नवी दिल्ली : उत्तराखंड राज्यातील मुख्यमंत्री पदाची खुर्ची टिकवून ठेवणं तितकसं सोपं नाही. उत्तराखंड राज्य नव्याने निर्माण होऊन अद्याप 20 वर्षेही पूर्ण झाले नाहीत. तोवर याठिकाणी तब्बल 11 वेळा मुख्यमंत्री बदलले गेले आहेत. यामध्ये नारायण दत्त तिवारी हे एकच असे मुख्यमंत्री होते, ज्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला. पण, उर्वरित मुख्यमंत्र्यांपैकी असा एकही मुख्यमंत्री नव्हता, जो आपला कार्यकाळ पूर्ण करु शकला. आणि याचं कारण मानलं जातंय ते म्हणजे मुख्यमंत्री निवास.... अर्थात मुख्यमंत्र्यांचा बंगला....काय आहे नेमकी भानगड...?
उत्तराखंडमध्ये भाजप पक्षातील अंतर्गत कलहामुळे काल मंगळवारी त्रिवेंद्र सिंह रावत यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. सरकारचे पूर्ण चार वर्षे व्हायच्या आधीच त्यांना आपली खुर्ची रिकामी करावी लागली. आणि उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदी आता भाजप खासदार तीरथ सिंह रावत यांची निवड झाली आहे. 70 जागा असलेल्या उत्तराखंडच्या विधानसभेत भाजपकडे 57 जागा आहेत, मात्र तरीही आता त्रिवेंद्र सिंह रावत देखील उत्तराखंडच्या त्या 10 मुख्यमंत्र्यांच्या यादीत जाऊन बसले आहेत, ज्यांना आपला कार्यकाळ पूर्ण करत आला नाहीये. याचं कारण म्हणून सध्या काही वेगळ्याच वावड्या उठत आहेत. लोकांच्या म्हणण्यानुसार, याचं महत्त्वपूर्ण एक कारण म्हणजे मुख्यमंत्री निवास हे आहे. हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल मात्र, उत्तराखंडच्या राजकीय चर्चाचर्वणामध्ये मुख्यमंत्र्यांचा हा बंगला अशुभ मानला जातो.
उत्तराखंडच्या इतिहासात मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ असा अर्धवट राहण्याचा मुख्य दोष हा त्या बंगल्याच्या माथ्यावर फोडला जातो. लोकांचं असं म्हणणं आहे की, या बंगल्यात राहणारा कुठलाच मुख्यमंत्री आपला कार्यकाळ पूर्ण करु शकत नाही. याच कारणामुळे काँग्रसचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत देखील अधिकृतरित्या मुख्यमंत्री बंगल्यात न राहता राज्य सरकारच्या एका गेस्ट हाऊसमध्ये रहायचे. त्यांच्या या निर्णयानंतर तर या अंधश्रद्धेला आणखीनच बळकटी मिळाल्याचं दिसून आलं.
मात्र, 2017 मध्ये मुख्यमंत्री पदी आलेल्या त्रिवेंद्र सिंह रावत यांचा या अफवेवर विश्वास नव्हता. त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर म्हटलं होतं की त्यांच्या मनात बंगल्याबद्दल कसल्याही प्रकारची शंका अथवा भीती नाहीये. त्यांनी स्पष्ट केलं होतं की, मुख्यमंत्री म्हणून ते याच अशुभ म्हणवल्या जाणाऱ्या बंगल्यातच राहतील. आपल्या चारही वर्षांच्या कार्यकाळात ते याच बंगल्यात राहिले होते. उत्तराखंडमधील अधिकृत मुख्यमंत्री निवास पारंपारिक पहाडी स्टाईलने डिझाईन केलं गेलं आहे. 2010 मध्ये जवळपास 16 कोटी रुपये खर्चून यांचं बांधकाम करण्यात आलं होतं. 10 एक्करमध्ये पसरलेला हा बंगला नेहमीच रिकामा राहिला आहे. कारण अशुभ असल्याच्या अंधश्रद्धेमुळे तिथे राहण्यास कुणी धजावलाच नाही. डॉ. रमेश पोखरियाल, भुवन चंद्र खंडूरी तसेच विजय बहुगुणा देखील आपला कार्यकाळ पूर्ण करु शकले नव्हते. पण आता उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत या बंगल्यात राहण्याबाबत काय निर्णय घेतात, याची खुमासदार चर्चा देखील रंगू लागली आहे.
तब्बल 57 जागा जिंकलेल्या भाजपचं सरकार स्थिर असेल असा दावा केला जात होता. मात्र पुन्हा एकदा रावत यांच्या राजीनाम्याने सर्व काही ठीक नसल्याचं समोर आलं आहे. एक वर्षाचा कार्यकाळ उरला असताना राज्यात मुख्यमंत्री बदलल्यानं सत्तेच्या संगीत खुर्चीचा खेळ सुरुच आहे. उत्तराखंडमध्ये राजकीय नेत्यांची असलेली महत्वकांक्षाच याला कारणीभूत असल्याचं म्हटलं जात आहे. लहान राज्य असल्यानं प्रत्येकाची नजर ही मुख्यमंत्रीपदावर आहे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला मुख्यमंत्रीपद हवंच अशी इच्छा इथले नेते बाळगून असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.