नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली पुन्हा सत्ता मिळवता आली. मात्र, ही सत्ता मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाला मित्रपक्षांच्या मदत घ्यावी लागली आहे. असे करताना सत्ता राखण्यासाठी भाजपला आता पूर्ण पाच वर्षे मित्रपक्षांची मर्जी राखावी लागणार आहे.
यावेळी भाजपला उत्तर प्रदेशात जबरदस्त फटका बसल्यामुळे लोकसभेत उत्तर प्रदेशातून त्यांच्या जागा निम्म्याने कमी झाल्या आहेत. अशात आता उत्तर प्रदेशातून भाजपचे केंद्रीय नेतृत्त्व मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांना हटवणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशातून अनुक्रमे 71 आणि 62 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे भाजपला केंद्रात एकहाती सत्ता मिळवता आली होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या जागा निम्म्याने कमी झाल्या आणि त्यांची 36 जागांवर घसरण झाली.
उत्तर प्रदेशातील भाजपच्या या खराब कामगिरीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने उत्तर प्रदेशात पक्षात मोठे फेरबदल करण्याची तयारी केल्याची चर्चा सतत सुरू असते. अशात भाजपचे केंद्रीय नेतृत्त्व मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांना हटवत नव्या चेहऱ्याला संधी देणार असल्याच्या चर्चा आहेत.
योगी अदित्यनाथ यांची पहिल्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर देशभरातून अनेकांनी यासाठी भाजपची थट्टा उडवली होती. मात्र, आपल्या पहिल्या कार्यकाळात योगींनी दमदार कामगिरी करत टीकाकारांची तोंडे बंद केली होती. त्यानंतर 2022 मध्ये झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतही भाजपला विजय मिळाला आणि योगी पुन्हा मुख्यमंत्री झाले.
योगी यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळात अनेक आक्रमक आणि लोकांना खुश करणारे निर्णय घेतल्याने देशभरात त्यांना प्रसिद्धी मिळू लागली. अशात अनेकजन त्यांना भावी पंतप्रधानही म्हणू लागले.
अशात 2024 च्या लोकसभा निवडणुका आल्या आणि त्यामध्ये उत्तर प्रदेशात भाजपचा धुव्वा उडाला. पक्षाच्या या निराशाजनक कामगिरीनंतर पंतप्रधान मोदींसह भाजपचे केंद्रीय नेतृत्त्व योगी अदित्यनाथांना पदावरून हटणार असल्याच्या चर्चा आहेत. याचबरोबर पक्षातील आमदारही आता अदित्यनाथांच्या विरुद्ध समोर येऊन बोलत आहेत.
नुकतेच उत्तर प्रदेशातील एका भाजप आमदाराचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये तो म्हणत होता की, "जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप नाही केला तर उत्तर प्रदेशात भाजपची पुन्हा सत्ता येणार नाही."
या सर्व घडामोडींवरून असे दिसते की, उत्तर प्रदेश भाजपमध्ये सारे काही आलबेल नाही.
मार्च महिन्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केजरीवाल यांना जामीन देण्यात आला होता.
तेव्हा तुरूंगातून बाहेर येताच केजरीवाल यांनी दावा केला होता की, भाजप योगी अदित्यनाथ यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवणार आहे.
त्यावेळी केजरीवाल म्हणाले होते की, "लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमित शहा यांना पंतप्रधान करण्यासाठी मते मागत आहेत. पुढच्या वर्षी 17 सप्टेंबरला मोदी 75 वर्षांचे झाल्यावर ते अमित शहा यांना पंतप्रधान बनवतील. निवडणूक जिंकल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दोन-तीन महिन्यांत हटवले जाईल. आता पंतप्रधान होण्याच्या अमित शहांच्या मार्गात योगी अदित्यानाथ हा एकमेव काटा उरला आहे."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.