राज्य-मिती : उत्तराखंडमध्ये भाजपची हॅट्ट्रिक, की काँग्रेसची सरशी?
Lok Sabha 2024 Uttarakhand : उत्तराखंडच्या स्थापनेनंतर येथे सुरुवातीला काँग्रेसची सत्ता होती. मात्र मागील दहा वर्षांपासून राज्यात भाजप सत्तेत आहे. लोकसभेच्या मागील दोन्हीही निवडणुकांत राज्यातील पाचही मतदारसंघात भाजपने बाजी मारली आहे. भाजपच्या राज्यातील सरकारविषयी नाराजी असली तरीही येथे मोदींचा करिष्मा कायम आहे. त्यामुळेच भाजप हॅटट्रिक करणार की, काँग्रेस त्याला भगदाड पाडणार, हे पाहावे लागणार आहे.
- अभय सुपेकर
सध्या भाजपचे नेते पुष्करसिंह धामी हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. उत्तराखंडमध्ये पर्यटन, विकास आणि पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जलविद्युत प्रकल्प उभे करण्यात आले आहेत. तसेच चारधाम योजनेसह अनेक महामार्गांची, बोगद्यांचीही उभारणी सुरू आहे. मात्र यामुळे पर्यावरणविषयक समस्या आणि अपघातांचे प्रमाण वाढत आहे. एकीकडे विविध प्रकल्प सुरू असूनही राज्यातील जनता बेरोजगारी संपवण्यासाठीच्या उपाययोजनांची मागणी करत आहे. त्यामुळे यावेळी प्रचारात बेरोजगारी, स्थलांतर, राज्य सरकारचा भ्रष्ट कारभार, डोंगर खचण्याने जोशीमठ शहराचे धोक्यात आलेले अस्तित्व आणि भूस्खलनामुळे विकासकामांचा उडणारा बोजवारा असे मुद्दे आहेत.
विविध नोकरभरती परीक्षांचे पेपर फुटण्याचे प्रकार आणि अग्निवीर योजनेमुळे युवकांचे भंगलेले स्वप्न यावरही प्रचारात विचारणा होत आहे. गेल्या काही वर्षांत राज्यात हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण झाले आहे. त्याचप्रमाणे समान नागरी कायद्यासाठी राज्याने उचललेली पावले आणि ‘सीएए’चा निर्णय याचेही पडसाद निवडणुकीत उमटू शकतात. शिवाय, भाजपच्या मंत्र्याच्या रिसॉर्टवर अंकिता भंडारी या युवतीच्या खुनाची घटनाही पुन्हा-पुन्हा चर्चेत येत आहे.
चित्र मतदारसंघाचे
माला राज्यलक्ष्मी शहा या टिहरी गढवाल मतदारसंघातून चौथ्यांदा खासदारकीसाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्यासमोर काँग्रेसने मसुरीचे आमदार जोतसिंह गुंन्सोला यांना उतरवले आहे. या मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराविरोधात वातावरण असल्याचे बोलले जात आहे. बेरोजगार संघाचे प्रमुख आणि युवा चेहरा अशी ओळख असलेले बॉबी पवार हेही निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उतरले आहेत. त्याचे आव्हान कोणत्याच राजकीय पक्षाला दुर्लक्षित करता येणार नाही.
पौडी गढवालमधून भाजपने यावेळी विद्यमान खासदार तिरथसिंह रावत यांना घरचा रस्ता दाखवला असून, त्यांच्या ऐवजी पक्षातील युवा नेते आणि राज्यसभा सदस्य अनिल बलुनी यांना संधी दिली आहे. अल्मोडा राखीव मतदारसंघातून भाजपचे अजय टमटाविरुद्ध काँग्रेसचे प्रदीप टमटा अशी पारंपरिक लढत होणार आहे. नैनिताल-उधमसिंहनगर मतदारसंघात भाजपचे खासदार अजय भट्ट विरुद्ध काँग्रेसचे प्रकाश जोशी अशी लढत होईल. या मतदारसंघात मुस्लिम, शिख तसेच अनुसूचित जाती-जमातीच्या मतदारांची संख्या मोठी आहे.
केंद्रात मंत्रिपदावर राहिलेल्या रमेश पोखरियाल निःशंक यांच्याऐवजी भाजपने माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांना हरिद्वारमधून उमेदवारी दिली असून, काँग्रेसने त्यांच्याविरोधात वीरेंद्र रावत यांना रिंगणात उतरवले आहे. ते माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचे पुत्र आहेत. खानपूरचे आमदार उमेशकुमार अपक्ष रिंगणात आहेत. मायावती यांच्या बहुजन समाज पक्षानेही पाचही मतदारसंघात उमेदवार उतरवले आहेत. मात्र राज्यात भाजपविरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होईल असे मानले जाते. राज्यात येत्या १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
काँग्रेसने भाजपसमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला असला तरी मतदानाची वेळ जवळ येत असूनही काँग्रेसमधील नेत्यांचे पक्षांतर थांबण्याचे नाव घेत नाही. शिवाय, काँग्रेसला प्रचारसाहित्यासह कार्यकर्त्यांचीही कमतरता भासत आहे. भाजपचे उमेदवार रिंगणात असले तरी नरेंद्र मोदी विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार असेच निवडणुकीचे चित्र भाजपकडून तयार करण्याचा प्रयत्न आहे.
स्थलांतरामुळे डोकेदुखीत वाढ
गेल्या दशकभरात उत्तराखंडमधील सुमारे चार लाख लोकांनी स्थलांतर केले आहे, विशेषतः पर्वतीय भागात त्याचे प्रमाण अधिक आहे. राज्यातील सुमारे ८३ लाख मतदारांपैकी दहा टक्के मतदारांनी रोजगारासह विविध कारणांनी इतरत्र स्थलांतर केले आहे.या स्थलांतरितांना मतदानास कसे प्रवृत्त करायचे, हेदेखील उमेदवारांसमोर एक मोठे आव्हान आहे.
चित्र निवडणुकीचे
विधानसभा पक्षीय बलाबल
एकूण जागा ७०
भाजप ४७
काँग्रेस १९
बसप २
अपक्ष २
या उमेदवारांपैकी २३ उमेदवार कोट्यधीश आहेत. टिहरी गढवालमधील भाजपच्या उमेदवार माला राज्यलक्ष्मी शहा या सर्वात श्रीमंत असून, त्यांची स्थावर मालमत्ता दिडशे कोटींची आणि एकूण मालमत्ता २०६कोटी आहे. गढवालमधील रेशमा पवार सर्वात गरीब आहेत.
मतदारसंघनिहाय उमेदवार (एकूण ५५)
टिहरी - ११
अल्मोडा - ७
नैनिताल - १०
पौडी गढवाल - १३
हरिद्वार - १४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.