नवी दिल्ली: पाच राज्यांमधील विधानसभेच्या निवडणुका येत्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या राज्यातील निवडणुकांसंदर्भात शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पाच राज्यातील निवडणूकांमध्ये राष्ट्रवादी तीन राज्यांमध्ये निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर या तीन राज्यांमध्ये उतरणार असल्याचं शरद पवार यांनी घोषित केलं आहे. यूपीमध्ये परिवर्तन निश्चित असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे तसेच येत्या काळात भाजपचे अनेक आमदार भाजप पक्ष सोडणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. यूपीचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'आमच्याबाजूने 80 टक्के लोक असून 20 टक्के विरोधात' असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्याचाही समाचार शरद पवार यांनी घेतला आहे.
तसेच त्यांनी प्रचारासाठी यूपीला जाणार असल्याचंही म्हटलं आहे. त्यांनी म्हटलंय की, सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी तिथे येण्याबाबत आग्रह धरला आहे. त्यामुळे, माझ्यासहित इतरही काही जण यूपीमध्ये प्रचारासाठी सहभागी होणार आहेत. मी लवकरच यूपीच्या दौऱ्यावर जाणार आहे.
योगी आदित्यनाथ यांचा घेतला समाचार
पुढे ते म्हणाले की, अनेकांशी चर्चा केल्यावर समजतंय की, आज यूपीमध्ये स्थितीमध्ये बदल घडतोय. यूपीमध्ये परिवर्तन येणार आहे, हे नक्की आहे! तिथे लोक बदल अपेक्षित करत आहे. तिथे जो धर्मांध विचारधारा मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात आहे, तो चुकीचा आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी अलिकडेच एक वक्तव्य केलंय की, 80 टक्के लोक आमच्या सोबत आहेत, फक्त 20 टक्के नाहीयेत. 20 टक्क्यांच्या मी अन्वयार्थ लावायचा प्रयत्न केला. राज्याचा प्रमुख हा सर्वांचा असतो. या प्रकारचं विधान देशातील अल्पसंख्याकांना छेद देणारं आहे. या प्रकारचं विधान मुख्यमंत्री पदाला शोभा देणारं नाही. यांची विचारधाराच तशी आहे. मात्र, त्यांच्या पोटातील गोष्ट ओठावर आली आहे. मात्र, यानिमित्ताने देशातील सेक्यूलर विचारधारा मजबूत करणे, एकात्मतेची भाषाकरणे, देशासाठी समाजासाठी आवश्यक आहे. यूपीची जनता याला नक्कीच उत्तर देईल, आणि त्यांना उत्तर देईल. या व्यतिरक्त मी अधिक काही बोलू इच्छित नाही. आज भाजपमधील मौर्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबत 13 आमदार आणि इतरही साथी त्यांना सोबत देणार आहेत. तुम्ही बघाच येत्या काही दिवसांत काही चेहरे तो पक्ष सोडून इकडे येतील आणि तुम्हाला परिवर्तन दिसून येईल. लोकांना परिवर्तन हवंय.
'तीन राज्यांमध्ये लढू'
मणिपूर विधानसभेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून लढतील. पाच जागांवर आम्ही लढू असं त्यांनी सांगितलंय.
दुसरीकडे, गोव्यात काँग्रेस पक्ष, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चा सुरु आहे. त्या ठिकाणी येत्या दोन दिवसांत निर्णय होईल. गोव्यात परिवर्तनाची गरज आहे. भाजप पक्ष हटवण्याचा प्रयत्न करणार. गोव्यात शिवसेनेला एकत्र घेण्याबाबत चर्चा सुरु आहे.
यूपीमधअये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, समाजवादी पक्ष आणि इतर छोट्या पक्षांची युती झआलीये. लखनऊमध्ये जागांच्या वाटपांसाठी बैठक होणार आहे, असं त्यांनी म्हटलंय.
मोदींच्या सुरक्षेवरुन सुरु असलेल्या राजकारणावर काय म्हणाले?
शरद पवार यांनी म्हटलं की, त्याच्याबद्दल अजून भाष्य करण्याची गरज नाही. सूप्रीम कोर्टाने चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. केंद्र आणि पंजाबच्या पोलिसांना जबाबदार ठरवून स्वतंत्र चौकशी सुरु केली आहे. त्यातून नक्कीच काहीतरी पुढे येईल. पंतप्रधानांची सुरक्षा हा इन्स्टिट्यूशन आहे. त्यांच्यासंदर्भातील सुरभा केंद्र अथवा राज्य सरकार असो, सग्याचीच जबाबदारी आहे, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. सुरक्षेचा मुद्दा महत्वाचा आहे. एकदा सुप्रीम कोर्टाने चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केल्यानंतर बाकीप्रकारची वक्तव्ये करत त्यावर राजकारण करणं मला योग्य वाटत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.