Wayanad Loksabha Election : वायनाडवरून काँग्रेस-भाजपमध्ये वाक्‌युद्ध; भाजपने काँग्रेसवर घराणेशाहीचा केला आरोप

काँग्रेस नेते राहुल गांधींनी लोकसभेची वायनाडची जागा सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता तेथील पोटनिवडणूक प्रियांका गांधी लढविणार आहेत.
Priyanka Gandhi
Priyanka Gandhisakal
Updated on

नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधींनी लोकसभेची वायनाडची जागा सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता तेथील पोटनिवडणूक प्रियांका गांधी लढविणार आहेत. काँग्रेसच्या या घोषणेनंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.

भाजपने काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप केला आहे. तर भाजपच्या कोणत्याही नेत्याने वायनाडमधून निवडणूक लढवावी, असे आव्हान काँग्रेसने दिले आहे.

लोकसभा निवडणुकीत वायनाड आणि रायबरेली या दोन्ही मतदार संघांमधून विजय मिळविल्यानंतर राहुल गांधी कोणता मतदारसंघ सोडणार याबाबत वेगवेगळे कयास लावले जात होते. अखेरीस, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी सोमवारी झालेल्या बैठकीत राहुल गांधींनी रायबरेली मतदारसंघ ठेवण्याचे ठरविले.

तसेच रिक्त होणाऱ्या वायनाडमधून प्रियांका गांधी पोटनिवडणूक लढवतील, अशीही घोषणा पक्षाध्यक्ष खर्गे यांनी केली होती. त्यानंतर आज, राहुल गांधी वायनाड मतदारसंघ सोडत असल्याची औपचारिक माहिती लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयाला कळविण्यात आली.

दरम्यान, प्रियांका गांधींना निवडणुकीची संधी देण्याच्या निर्णयाचे इंडिया आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष या मित्रपक्षांनी स्वागत केले असले तरी भाजपने मात्र यावरून काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

भाजपचे केरळमधील नेते राजीव चंद्रशेखर म्हणले, ‘‘राहुल गांधी रायबरेलीमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय राहुल गांधींनी वायनाडवासीयांपासून लपवून ठेवला होता. त्यामुळे रायबरेलीची खासदारकी ठेवणार असल्याचा राहुल गांधींचा निर्णय हा वायनाडच्या लोकांचा विश्वासाघात आहे.’’ प्रियांका गांधीना मुस्लिम लीगच्या पाठिंब्यामुळे (वायनाडमधून) राजकीय पदार्पण सोपे जाणार असल्याचा टोलाही चंद्रशेखर यांनी लगावला.

तर, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ यांनीही काँग्रेसवर टीका केली. ‘‘घराणेशाही आणि प्रदक्षिणावाद (परिक्रमावाद) हा काँग्रेसचा मंत्र आहे. राहुल गांधी आधी अमेठीतून पळाले होते. आता वायनाडमधून त्यांनी पलायन केले आहे,’’ असे चुघ म्हणाले.

काँग्रेसचे आव्हान

भाजपला टोला लगावताना काँग्रेसचे नेते पवन खेडा म्हणाले, की वायनाड आणि रायबरेली अशा दोन्हीकडच्या मतदारांना आवडणारा निर्णय घेण्याचे राहुल गांधींनी सांगितले होते. त्यानुसार प्रियांका गांधी वायनाडमधून लढणार आहेत. भाजपच्या कोणत्याही नेत्याने प्रियांकांविरुद्ध मैदानात उतरावे.

प्रियांका गांधींना मिळणाऱ्या या संधीबद्दल अमेठीचे खासदार आणि गांधी कुटुंबीयांचे विश्वासू मानले जाणारे खासदार के. एल. शर्मा यांनी आनंद व्यक्त केला. प्रियांकांनी संसदेत जावी अशी आपली बऱ्याच वर्षांपासून बाळगलेली इच्छा पूर्ण होणार आहे. राहुल गांधींचे उत्तर प्रदेशातील वास्तव्य काँग्रेसला बळ देणारे असेल, असेही किशोरीलाल शर्मा म्हणाले.

प्रियांकांविरुद्ध भाकप उमेदवार देणार

तिरुअनंतपुरम - केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्याविरुद्ध उमेदवार देण्याची घोषणा भाकपने मंगळवारी केली. डाव्या लोकशाही आघाडीत (एलडीएफ) वायनाडची जागा भाकपकडे असून पोटनिवडणुकीत पक्ष आपला उमेदवार रिंगणात उतरवेल, असे भाकपचे केरळ राज्य सचिव बिनॉय विश्वम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. भाकप किंवा एलडीएफ भाजपला अनुकूल असे काहीही करणार नाही. काँग्रेसला आपला उमेदवार निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे, असेही ते म्हणाले.

गांधी-नेहरू घराण्याचे हित जोपासण्यासाठी, काँग्रेस पक्ष हा केवळ एक साधन आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.’’

- के. सुरेंद्रन, भाजपचे केरळचे प्रदेशाध्यक्ष

वायनाडमधील नागरिकांनी राहुल गांधींच्या या कृतीबद्दल काँग्रेसला मतदान यंत्रातून चांगली अद्दल घडवावी.

- व्ही. मुरलीधरन, भाजपचे ज्येष्ठ नेते

वायनाडच नव्हे तर संपूर्ण केरळमधील नागरिकांकडून प्रियांकांचे स्वागत होत आहे. वायनाडमधून राहुल गांधींपेक्षाही अधिक मताधिक्याने प्रियांका या निवडून येतील.

- व्ही.डी. सतीशन, काँग्रेसचे नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.