पंजाबमधील (Punjab) सर्व ११७ आणि उत्तरप्रदेशात (Uttar Pradesh) तिसऱ्या टप्प्यातील ५९ जागांसाठी आज मतदान सुरु आहे..
नवी दिल्ली - पंजाबमधील (Punjab) सर्व ११७ आणि उत्तरप्रदेशात (Uttar Pradesh) तिसऱ्या टप्प्यातील ५९ जागांसाठी आज मतदान सुरु आहे. या दोन्ही राज्यांमध्ये बहुरंगी लढत पाहायला मिळत आहेत. पंजाबमध्ये काँग्रेस तर उत्तर प्रदेशात भाजप सत्ताधीश आहे. पंजाबमध्ये साधारणपणे सकाळी आठ ते सायंकाळी सहादरम्यान तर उत्तरप्रदेशात सकाळी सात ते सायंकाळी सहादरम्यान मतदान होईल, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सर्व ठिकाणची मतमोजणी १० मार्च रोजी पार पडेल.
आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत झालेल्या मतदानानंतर उत्तर प्रदेशमध्ये 57.44% तर पंजाबमध्ये 63.44% मतदान झालं आहे.
पंजाब : सोनू सूदला मतदान केंद्रावर जाताना रोखलं
अभिनेता सोनू सूदला मतदान मोंगा येथील मतदान केंद्रावर जाण्यापासून रोखण्यात आलं. सोनूची बहिण काँग्रेसच्या तिकीटावर या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे.
पंजाब : दुपारी एक वाजेपर्यंत ३० टक्के मतदान
दुपारी एक वाजेपर्यंत पंजाबमध्ये ३० टक्के मतदान पार पडलं आहे. याची माहिती देताना माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ही चांगली बाब असल्याचं म्हटलं आहे.
पंजाब : मुख्यमंत्री चन्नींनी बजावला मतदानाचा हक्क
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी खरार मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. ते चामकौर साहिब आणि भदौर या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
काही ठिकाणी मतदानावर बहिष्कार...
ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यानं काही ठिकाणी मतदान उशिराने सुरू झालं. काही ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावरून लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. महोबा, ललितपूर, हाथरस, तुंडला याठिकाणी विकास काम न झाल्यानं लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. हाथरसच्या नागला बिहारीमध्ये ग्रामस्थांनी मतदान थांबवलं. सकाळी 10 वाजेपर्यंत फक्त 4 मतदारांनी मतदान केलं होतं. ललितपूरमधील 5 गावात दुपारी 12 वाजेपर्यंत एकही मतदान झाले नाही.
उत्तर प्रदेशात मंत्री सतिश महाना यांची कानपूरमधील एका मतदान केंद्रावर सीआरपीएफ जवानाशी झटापट झाली. कार्यकर्त्यांनी आरोप केला की, सीआरपीएफ पोलिसाने गोळीबार केला. यावर मंत्र्यांनी जावून जवानाला इशारा दिला. बराच काळ दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.
पंजाबमध्ये काँग्रेस, आप, शिरोमणी अकाली दल- बसप, भाजप आणि संयुक्त समाज मोर्चाप्रमाणे विविध संघटना आणि पक्ष मैदानात उतरले आहेत. पंजाबमध्ये २ कोटी १४ लाख मतदार असून ते १ हजार ३०४ उमेदवारांचे भवितव्य ठरवतील, यावेळी ९३ महिला उमेदवार देखील मैदानात उतरल्या आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी, आपचे भगवंत मान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू, माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि प्रकाशसिंग बादल आणि शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल आदी दिग्गज मंडळी निवडणूक लढवीत आहेत.
उत्तरप्रदेशात सोळा जिल्ह्यांतील ५९ मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडणार आहे. येथे ६२७ उमेदवार मैदानात असून २ कोटी १५ लाख लोक मतदानाचा हक्क बजावतील. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या करहाल मतदारसंघात याच टप्प्यात मतदान होणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.