Vadhavan Port : वाढवण बंदराला केंद्र सरकारची मंजुरी; पहिला टप्पा होणार २०२९ पर्यंत पूर्ण

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वाढवण बंदराला ‘मोदी पर्व-३’च्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देऊन महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
Vadhavan Port
Vadhavan PortSakal
Updated on

नवी दिल्ली - पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वाढवण बंदराला ‘मोदी पर्व-३’च्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देऊन महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जवळपास ७६ हजार २०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प दोन टप्प्यांत पूर्ण होणार असून पहिला टप्पा २०२९ मध्ये पूर्ण होईल. यातून १२ लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. यात देशाच्या विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या निर्णयांची माहिती केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. यात १४ पिकांच्या किमान हमी भावात भरघोस वाढ करण्यात आली आहे. वाराणसी येथील विमानतळाचा विस्तार केला जाणार आहे. नवीनीकरण ऊर्जेच्या क्षेत्रात गुजरात व तमिळनाडूमध्ये ‘ऑफशोअर विंड टर्मिनल’ विकसित केले जाणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेण्यापूर्वी १०० दिवसांच्या कामाचा ‘रोड मॅप’ तयार करण्याचे निर्देश प्रत्येक मंत्रालयाला दिले होते. त्यानुसार आज महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या संदर्भात निर्णय घेण्यात आले आहेत. बंदरे व शिपिंगच्या क्षेत्रात एक आधुनिक बंदर महाराष्ट्रात निर्माण केले जाणार आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून केवळ १५० किलोमीटर अंतरावर असलेल्या या बंदराच्या निर्मितीनंतर जगातील पहिल्या दहा बंदरामध्ये या बंदराचा समावेश होईल.

वाढवणमध्ये कंटेनर हाताळणीची क्षमता २३ दशलक्ष टीईयूएस, तर मालवाहतूक करण्याची क्षमता २९८ दशलक्ष टन असणार आहे. हे बंदर जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पोर्ट प्राधिकरण व महाराष्ट्र मेरीटाइम मंडळाच्या संयुक्त विद्यमाने विकसित केले जाणार आहे. या बंदराच्या निर्मितीसाठी वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेडची (व्हीपीपीएल) स्थापना केली जाणार आहे.

यात केंद्र सरकारचा हिस्सा हा ७६ टक्के तर महाराष्ट्र सरकारचा हिस्सा हा २४ टक्के असेल.

सार्वजनिक व खासगी भागीदारीतून (पीपीपी) याची निर्मिती होणार आहे. या ठिकाणी पाण्याची नैसर्गिक खोली २० मीटर एवढी आहे, त्यामुळे याठिकाणाची निवड करण्यात आली आहे. नैसर्गिक खोली असल्यामुळे या बंदरात मोठे जहाज सुद्धा नांगर टाकू शकेल. या बंदराच्या निर्मितीसाठी या प्रकल्पाशी संबंधित सर्व घटकांशी चर्चा करण्यात आल्याचा दावा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला.

वैशिष्ट्ये

- पश्‍चिम आशिया आणि युरोपमधील आर्थिक कॉरिडॉरशी याद्वारे व्यापार

- वाढवण बंदरापासून प्रमुख रेल्वेस्थानक व महामार्ग १२ किलोमीटरवर

- सार्वजनिक व खासगी भागीदारीतून निर्मिती होणार

असे असेल बंदर

  • ७६,२०० कोटी प्रकल्पाचा खर्च

  • १२ लाख रोजगार निर्मिती

  • १००० मीटर टर्मिनलची लांबी

  • २३ दशलक्ष टीईयूएस बंदराची क्षमता

  • ९ कंटेनर टर्मिनल

  • १४४८ हेक्टर समुद्रात करण्यात येणारे बांधकाम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.