नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ‘स्टार प्रचारकांची‘ यादी निश्चित केली आहे. त्यात पक्षाचे सारे नेते उत्तर प्रदेशात आणखी आक्रमकपणे उतरणार असल्याचे हे चिन्ह आहे. यादीत गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदी बड्या नावांचाही समावेश आहे. मात्र लखीमपूर खेरी शेतकरी हत्याकांड प्रकरणात आरोप असलेले केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा समावेश यादीत नाही. (Uttarpradesh Assembly Election Updates)
उत्तर प्रदेशात १० फेब्रुवारीला पहिल्या व १४ फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. शेतकरी आंदोलनाचा जोर होता, त्या पश्चिम उत्तर प्रदेशातील बहुतांश मतदारसंघ पहिल्या टप्प्यातच आहेत.आग्रा, मथुरा, शामली, मुझफ्फरनगर, बागपत, मीरत, गाझियाबाद, गौतमबुद्ध नगर (नोएडा व ग्रेटर नोएडा), हापुड़, अलीगड व बुलंदशहर या प्रमुख मतदारसंघांत या टप्प्यात मतदान होणार आहे.
आयोगाने २२ जानेवारीपर्यंत सभा व फेऱ्यांवर बंदी घातली आहे. तथापि त्यानंतर भाजपचे सारे बडे नेते उत्तर प्रदेश पिंजून काढणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हर्च्युअल सभांचा व अमित शहा तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे प्रत्यक्ष राज्यात फिरून प्रचाराचा धडाका उडवून देतील. पंतप्रधान एका दिवसाआड व्हर्च्युअल सभा घेऊन राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघांतील मतदार व पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधतील.
राज्यात अनेक जाहीर सभांनाही मोदी संबोधित करतील. शहा याच काळात राज्याच्या संपूर्ण जिल्ह्यांत प्रत्यक्ष फिरून संघटनात्मक बांधणी चोख राहील याची दक्षता घेतील. त्यांच्यासह योगी आदित्यनाथ व अन्य नेत्यांच्या जाहीर सभा, प्रचार फेऱ्यांचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.
पाचही राज्यांच्या प्रचाराची बड्या नेत्यांवर जबाबदारी
भाजपच्या स्टार प्रचारक यादीत स्मृती इराणी, नितीन गडकरी, धर्मेंद्र प्रधान, मुख्तार अब्बास नक्वी, साध्वी निरंजन ज्योती, संजीव बालियान आदी केंद्रीय मंत्री आहेत. तसेच खासदार हेमामालिनी, जनरल व्ही. के. सिंह, सुरेंद्र नागर, चौधरी भूपेंद्र सिंह तसेच केशव प्रसाद मौर्य यांचेसह यूपीचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह दोन्ही उपमुख्यमंत्री व अनेक प्रमुख नेत्यांचाही यादीत समावेश आहे.
भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत ३० प्रमुख नेत्यांची नावे आहेत. ही यादी पहिल्या २ टप्प्यांतील भाजपच्या प्रचाराच्या दृष्टीने तयार करण्यात आली आहे. मात्र भाजपमधून अशी अधिकृत यादी तयार केल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही. पंतप्रधान मोदी, शहा, राजनाथसिंह , गडकरी आदी प्रमुख नेत्यांना पाचही राज्यांच्या निवडणूक प्रचाराची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे हे पक्षसूत्रांनी स्पष्ट केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.