चेन्नई : सनातन धर्मावर ‘द्रमुक’चे नेते आणि तमिळनाडूतील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी आक्षेपार्ह टीका केल्यानंतर भाजपसह अन्य हिंदुत्ववादी पक्षांनी त्यांच्यावर कठोर शब्दांत ताशेरे ओढायला सुरूवात केली आहे. त्यांच्या या वक्तव्याचे राष्ट्रीय राजकारणात देखील तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.
आता या वादावर तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी थेट भाष्य केले असून उदयनिधी यांनी सनातन धर्मातील अमानवीय बाबींवर टीका केली असून त्यावरून आता त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष्य करणे योग्य नसल्याचे स्टॅलिन यांनी म्हटले आहे. भाजप या मुद्याचे राजकारण करत असून विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे स्टॅलिन यांनी म्हटले आहे.
‘‘ उदयनिधी यांनी काही दमणकारी मूल्यांविरोधात उघड भूमिका घेतल्याने भाजपच्या समर्थनात असलेल्या शक्तींना ते सहन झालेले नाही. आता तीच मंडळी उदयनिधी यांच्याबाबत चुकीचा प्रचार करत आहेत. सनातन धर्माचे पालन करणाऱ्यांचा वंशच्छेद केला जाईल, अशी भाषा बोलल्याचा आरोप केला जात आहे.
आता यामध्ये थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील सहभागी झाल्याचे पाहून मला आश्चर्य वाटते.’’ असे स्टॅलिन यांनी म्हटले आहे. ‘‘ उदयनिधी यांनी सनातन धर्मातील काही दमणकारी विचारधारांवर टीका केली होती. या विचारधारांवर आधारित असलेल्या कुप्रथांचे निर्मूलन करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.
अनुसूचित जाती, आदिवासी आणि महिलांना देण्यात येणाऱ्या सापत्न वागणुकीवर त्यांना हल्लाबोल केला होता. कुणाच्या धार्मिक भावनांना क्षती पोचविण्याचा त्यांचा उद्देश नव्हता.’’ असे स्टॅलिन यांनी स्पष्ट केले.
वंशच्छेद या शब्दाचा वापर नाही
‘‘ भाजपने तयार केलेले समाजमाध्यमांतील ट्रोल हे उत्तर भारतीय राज्यांमध्ये चुकीचा प्रचार करत असून उदयनिधी यांनी कोठेही वंशच्छेद या शब्दाचा वापर केलेला नाही. तमीळ, इंग्रजी अथवा अन्य कोणत्याही भाषांमध्ये त्यांनी हा शब्द उच्चारलेला नाही,’’
असेही स्टॅलिन यांनी नमूद केले. उदयनिधी यांनी आरोपांचे खंडन केल्यानंतर देखील केंद्रीयमंत्री अमित शहा आणि राजनाथसिंह वारंवार चुकीच्या पद्धतीने त्याचा उल्लेख करत असल्याचे स्टॅलिन म्हणाले.
ए. राजांकडून आक्षेपार्ह शब्दांत टीका
‘द्रमुक’चे अन्य एक नेते खासदार ए. राजा यांनी सनातन धर्माबाबत आणखी आक्षेपार्ह शब्दांत टीका केली आहे. ‘‘ उदयनिधी यांनी सनातन धर्माबाबत फार सौम्य शब्दांत भाष्य केले असून तो एक सामाजिक कलंक असून त्याची तुलना एचआयव्ही आणि कुष्ठरोगाशी करायला हवी,’’ असे राजा यांनी म्हटले आहे. येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले.
‘‘ सनातन धर्म आणि विश्वकर्म योजना या वेगळ्या नाहीत. त्या एकच आहेत. उदयनिधी यांनी सौम्य भाषा वापरताना त्याची तुलना मलेरिया आणि डेंगी यांच्याशी केली होती,’’ असे राजा यांनी स्पष्ट केले.
केवळ नाव बदलल्याने चारित्र्य आणि इरादा बदलत नाही. ए. राजा यांच्या ताज्या वक्तव्यातून ‘इंडिया’ आघाडीची वैचारिक दिवाळखोरी आणि हिंदूफोबिया दिसून येतो. काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष कशा पद्धतीने भारत आणि त्याच्या मुळांना कलुषित करत आहेत हे अवघा देश पाहतो आहे.
- धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शिक्षणमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.