कोलकात्ता: सध्या सर्वांचे लक्ष पश्चिम बंगालमधील नंदीग्रामच्या जागेवर लागले आहे. इथे तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी आणि भाजपा उमेदवार सुवेंदू अधिकारी यांच्यात अटी-तटीचा सामना सुरु आहे. दोघांच्या आघाडी-पिछाडीमध्ये फार मोठा फरक नाहीय.
सुवेंदू अधिकारी कोण आहेत?
ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये सुवेंदू अधिकारी वाहतूक मंत्री होते. नोव्हेंबर महिन्यात त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी नंदीग्राममध्ये एक जनसभा घेतली. त्यावेळी कुठल्याही पक्षाचा झेंडा सभास्थळी नव्हता. पक्षावर नाराज असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले होते. अखेर डिसेंबर महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
सुवेंदू अधिकारी यांचा राजकीय प्रवास
सुवेंदू अधिकारी यांचे कुटुंबीय मूळचे काँग्रेसचे. १९९८ साली सुवेंदू यांनी तृणमुल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पूर्वमिदानापोरमध्ये त्यांच्या कुटुंबाचा प्रभाव आहे. सुवेंदू यांचे वडिल सीसर अधिकारी यांनी तीन वेळा खासदारकीची निवडणूक जिंकली आहे. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली UPA-2 मध्ये ते ग्रामीण विकास राज्यमंत्री होते. UPA-1 आणि UPA-2 मध्ये सुवेंदू स्वत:हा खासदार होते. सुवेंदू यांनी २००७ मध्ये नंदीग्राममध्ये जमीन अधिग्रहण विरोधी चळवळीचे नेतृत्व केले. याच आंदोलनामुळे २०११ साली तृणमुल काँग्रेसला ३४ वर्षांपासून सत्तेत असलेल्या डाव्यांना सत्तेतून खाली खेचता आले.
२००९ साली सुवेंदू अधिकारी यांनी सीपीएमचे वजनदार नेते लक्ष्मण सेठ यांचा तब्बल १.७२ लाख मतांनी पराभव केला. २०१४ साली त्यांनी पुन्हा लोकसभेची निवडणूक जिंकली. २०१६ मध्ये त्यांनी नंदीग्राममधुन विधानसभेची निवडणूक जिंकली. त्यांना वाहतूक मंत्री बनवण्यात आले.
सप्टेंबर २०१४ मध्ये सीबीआयने सारदा चीट फंड घोटाळ्यात सुवेंदू अधिकारी यांची चौकशी केली.
बंगालच्या राजकारणात सुवेंदू अधिकारी यांचं काय महत्त्व आहे?
सुवेंदू अधिकारी हे तळागाळातील जनतेशी दांडगा जनसंपर्क असणारे नेते आहेत. ग्रामीण बंगालशी त्यांची नाळ जोडलेली आहे. पूर्व मिदानपोरमध्ये त्यांनी जनआंदोलनाचे नेतृत्व केले, त्यामुळे तो भाग तृणमुलचा गड बनला. पूर्व मिदानपोरमधील १६ जागांवर त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
२०१९ लोकसभा निवडणुकीत भाजपाने ४२ पैकी १८ जागा जिंकल्यानंतर सुवेंदू अधिकारी यांच्याकडे तृणमुलने पोटनिवडणुकीची जबाबदारी सोपवली. तिन्ही पोटनिवडणुकांमध्ये पक्षाचा विजय निश्चित करण्यात त्यांनी एक महत्त्वाची भूमिका बजावली. यामध्ये खरगपूर सादार हा एक मतदारसंघ आहे. पश्चिम बंगाल भाजपाचे अध्यक्ष दिलीप घोष यांचा हा मतदारसंघ आहे
ते तृणमुलपासून वेगळे का झाले?
ममता बॅनर्जी यांचा भाचा आणि खासदार अभिषेक बॅनर्जी पक्षामध्ये सक्रीय झाल्यानंतर सुवेंदू अधिकारी पक्षापासून दूर जाऊ लागले असे तृणमुलचे नेते सांगतात. पक्ष व्यवस्थापनात अभिषेक यांच्याकडे जास्त जबाबदारी सोपवण्यात आली.ते सुवेंदू यांना खटकू लागले होते. सुवेंदू अधिकारी पक्षाच्या कार्यक्रमाला, मंत्रिमंडळाच्या बैठकांना उपस्थित राहणे टाळू लागले. या सर्वाची परिणीती अखेर तृणमुलला सोडचिठ्ठी देऊन भाजपा प्रवेशामध्ये झाली. भाजपाला सुद्धा पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू यांच्या रुपाने भक्कम जनाधार असलेला नेता लाभला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.