कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल आलेले आहेत आणि आता पुन्हा एकदा त्याठिकाणी तृणमूल काँग्रेसचं सरकार सत्तेत बसणार आहे. 200 जागांचा टप्पा पार करुन तृणमूलने भक्कम यश प्राप्त केलं आहे. तर भारतीय जनता पक्षाला 77 जागा जिंकण्यामध्ये यश प्राप्त झालं आहे. कोरोना पार्श्वभूमीवर देखील ही निवडणूक अत्यंत अटीतटीची अशीच झालेली पहायला मिळाली. या निवडणुकीत पश्चिम बंगालच्या अनेक स्टार मंडळीनी देखील आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. बंगाली सिनेमामधील एक्टर्सनी आपल्या फॅन फोलोविंगचा फायदा उचलून राजकारणात आपला चंचूप्रवेश करण्याचा प्रयत्न केला खरा; मात्र त्यातील किती जण यामध्ये यशस्वी झाले आहेत, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
पायल सरकारची जादू अयशस्वी
भाजपाने बेला पुरवा जागेवरुन प्रसिद्ध अभिनेत्री पायल सरकारला उमेदवार केलं होतं. मात्र, पायल सरकार या ठिकाणी आपला विजय साकारण्यात अयशस्वी ठरल्या आहेत. त्यांना तृणमूल काँग्रेसच्या रत्ना चॅटर्जी यांनी पराभवाची धूळ चारली आहे. याचप्रकारे चंडीतल्लामधून बांग्ला फिल्मचे अभिनेता आणि भाजपाचे उमेदवार यश दासगुप्ता देखील ही निवडणूक हारले आहेत. तृणमूलच्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला आहे.
तनुश्री चक्रवर्तीही आमदार बनू शकल्या नाहीत
भाजपाने हावडातील श्यामपूर जागेवरुन फिल्म अभिनेत्री तनुश्री चक्रवर्ती यांना तिकीट दिलं होतं मात्र, त्यांची या निवडणुकीमध्ये हार झाली. भाजपाने केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांना देखील कोलकाताच्या टॉलीगंजमधून उमेदवार बनवलं होतं. मात्र त्यांचाही पराभव झाला.
लवली मोइत्रा बनल्या आमदार
ममता बॅनर्जी यांनी तृणमूलच्या चिन्हावर अभिनेत्री लवली मोइत्रा यांना दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील सोनापूर दक्षिणमधून मैदानात उतरवलं होतं आणि त्यांचा या निवडणुकीत विजय झाला आहे. नदिया जिल्ह्यातील कृष्णानगर उत्तर विधानसभा जागेवर अभिनेत्री कौशानी मुखर्जीदेखील मैदानात होत्या मात्र, त्यांना भाजपाच्या मुकुल रॉय यांनी मात दिली आहे.
सयानी घोष यांचा पराभव
पश्चिम वर्धमान जिल्ह्यातील असनसोल दक्षिणमधून ममता बॅनर्जींनी सायोनी घोष यांना तिकीट दिलं होतं. मात्र, त्या भाजपच्या अग्निमित्र पौल यांच्याकडून पराभूत झाल्या. तर बांकुरा विधानसभा जागेवरुन ममता बॅनर्जी यांनी अभिनेत्री सायंतिका बॅनर्जी यांना तिकीट देऊ केलं होतं. मात्र त्या देखील अगदी कमी मताधिक्याने भाजपच्या उमेदवार नीलाद्री शेखर यांच्याकडून पराभूत झाल्या.
अभिनेत्री जून मालिया जाणार विधानसभेत
तृणमूलने पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील मेदिनीपूर जागेवरुन अभिनेत्री जून मालियावर विश्वास टाकला होता. त्यांनी बांग्ला टीव्ही शो आणि अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्या या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.