Rajyasabha Election : अखिलेशची‘डुलकी’ अन् भाजपची ‘गुगली’; सात आमदारांना फोडून भाजपने दिला मोठा धक्का

उत्तर प्रदेशमध्ये राज्यसभा निवडणुकीत भाजपने आठ जागा जिंकत माजी मुख्यमंत्री व समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर सहज मात केली.
akhilesh yadav
akhilesh yadavsakal
Updated on

लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये राज्यसभा निवडणुकीत भाजपने आठ जागा जिंकत माजी मुख्यमंत्री व समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर सहज मात केली. भाजपने हे यश अखिलेश यांच्या अंगावरील पांघरून हिसकावण्यासारखे आहे. त्यांच्या सात निष्ठावंत आमदारांना फोडून भाजपने मोठा धक्का दिला आहे.

‘सप’च्या सात आमदारांनी राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना खुलेआम मतदान करून भाजपप्रती त्यांची ‘निष्ठा’ दाखवून दिली आहे. यामुळे भाजपच्या अतिरिक्त आठव्या जागेवरील उमेदवार संजय सेठ यांचा विजय सोपा झाला. सेठ हे बांधकाम व्यावसायिक असून सुरुवातीला समाजवादी पक्षाशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते.

राज्यसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपने आखलेल्या रणनीतीकडे अखिलेश यादव यांनी डोळेझाक केली असेच आता म्हणावे लागेल. राज्यसभेसाठी उत्तर प्रदेशमधील सत्ताधारी भाजपकडे निर्धारित सात जागा होत्या. त्‍यांनी आणखी एका जागा लढविण्याचा निश्‍चय केला आणि या आठव्या अतिरिक्त जागेसाठी सेठ यांना मैदानात उतरविले. या सर्व घडामोडींनंतर अखिलेश यांनी सावध होण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष केले.

आमदारांवर अतिविश्‍वास नडला

‘सप’च्या ज्या सात आमदारांनी भाजपला साथ दिली त्यांच्या हालचालींकडेही अखिलेश यादव यांनी लक्ष न देता अतिविश्‍वास ठेवला. यामध्ये पक्षाचे मुख्य प्रतोद मनोजकुमार पांडे यांचे नाव प्रकर्षाने घ्यावे लागेल. निवडणुकीच्या आदल्या रात्री भोजन समारंभाला तीन आमदारांनी दांडी मारली, तेव्हा काहीतरी गडबड असल्याचे अखिलेश यादव यांना जाणवले. मात्र आणखी चार आमदार त्यांच्या निष्ठा बदलण्याच्या तयारीत आहे, याचे आकलन त्यांना झालेच नाही.

उमेदवारीचे गणित चुकले

अखिलेश यांच्या ‘मागास दलित अल्पसंख्याक’ या निकषाशी रंजन व जया बच्चन यांच्या उमेदवारीच्या निर्णयाचे गणित जुळत नसल्याने या दोघांच्या उमेदवारीवर टीका झाली होती. ‘सप’च्या तीन उमेदवारांपैकी रामजी लाल सुमन (वय ८३) हेच या निकषात बसत होते. ते दलित समाजाचे नेते असून जया बच्चन आणि रंजन हे कायस्थ या उच्च वर्गातील आहे. या दोघांऐवजी अखिलेश यांनी मागास आणि मुस्लीम समाजातील प्रमुख नेत्यांना संधी द्यायला हवी, असे मत व्यक्त होत होते.

‘इंडिया’ आघाडीसाठीही इशारा?

समाजवादी पक्षातील मतभेदांमुळे त्यांचे सात आमदार भाजपकडे वळविणे सोपे गेले. मात्र त्यांच्या पक्षांतराचे हे एकमेव कारण नाही. असंतुष्टांसाठी भाजपने त्यांचे दरवाजे खुले केलेले आहेत, हेही तितकेच खरे आहे. भाजपची प्रचंड क्षमता कोणाला माहीत नाही? तरीही अखिलेश यादव यांची राजकीय डुलकी हा सध्या आश्‍चर्याचा आणि टीकेचा विषय बनला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केवळ समाजवादी पक्षातच नाही तर ‘इंडिया’ आघाडीत झाल्यास काय होऊ शकते, हे पुढे समजेलच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.