मीरत : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची (UP Assembly Election) रणधुमाळी आता सुरु झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचे एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप आणि हिंसाचाराच्या घटना या आता आपल्याकडे जणून नेहमीच्याच झाल्या आहेत. याचीच पुनरावृत्ती घडली असून एमआयएमचे (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्या कारवर काही अज्ञात लोकांनी गोळीबार केल्यानं खळबळ उडाली आहे. ओवैसी यांनी स्वतः असा दावा केला आहे. (UP Election Bullet fire on Asaduddin Owaisi car Survived briefly)
ओवैसी म्हणाले, "आज मी सकाळी दिल्लीहून मेरठला पदयात्रेसाठी गेलो होते. किठौर इथं पदयात्रा झाल्यानंतर पुन्हा दिल्लीकडे येण्यासाठी निघालो तेव्हा एका टोल नाक्यावर पोहोचलो तेव्हा आमच्यासोबत चार वाहनं होती. आमच्या कारच्या पुढे आणि मागेही आमच्या सहकाऱ्यांच्या कार होत्या. जशी आमची कार टोल प्लाझाजवळ हळू झाली तेव्हा जोरात आवाज आला. त्यानंतर पुन्हा एक आवाज आला. यावेळी आमच्या कारच्या ड्रायव्हरनं सांगितलं की, हल्ला झाला. त्यानंतर ड्रायव्हरनं मोठ्या शिताफिनं आमची कार तिथून बाहेर काढली. त्यानंतर पुन्हा गोळीबाराचा आवाज आला. यावेळी तीन ते चार गोळ्या चालवल्या गेल्या. माझ्या कारच्या डाव्या बाजूला दोन गोळ्या लागल्याचं निशाण आहे. तसेच कारचा उजव्या बाजूचा टायरही पंक्चर झाला. त्यानंतर पुढे असणाऱ्या फ्लायओव्हरवर आमची कार थांबवली आणि आमच्या सहकाऱ्यांच्या दुसऱ्या कारमधून आम्ही पुढे रवाना झालो. पण त्यानंतरही आमच्यावर काहीजण पाळत ठेवत असल्याचा आम्हाला संशय आहे"
दरम्यान, आमच्याच एका सहकाऱ्यानं गोळीबार करणाऱ्या एका व्यक्तीच्या अंगावर थेट गाडी घातली. यावेळी तिथं दोन लोक होते यांपैकी एकानं लाल रंगाचं हुडी जॅकेट घातलं होतं तर एकाच्या अंगात पांढरं जॅकेट होतं. यांपैकी लाल हुडी घातलेल्या व्यक्तीच्या अंगावर गाडी चालवली गेल्यानं तो खाली पडला. पण पांढऱ्या जॅकेटवाल्यानं आमच्या सहकाऱ्याच्या गाडीवर गोळ्या झाडल्या. हल्लेखोरांपैकी एकाला आम्ही पकडलं असून त्याच्याकडे शस्त्रही मिळून आलं आहे, याची माहिती आम्ही अतिरिक्त पोलीस आयुक्तांना दिली, असंही ओवैसी यांनी यावेळी सांगितलं.
या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता आमची निवडणूक आयोगाकडे मागणी आहे की, त्यांनी या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करावी. हे लोक कोण आहेत? हा हल्ल्याचा कट कोणी रचला? याची चौकशी होणं गरजेचं आहे. आम्ही योगी आणि मोदी सरकार या दोघांनाही आवाहन करतो की याची चौकशी करावी की, एखाद्या खासदारावर अशा प्रकारे कोणी हल्ला केला? संसदेच्या अधिवेशनातही आम्ही हा प्रश्न उपस्थित करणार आहोत, असंही ओवैसी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.