नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी काहीही देण्यात आले नसून राज्याच्या तोंडाला पाने पुसली असल्याचा हल्लाबोल महाविकास आघाडीच्या खासदारांनी केला. तसेच संसदेच्या प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने करून केंद्र सरकारचा निषेधही केला.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आज मांडला. या अर्थसंकल्पामध्ये बिहार आणि आंध्रप्रदेश या राज्यांसाठी अर्थमंत्र्यांनी घोषणा केल्या आहेत. त्याचप्रमाणे पुरामुळे नुकसान झालेल्या उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, बिहार यासारख्या राज्यांनाही अर्थसंकल्पातून मदत देण्यात आली आहे. मात्र, अर्थमंत्र्यांच्या भाषणात महाराष्ट्रासाठी तरतुदीच्या योजनांचा उल्लेख नसल्यावरून महाविकास आघाडीच्या खासदारांमध्ये नाराजी होती. त्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या खासदारांनी संसद भवनाच्या प्रवेशद्वासमोर निदर्शने करून सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली. तसेच अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली असल्याचाही आरोप या खासदारांनी केला.
कॉँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर, डॉ. शिवाजी काळगे, बळवंत वानखडे, शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे खासदार अमर काळे, सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
दरम्यान, तामिळनाडूकडे अर्थसंकल्पात दुर्लक्ष झाल्यावरून उद्या (ता. २४) द्रमुकचे खासदार संसदेच्या आवारात निदर्शने करणार आहेत. तामिळनाडूमध्ये पुरामुळे नुकसान झाले असताना राज्याच्या केंद्राकडून मदत मिळाली नसल्याचा द्रमुकच्या खासदारांचा आक्षेप आहे. पुराचा सामना करणाऱ्या उत्तराखंड, बिहार, हिमाचल प्रदेश आदी राज्यांना मदत करण्यात आली असून तमिळनाडूकडे दुर्लक्ष केल्यामुळे द्रमुकमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.