धामुपूर (जि. गाझीपूर, उत्तर प्रदेश) : पाकिस्तानबरोबर १९६५ मध्ये झालेल्या युद्धात पॅटन रणगाड्यांची धुळधाण उडविणारे हुतात्मा जवान अब्दुल हमीद यांचे जन्मगाव धामुपूर हे गाझीपूरपासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर. ‘‘गावच्या प्रधानाला (सरपंच) पाच वर्षे मिळतात आणि अग्निवीराला चारच वर्षे मिळणार असतील तर त्यासाठी कोण तयारी करणार’’, ही धामुपूरच्या अब्दुल हमीद यांच्या स्मारकस्थळी आलेल्या दुल्लाहपूरच्या मनोज यादव या तरुणाची प्रातिनिधिक व्यथा यंदाच्या निवडणुकीत ‘अग्निवीर’ योजनेची ‘अग्निपरीक्षा’ दर्शविणारी आहे.
गाझीपूर येथे एक जूनला मतदान होणार आहे. येथील माजी खासदार आणि माफिया मुख्तार अन्सारी याचे भाऊ अफजल अन्सारी हे समाजवादी पक्षाचे उमेदवार आहेत.तर जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल असलेले मनोज सिन्हा यांचे निकटवर्तीय पारसनाथ राय गाझीपूरमध्ये भाजपचे उमेदवार आहेत. देशाला सर्वाधिक सैनिक देणारा जिल्हा अशी ओळख असलेल्या गाझीपूरच्या तरुणांमध्ये मात्र सैन्यभरतीच्या अग्निवीर योजनेबद्दलची नाराजी हा सर्वाधिक संवेदनशील मुद्दा बनल्याचे दिसते.
येथील ‘पीजी’ कॉलेजच्या परिसरात सैन्यभरतीची तयारी करणाऱ्या तरुणांची भल्या पहाटे धावण्यासाठी गर्दी असायची. परंतु आता ही संख्या पुरती रोडावली असल्याचे गाझीपूरच्या लंका भागात भेटलेल्या विवेकसिंह या तरुणाने सांगितले. कला शाखोतून पदवीचे शिक्षण पूर्ण झालेला विवेकसिंह हा धावण्याच्या शर्यतीतील ‘ट्रिपल चेसिंग’ प्रकारातला उत्तम खेळाडू आहे. लष्करात जाण्याचे स्वप्न असले तरी अग्निवीर योजनेमुळे निराशा झाल्याचे त्याने सांगितले.
लाखभर लोकसंख्या असलेले आशिया खंडातील सर्वात मोठे गाव म्हणून ओळखले जाणारे घरटी एक सैनिक असलेले गहमर हे देखील गाझीपूर जिल्ह्यात येणारे. गहमरमध्येही अग्निवीरमुळे मोठी नाराजी आहे. तर दुल्लाहपूरचा ग्यानस्वरुप ओझा आणि रामपूर बलभद्र गावाचा बबलू यादव या दोन्ही तरुणांची अग्निवीरबद्दलची हीच व्यथा आहे. ग्यानस्वरुप ओझा तर अग्निवीरऐवजी आता बिहारमधील शिक्षक भरती परिक्षेची तयारी करतो आहे.
२०१९ च्या निवडणुकीत अफझाल अन्सारी हे गाझीपूरमधून बहुजन समाज पक्षातर्फे निवडून आले होते. मुख्तार अन्सारी याचा काही आठवड्यांपूर्वी तुरुंगात झालेला मृत्यू आणि अन्सारी कुटुंबीयांकडून यावर व्यक्त झालेला संशय यामुळे वातावरण तापले आहे. मुख्तार अन्सारी याला गरिबांचा मसिहा’, मानणाऱ्यांची संख्या गाझीपूरमध्ये लक्षणीय असून त्यात मुस्लिमांचे प्रमाण सर्वाधिक असल्याने या प्रकरणातून कुटुंबाला सहानुभूती मिळविण्याचा अफजल अन्सारी यांचा प्रयत्न आहे.
दुसरीकडे, कायद्याचे राज्य या मुद्द्यावर भाजपचा आक्रमक प्रचार सुरू आहे. बुलडोझर बाबा म्हणून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ओळख मिळवून देणारी बुलडोझरची पहिली कारवाई गाझीपूरमध्ये अन्सारी कुटुंबीयांविरुद्ध झाली होती. त्यापार्श्वभूमीवर भाजपकडून कायदा सुव्यवस्थेसह ‘वन रॅन्क वन पेन्शन’च्या मुद्द्यावरही मतदारांना साद घातली जात आहे.
व्यथा अब्दुल हमीद स्मारकाची
१९६५ च्या भारत पाकिस्तान युद्धात अमेरिकेच्या पॅटन रणगाड्यांच्या अक्षरशः चिंधड्या उडविणारे परमवीर चक्र विजेते हुतात्मा अब्दुल हमीद यांचे स्मारक धामुपूरमध्ये आहे. या स्मारकामध्ये हुतात्मा अब्दुल हमीद आणि त्यांची पत्नी रसुलन बिबी यांचा अर्धपुतळा या स्मारकामध्ये आहे. या स्मारकाचे २०१७ मध्ये तत्कालीन लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी उद्घाटन केले होते. या स्मारकामध्ये उभारलेल्या विजयस्तंभावर वीर अब्दुल हमीद यांची शौर्यगाथा अंकित केली आहे. तर, त्यांनी युद्धात वापरलेल्या एलसीआर गन असलेल्या जीपची प्रतिकृती देखील या स्मारकात ठेवण्यात आली आहे. मूळ जीप जबलपूरच्या ग्रेनेडियर विभागामध्ये जपून ठेवण्यात आली आहे. शहिद स्मारकातील बॅटरी, वीजेचे दिवे चोरी होण्याचे प्रकार घडल्याने इथे नियमित सुरक्षा रक्षक ठेवण्याची गरज शहीद अब्दुल हमीद यांचे नातू शमीम खान यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.