BJP Campaign : भाजपच्या आगामी निवडणुक प्रचारासाठी दौडणार ‘सात’; विनोद तावडेंना महत्त्वाचे स्थान

चार राज्यात होणारी विधानसभा निवडणूक आणि पुढील वर्षीची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाने तयारी सुरू केली आहे.
BJP Star preacher
BJP Star preachersakal
Updated on

नवी दिल्ली - देशभरात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. या वर्षअखेरीस चार राज्यात होणारी विधानसभा निवडणूक आणि पुढील वर्षीची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाने तयारी सुरू केली आहे. प्रचार, प्रशिक्षणावर भर दिला जात आहे.गेल्या काही निवडणुकांपासून भाजपने निवडणूक आणि निवडणुकीसंबंधी पक्षकार्याची जबाबदारी महत्त्वाच्या नेत्यांकडे सोपविलेली आहे.

निवडणूक रणनीतिकार म्हणून भाजपच्या गाभा समितीत पक्षाच्या सरचिटणीसांपासून वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. निवडणूक प्रचार, जबाबदारीचे वाटपापासून उमेदवार निवडीपर्यंतची सर्व सूत्र समितीमधील रथी-महारथी हलवितात. देशात २०२४ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ही समिती कामाला लागलेली आहे. भाजपचे सरचिटणीस हे पक्षाचे काम वर्षभर करीत असतात. मंत्र्यांकडील राज्यांची जबाबदारी निश्‍चित झाली की तेही कार्यरत होतील.

प्रमुख रणनीतिकार (केंद्रीय मंत्री)

धर्मेंद्र प्रधान - केंद्रीय मंत्री असलेले धर्मेंद्र प्रधान यांना संघटनात्मक कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. यशस्वी निवडणूक व्यवस्थापक म्हणून त्यांची पक्षात ओळख आहे. यापूर्वी अनेक राज्यांमधील निवडणूक यंत्रणांची सूत्रे सोपविण्यात आलेली होती. पक्षातील शेवटच्या फळीतील नेते व तळागाळातील कार्यकर्त्यांशी संवाद ही त्यांची जमेची बाजू आहे.

उत्तर प्रदेशमधील निवडणूक प्रचारात यश मिळाल्यानंतर गेल्या वेळी त्यांच्यावर कर्नाटक विधानसभेची जबाबदारी सोपविण्यात आली होती. ज्या राज्यामधील स्थानिक वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी सूर उमटलेला दिसला त्यानंतर तेथील जबाबदारी प्रधान यांच्याकडे सोपविण्यात आली होती. तेथील मतभेद मिटवून एकदिलाने पक्ष विरोधकांना सामोरा जाण्यासाठी त्यांनी शिष्टाई केली.

भूपेंद्र यादव - केंद्रीय मंत्रिमंडळात यादव यांचा २०२१ मध्ये समावेश झाला. त्याचबरोबर पक्षातील निवडणूक व्यवस्थापनातील त्यांचा सहभागही कायम राहिला. भाजपसाठी सर्वांत महत्त्वपूर्ण असलेल्या मध्य प्रदेशची जबाबदारी त्यांच्याकडे सध्या आहे. महाराष्ट्र, मणिपूर, गुजरात, राजस्थान, बिहार, तेलंगण ही राज्ये त्यांच्याकडे सोपविण्यात आलेली होती.

मध्य प्रदेशमधील निवडणूक प्रभारी म्हणून त्यांचे नाव जाहीर झाल्यानंतर त्यांनी राज्यातील सर्व सूत्रे हाती घेतली आणि व्यक्तीनिहाय भेटीगाठी सुरू केल्या. सध्या यादव हे बराच काळ राज्यात घालवितात. निवडणूक प्रचार आणि उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करीत आहे. निवडणुकीच्या आघाडीवर राज्याचा आढावा ते नियमितपणे घेऊन राष्ट्रीय आणि राज्यातील नेतृत्वामधील दुवा म्हणून ते काम करीत आहे.

मनसुख मंडाविया - देशातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या यशामुळे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांचे नाव सतत चर्चेत असते. भाजपच्या निवडणूक चमूत त्यांचा नव्याने समावेश झालेला आहे. कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत ते सहप्रभारी होते. छत्तीसगडचे प्रभारी ओम माथूर यांना ते सहकार्य करीत आहेत. तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी हे दोन्ही नेते राज्याला वारंवार भेट देत आहेत.

अश्‍विनी वैष्णव - मंडाविया यांच्याप्रमाणेच रेल्वे मंत्री अश्‍विनी वैष्णव हे भाजपच्या निवडणूक चमूतील नवा चेहरा आहे. मध्य प्रदेशमध्ये भूपेंद्र यादवांचे सहकारी आहेत. पक्षाचा प्रचार आणि प्रसिद्धी तंत्राच्या नियोजनात त्यांचा सहभाग आहे. तेथे लोकांच्या विविध गटांशी ते बंद दारआड बैठका घेऊन त्यांची मते जाणून घेत आहेत.

प्रमुख सरचिटणीस

सुनील बन्सल - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक असलेल्या सुनील बन्सल यांच्या खात्यात भाजपला उत्तर प्रदेश मिळालेले यश जमा आहे. गेल्या काही वर्षांत त्यांनी पक्षाचे तळागाळातील संघटन मजबूत केले आहे. गेल्या दोन निवडणुकीत भाजपला राज्यात मिळालेल्या या यशात बन्सल यांच्या अथक प्रयत्नांचा मोठा वाटा आहे.

पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या विश्‍वासामुळे राज्यातील सरचिटणीसपदावरून त्यांना राष्ट्रीय सरचिटणीसपदी बढती मिळाली व महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही त्यांच्यावर सोपविण्यात आल्या. पश्‍चिम बंगाल, ओडिशा आणि तेलंगण अशा राज्यांचे प्रभारी आहेत. तीन राज्यांचा कार्यभार सांभाळणारे भाजपचे ते एकमेव सरचिटणीस आहेत.

२०२४ मधील लोकसभा निवडणुकीतील नियोजनात त्‍यांचा सहभाग आहे. भाजपच्या राष्ट्रीय पातळीवरील कॉल सेंटरसाठी स्थापन केलेल्या समितीचे ते सदस्य आहेत. ‘माझी माती माझा देश’ या उपक्रमाची जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर आहे.

तरुण चुग - ‘आरएसएस’च्या मुशीतील चुग यांची भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती होण्याआधी पंजाबमध्ये पक्षासाठी काम केले. ते तेलंगण आणि जम्मू-काश्‍मीरचे प्रभारी आहेत. याशिवाय पंतप्रधानांचे देशभरातील कार्यक्रम आणि सभांचे नियोजन त्यांच्याकडे असते. सध्या चुग यांनी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले असून ‘विधायक विस्तारक योजने’ची आखणी ते करीत आहेत.

विनोद तावडे - महाराष्ट्रातील अनुभवी भाजप नेते अशी प्रतिमा असलेले विनोद तावडे यांची २०२१ मध्ये राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. याआधी महाराष्ट्रात विरोधी पक्षनेत्यापासून कॅबिनेट मंत्रिपद त्यांनी भूषविलेले आहे. राष्ट्रीय सरचिटणीसपदाच्या दोन वर्षांच्या कालावधीत तावडे यांनी पक्षाच्या नेतृत्वाचा विश्‍वास संपादन केलेला आहे. पक्षाच्या मोठ्या नियोजनात त्यांचा समावेश नाही, असे क्वचित घडले आहे.

ज्या लोकसभा मतदारसंघात भाजप कमकुवत आहे, तेथे पक्षासाठी मोहीम राबविण्यावर त्यांचा भर आहे. यामध्ये ‘हर घर तिरंगा’, ‘माझी माती माझा देश’, २०२४ साठी देशभरातील कॉल सेंटर, कार्यकर्ता संवाद आदी योजनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.