नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi ) यांची आज पंजाबमधील फिरोजपूर येथे सभा सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींमुळे ऐनवेळी रद्द करण्यात आली आहे. कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या पंतप्रधानांचा ताफा एका फ्लायओव्हरवर आंदोलकांमुळे सुमारे 15 ते 20 मिनिटे अडकून पडला होता. सुरक्षेच्या कारणस्तव पंतप्रधान मोदींना पुन्हा भटिंडा विमानतळावर नेण्याचा निर्णय घेण्यात आला. यावरुन आता राजकीय वातावरण तापलं आहे. हा काँग्रेस सरकारचा कुटील डाव असल्याची जहरी टीका भाजपने केली आहे. या संदर्भातच आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच या प्रकरणाच्या चौकशीचीही मागणी केली आहे.देशाच्या इतिहासात अशी घटना याआधी कधीही घडली नव्हती, असा दावा त्यांनी केला आहे.
स्मृती इराणी यांनी पहिला प्रश्न केलाय तो म्हणजे पंतप्रधानांच्या मार्गाची माहिती आंदोलकांना कुणी दिली? आंदोलनकर्त्यांनी मोदींना 15 ते 20 मिनिटे अडवलं. पंजाब सरकारने सुरक्षेचं आश्वासन दिलेलं असतानाही असं घडलं. देशाच्या इतिहासात अशी घटना याआधी कधीही घडली नव्हती. पंजाब पोलिसांनी मोदींचा ताफा त्यामार्गाने जाण्यासाठी ग्रीन सिग्नल कसा दिला? 42 हजार कोटींचे प्रोजेक्ट पंजाब वासीयांना देण्यासाठी मोदी गेले होते. तर काँग्रेस त्यांच्यासोबत असं वागताना दिसून आली, अशी टीका त्यांनी केली आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, भारताच्या इतिहासात आज पंजाबच्या धरतीवर काँग्रेसचा खुनी मनसुबा अयशस्वी ठरला. मोदींचा द्वेष करणाऱ्यांनी मोदींच्या सुरक्षेचा भंग करण्याचा प्रयत्न केला. हा रोष फक्त आमच्या पक्षापुरता मर्यादीत नाही. तुमचा द्वेष मोदींसोबत ठेवा, मात्र, पंतप्रधान पदाशी करु नका, असं काँग्रेसला त्या म्हणाल्या. पंतप्रधान कोणत्या मार्गाने जातील आणि एखाद्या ठिकाणी कसे पोहोचतील याबाबतची माहिती पंजाब पोलिसांनीच दिली होती. मात्र, तरीही पंतप्रधानांच्या संपूर्ण ताफ्याला अडवण्याचा प्रयत्न झाला. 20 मिनिटांपर्यंत त्यांची सुरक्षा भंग करण्यात आली. त्या लोकांना त्यांच्या गाडीपर्यंत कुणी आणि कसं पोहोचलं? त्या क्षणी त्या लोकांना कुणी फ्लायओव्हरवर पाठवलं? याचं उत्तर हवंय.
पुढे त्यांनी काँग्रेसवर टीका करत म्हटलंय की, या दरम्यान काँग्रेसच्या नेत्यांनी आनंदोत्सव साजरा केला, हा कशाचा आनंद होता? देशाच्या पंतप्रधानांना मृत्यूच्या पायरीशी नेलं होतं, याचा आनंद होता? सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पंजाब सरकारशी संवाद करायचा प्रयत्न केला तेंव्हा मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून कुणीही संवाद केला नाही. कशाची वाट पाहत होती काँग्रेस सरकार? मोदी जनतेच्या आशीर्वादाने पंतप्रधान झालेत. त्यांना निवडणुकीत पराभूत करा, अशा प्रकारे का करताय? असा सवालही त्यांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.