुमार साहा, गोपाल राय, केशव सरकार, राज कुमार सरकार, सुसांता चक्रवर्ती, अशोक देवबरमा, डॉ. सत्यबन दास, बिराजित सिन्हा आणि छयन भट्टाचारजी आदी प्रमुख नावे आहेत.
हिंसाचाराचे आव्हान
पाच वर्षांपर्यंत डाव्यांची एकहाती सत्ता असलेल्या त्रिपुरात निवडणूक हिंसाचाराचे मोठे आव्हान यंत्रणेसमोर आहे. राज्यातील ३३२८ मतदान केंद्रांपैकी तब्बल ११०० केंद्रे असुरक्षित म्हणून जाहीर करण्यात आल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनीच सांगितले. याशिवाय असे २८ बूथ अतिसंवेदनशील (क्रिटिकल) म्हणून ओळखले गेले आहेत जेथे गेल्या निवडणुकीत उमेदवाराला ७० टक्क्यांहून अधिक मते मिळाली होती.
प्रचाराची भिस्त मातब्बर नेत्यांवर
भाजपच्या प्रचाराची मदार पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आहे. काँग्रेसनेही आपल्या ४० सदस्यीय स्टार प्रचारकांची यादी यापूर्वीच जाहीर केली होती. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी, महासचिव प्रियांका गांधी, राज्य प्रभारी अजय कुमार, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी, हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू, सचिन पायलट, अझरुद्दीन, अरविंदर सिंग लवली, दीपा दास मुन्शी आदींचा समावेश आहे.
विरोधकांत बेकीची चिन्हे ?
त्रिपुरा निवडणुकीसाठी डावे पक्ष व काँग्रेसची आघाडी झाली असून त्यांनी सर्व ६० जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. पाच दशकांचे वैर संपवून हे दोन्ही पक्ष भाजपला सत्तेतून घालविण्यासाठी एकत्र आले. मात्र कॉंग्रेसने ठरविल्यापेक्षा जास्त जागांवर उमेदवार जाहीर केल्याने त्रिपुरातील आघाडीला ‘मनभिन्नतेचा‘ तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
त्रिपुरा हा डाव्यांचा आणि त्याआधी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. या दोनच पक्षांनी येथे ५३ वर्षांहून अधिक काळ राज्य केले. २०१८ पूर्वी २५ वर्षे डाव्यांनी सलगपणे त्रिपुरावर राज्य केले. मात्र ५ वर्षांपूर्वी भाजपने चमकदार कामगिरी करून दोन्ही पक्षांचा पराभव केला.
भाजप नेते सुनील देवधर यांच्या रणनीतीनुसार भाजपने त्रिपुरात नवी समीकरणे मांडली. देवधर यांनी मोठ्या संख्येने गैर-कम्युनिस्ट नेत्यांना भाजपबरोबर जोडले. काँग्रेस आणि तृणमूलच्या अनेक नेत्यांनी भाजपचे उपरणे परिधान केले.
या निवडणुकीत ६० पैकी ३३ जागा मिळाल्यावर भाजपने आयपीएफटीसोबत आघाडी सरकार स्थापन केले आणि बिप्लब कुमार देव यांना मुख्यमंत्री केले. तो निर्णय चुकल्याचे भाजप नेते आता मान्य करतात. यावेळी त्रिपुराच्या ग्रामीण भागात भाजप विरुद्ध सीपीएम अशी लढत होणार आहे.
विरोधी आघाडीच्या करारानुसार ६० पैकी ४३ जागांवर माकप, १३ जागांवर काँग्रेस, प्रत्येकी एका जागेवर सीपीआय, आरएसपी आणि फॉरवर्ड ब्लॉक तर एका जागेवर अन्य उमेदवार उभा करण्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, काँग्रेसने आज १३ ऐवजी १७ जागांसाठी उमेदवार जाहीर केले. त्यामुळे माकपमध्ये अदृश्य अस्वस्थता दिसत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.