नंदीग्राम : पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ करताना तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आगामी निवडणूक नंदीग्राममधून लढण्याचे जाहीर केले आहे. नंदीग्राममध्ये येथे सोमवारी (ता.१८) प्रचारसभा घेत त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले तसेच भाजपवर देखील निशाणा साधला. आतापर्यंत ममतांनी भवानीपूरमधून निवडणूक लढविली असून सध्या त्या भवानीपूरचेच प्रतिनिधित्व करतात.
नंदीग्राम हा भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. ममतांनी आजच्या सभेमध्ये भाजपवर निशाणा साधला. ‘वॉशिंग पावडर भाजपा’ असा नारा देत त्यांनी आपण येथून जरी निवडणूक लढविली तरीसुद्धा भवानीपूरकडे मात्र दुर्लक्ष होऊ देणार नाही असे आश्वासन जनतेला दिले.
आजच्या सभेमध्ये बोलताना ममतांनी थेट उपस्थित जनसमुदायाला साद घालताना ‘मी येथूनच निवडणूक लढवू का?’ अशी विचारणा केली त्यावर उपस्थितांनीही त्याला सकारात्मक उत्तर दिले. केंद्रामध्ये रेल्वेमंत्री असताना नंदीग्राममध्ये केलेल्या विकासकामांचा पाढाही यावेळी ममतांनी वाचून दाखविला. दिघा रिसॉर्टपर्यंतच्या लोहमार्गाची उभारणी आपल्यामुळेच झाल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान नंदीग्रामवर अधिकारी कुटुंबीयांचे वर्चस्व आहे. कधीकाळी तृणमूल काँग्रेसचे निष्ठावंत अशी त्यांची ओळख होती पण सुवेंदू यांनी बंडाचा झेंडा रोवत कमळ हातात घेतले होते. त्यानंतर येथील राजकीय समीकरणे बदलली होती.
नंदीग्रामशी भावनिक नाते
राज्यामध्ये २००७ मध्ये डाव्यांची सत्ता असताना नंदीग्राममधील रसायन कारखान्याविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा मोठा भडका उडाला होता. या आंदोलनानंतर २०११ मध्ये डाव्या आघाडीच्या ३४ वर्षांच्या सत्तेला सुरूंग लागून तृणमूलकडे सत्ता आली होती. ममतांचे नंदीग्रामशी भावनिक नाते आहे. येथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये जेव्हा १४ लोक ठार झाले होते तेव्हा सर्वप्रथम घटनास्थळी पोचणाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होता. यावेळी पोलिसांनी ममतांना रुग्णालयामध्ये जाण्यापासून देखील रोखले होते. आजच्या सभेमध्ये बोलताना त्यांनी या घटनेचा उल्लेख करताना थेट लोकांच्या ह्रदयाला हात घालण्याचा प्रयत्न केला.
नंदीग्राम हे माझ्यासाठी शुभ ठिकाण आहे, आता जी मंडळी माझा पक्ष सोडून जात आहेत त्यांची मला फारशी चिंता नाही. जेव्हा तृणमूल काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा यापैकी कोणीही माझ्यासोबत नव्हते.
- ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, प. बंगाल
शेवटी निवडून कोणाला द्यायचे याचा निर्णय जनतेलाच घ्यावा लागेल पण येथे शांतता आणि सुव्यवस्था कायम राहावी एवढीच माफक अपेक्षा.
- जॉयप्रकाश मुजुमदार, नेते भाजप
ममता म्हणाल्या...
- तृणमूल काँग्रेस दोनशेपेक्षा अधिक जागा जिंकेन
- केंद्राने कृषी कायदे तातडीने मागे घ्यावेत
- भाजपकडून धनशक्तीचा मोठ्या प्रमाणावर वापर
- लोकप्रतिनिधींवर केंद्रीय तपाससंस्थांचा दबाव
- नंदीग्राम शहराशी माझे भावनिक नाते
- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.