नवी दिल्ली - यूजीसी-नेट परीक्षा आयोजित झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी शिक्षण मंत्रालयाने ती रद्द करण्याच्या घटनेनंतर काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीकेचे लक्ष्य करताना,‘‘दरवर्षी ते ‘परीक्षा पे चर्चा’ नावाचे मोठे नाटक करत असतात, पण तरीही त्यांच्या सरकारला पेपर फूट आणि भ्रष्टाचार केल्याशिवाय एकही परीक्षा आयोजित करता येत नाही,’ असे सुनावले. मोदींनी आता ‘पेपरलीक’ वर बोलावे, असे आवाहनही काँग्रेसने केले आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदींवर टीका करताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले,‘‘ही कसली परीक्षा पे चर्चा? येथे दररोज पेपरफुटी होत आहे. मोदी सरकारने देशातील शिक्षण आणि भरती यंत्रणेचा पार विचका करून टाकला आहे. ‘नीट’, ‘यूजीसी-नेट’, ‘सीयूईटी’ या परीक्षांमध्ये पेपरफुटी, भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. प्रचंड गाजावाजा करत सुरू केलेली राष्ट्रीय भरती संस्था (एनआरए) धूळखात पडली आहे.’
मोदी सरकारने ऑगस्ट २०२० मध्ये ‘एनआरए’ची घोषणा केली होती. खर्गे म्हणाले की, ही संस्था देशभरातील कोट्यवधी युवकांसाठी वरदान ठरेल, असा दावा मोदींनी त्यावेळी केला होता. ‘या सामाईक चाचणी परीक्षेमुळे इतर सर्व प्रवेश प्रक्रिया रद्द होऊन विद्यार्थ्यांचा महत्त्वाचा वेळ वाचेल. तसेच, सर्व प्रकारच्या नोकऱ्यांसाठी ही एकच निवड चाचणी असेल,’ असेही मोदी म्हणाले होते, असा दावा खर्गेंनी केला.
या संस्थेची घोषणा होऊन चार वर्षे झाली तरी त्याद्वारे एकही परीक्षा आयोजित झालेली नाही. तीन वर्षांसाठी त्या संस्थेला दीड हजार कोटी रुपयांचा निधी दिला होता; मात्र डिसेंबर २०२२ पर्यंत केवळ वीस कोटी रुपयेच खर्च करण्यात आले होते, अशी टीकाही खर्गे यांनी केली.
‘मोदींनी कट आखला आहे’
खर्गे म्हणाले, ‘देशात ३० लाख सरकारी जागा रिक्त असताना आणि त्या भरल्या जात नसताना, दुसरीकडे मोदी सरकारने मात्र अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि आर्थिक मागासवर्गीयांचा आरक्षणाचा हक्क काढून घेण्याचा ‘कट रचला’ आहे. एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमामध्ये शास्त्रीय विचारांना प्राधान्य देण्याऐवजी राजकीय रंग दिला जात आहे.
यूजीसी, सीबीएसई, आयआयटी व आयआयएम या संस्थांची स्वायत्तता धुळीला मिळविण्यात आली आहे.’ देशातील लाखो युवकांना बेरोजगारीत ढकलून मोदी प्राचीन काळातील विद्यापीठांमध्ये कॅमेरे घेऊन फिरत आहेत, असा टोलाही खर्गे यांनी लगावला.
‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमावरील खर्च सहा वर्षांत १७५ टक्क्यांनी वाढला आहे. हे सरकार गैरव्यवहार केल्याशिवाय राष्ट्रीय पातळीवर एकाही परीक्षेचे नीट आयोजन करू शकत नाहीत आणि परीक्षा काळात मात्र विद्यार्थ्यांवर उपदेशाचा पाऊस पाडतात, हा अप्रामाणिकपणा आहे.
- मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे अध्यक्ष
‘विद्यार्थ्यांच्या हितासाठीच परीक्षा रद्द’
नवी दिल्ली - ‘यूजीसी-नेट’ परीक्षेबाबत कोणतीही तक्रार आली नव्हती, मात्र विश्वासार्हतेचा भंग झाल्याची माहिती मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही स्वत:हून पुढाकार घेत ही परीक्षा रद्द केली, असे स्पष्टीकरण केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आज दिले. हे प्रकरण सीबीआयकडे असल्याने अधिक माहिती देता येणार नसल्याचे मंत्रालयाचे सहसचिव गोविंद जयस्वाल यांनी सांगितले.
राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) १८ जूनला देशभरात यूजीसी-नेटची परीक्षा घेतली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी शिक्षण मंत्रालयाने ही परीक्षा रद्द केल्याचे जाहीर केले. या परीक्षेमध्ये विश्वासार्हतेचा भंग झाल्याची माहिती मिळाल्याने परीक्षा रद्द करत असल्याचे निवेदन मंत्रालयाने प्रसिद्ध केले होते. यावरून विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून राजकीय वादही पेटत आहे.
या पार्श्वभूमीवर जयस्वाल यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘परीक्षेबाबत विद्यार्थ्यांकडून कोणतीही तक्रार आलेली नव्हती. मात्र, काही विशिष्ट माहिती मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही स्वत:हून कारवाई करत परीक्षा रद्द केली. लवकरच नव्याने परीक्षा घेतली घेण्यात येणार आहे.’ परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयानंतर लगेचच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला आहे.
‘एनएसयूआय’चे कार्यकर्ते ताब्यात
यूजीसी-नेट परीक्षा रद्द केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसशी संलग्न असलेल्या ‘एनएसयूआय’च्या कार्यकर्त्यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर निदर्शने करत, ‘एनटीए’वर बंदी घालावी व पेपरफुटीची चौकशी करावी, अशी मागणी केली. ‘एनटीए’मध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. यावेळी ‘एनएसयूए’चे राष्ट्रीय अध्यक्ष वरूण चौधरी यांनी बनावट नोटा हवेत उधळल्या. आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी काहींना ताब्यात घेतले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.