शरद प्रधान
देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये २०१७ मध्ये योगी आदित्यनाथ सत्तेवर आल्यानंतर राज्याचे हिंदूकरण हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट होते. त्याची सुरुवात कोणत्याही इस्लामिक छटा असलेल्या शहरांची आणि गावांची नावे बदलण्यापासून झाली. सरकारी इमारतींचा रंग किंवा अगदी राज्य मार्गावरील वाहतूक बसगाड्यांचा रंग, तसेच इतर काही गोष्टींवर भगवा रंग चढविण्यात आला. वाराणसीच्या काशी- विश्वनाथ मंदिरात तैनात असलेल्या पोलिसांनी भगवे वस्त्र परिधान करण्याचा निर्णय नुकताच झाला आहे. यातून भगवेकरण्याच्या ‘कडव्या’ अट्टाहासाने आता टोक गाठल्याचे दिसत आहे. हा बदल केवळ रंगापुरता मर्यादित न राहता पोलिसांचा खाकी शर्ट-पँट हा गणवेशही बदलला आहे. पुरुषांसाठी भगवे धोतर-कुर्ता असा गणवेश तर महिला पोलिस भगव्या सलवार-कमीजमध्ये दिसत आहेत.
काशी विश्वनाथ मंदिराच्या सुरक्षेत नियुक्त पोलिसांना गणवेशात बदल करण्याचे औपचारिक निर्देश वाराणसीचे नवे पोलिस आयुक्त मोहित अग्रवाल यांनी दिले होते. वाराणसी येथे झालेल्या मंदिराच्या सुरक्षा आढावा बैठकीत अग्रवाल यांनी तेथील पोलिसांच्या गणवेशात बदल करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर अवघ्या २४ तासांत मंदिरातील पोलिस नव्या भगव्या पोशाखात दिसले तेव्हाच याबाबतचे वृत्त सर्वत्र पसरले. ‘‘मी सकाळी नेहमीप्रमाणे मंदिरात दर्शनासाठी गेलो, तेव्हा मुख्य मंदिराच्या आत मला कोठेही पोलिस दिसले नाहीत. चौकशी केल्यावर पोलिसांचा गणवेश बदलला आहे, असे मला सांगण्यात आले,’’ असे मंदिराच्या परिसरात राहणाऱ्या आणि विश्वनाथाच्या दर्शनासाठी दररोज मंदिरात येणाऱ्या एका स्थानिकाने दूरध्वनीवरून प्रतिनिधीला सांगितले. ‘‘अशा बदलाने मंदिराच्या सुरक्षेसाठी काय फायदा होणार आहे हे मला समजले नाही; गर्दीचे नियंत्रण करताना किंवा नियमन करणाऱ्या खाकीतील पोलिसांकडे जेथे कोणी लक्ष देत नाही, तेथे आता भगवे कपडे घातलेल्या या मंडळींचे कोण ऐकणार?,’’ असा प्रश्न वाराणसीतील या भाविकाने केला. पण ही बाब एकतर सरकारी यंत्रणांना कळत नाही किंवा ज्यांच्या हाती अधिकार आहेत ते राजकीय वरिष्ठांना खूष करण्यात मश्गूल आहे, असा याचा अर्थ निघतो.
भगव्या गणवेशाच्या निर्णयाचा ‘यूपी’तील पोलिस दलातील अनेकांना धक्का बसला असून राज्यात याची खिल्ली उडवली जात आहे, तर काही पोलिस मात्र या बदलावर आनंद व्यक्त करीत आहेत. ‘राजापेक्षा अधिक निष्ठावंत’ म्हणून स्वत:ला सिद्ध करण्याची ही धडपड आहे, अशी भावना सर्वसामान्यांमध्ये आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भगवेपणाबद्दलच्या भावना लक्षात घेऊन त्यांचे लांगूलचालन करणाऱ्यांनी हा निर्णय घेतला, यात कोणतेही आश्चर्य नसले तरी राज्यातील समान गणवेशाच्या नियमांचे हे उल्लंघन आहे. ‘‘प्रत्येक राज्यात पोलिसांना गणवेशासाठी स्वतःचे नियम लागू करण्याचा अधिकार आहे. परंतु जर गणवेशात कोणताही बदल करायचा असला तर तो एखादा अधिकारी किंवा राजकारण्याच्या लहरीनुसार, आवडीनुसार नाही तर ठराविक प्रक्रियेद्वारे केला जाऊ शकतो,’’ असे मत मध्य प्रदेशचे माजी पोलिस महासंचालक आणि माजी केंद्रीय माहिती आयुक्त यशोवर्धन आझाद यांनी व्यक्त केले. यूपी’चे माजी पोलिस महासंचालक व्ही.एन.राय यांच्यमते मंदिराच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या सर्व पोलिसांना अशा प्रकारचा गणवेश घालण्याचे निर्देश देण्याने काहीही साध्य होणार नाही. गणवेश बदलाचा हा निर्णय नियमाचे उल्लंघन करणारा आहेच, शिवाय भारतीय राज्यघटनेचेही हे उल्लंघन आहे, अशी प्रतिक्रिया भारत सरकारचे निवृत्त सचिव व माजी आयएएस अधिकारी विजय शंकर पांडे यांनी दिली. ते म्हणाले,‘‘आपल्यासारख्या धर्मनिरपेक्ष, लोकशाही राष्ट्रातील लोकांना यातून चुकीचा संदेश जातो; वरिष्ठ पातळीवरील आदेशानुसार हे केले असले तरी अशा घटनाबाह्य आदेशांना नाही म्हणणे हे पोलिस अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे. अशा प्रकारचे बदल ताबडतोब थांबवावेत; अन्यथा, काही काळानंतर असे पोशाख परिधान केलेले पोलिस पुजाऱ्यांप्रमाणे वागू लागतील आणि त्यांचे मूळ कर्तव्य मागे पडले तर याचे आश्चर्य वाटू नये.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.