आज 'मानवी हक्क दिन'. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या जाहीरनाम्यानुसार 1948 पासून 10 डिसेंबर हा 'मानवी हक्क दिन' म्हणून साजरा केला जातो. 'मानवी हक्क' हे मूलभूत आणि नैसर्गिक हक्क आहेत, जे माणसाच्या विकासासाठी अत्यावश्यक आहेत. हे हक्क हिरावून घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. जगातील प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित राहावे, त्यांना सन्मानपूर्वक जगता यावे यासाठी 10 डिसेंबर हा 'आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस' म्हणून साजरा केला जातो. मानवाधिकार हे वंश, लिंग, राष्ट्रीयत्व, भाषा, धर्म, वय किंवा कशाचाही भेदभाव न करता सर्व मानवांसाठी आहेत. मानवी हक्कांमध्ये जीवन आणि स्वातंत्र्याचा हक्क, गुलामगिरी व अत्याचार यांपासून मुक्तता, अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, रोजगार आणि शिक्षणाचा अधिकार असे इतर अनेक हक्क समाविष्ट आहेत.
मानवी हक्क म्हटलं की ते अबाधित राखण्यासाठी प्रत्येकाने आपल्या हक्कांबरोबरच इतरांच्या हक्कांबद्दल जागरूक राहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण एकाच समाजात राहताना व्यक्तीभिन्नतेमुळे, वेग-वेगळ्या विचारसरणीमुळे मतभेद होणं हे साहजिकच आहे. पण 'असहमतीवर सहमती' या उक्तीनुसार इतरांच्या विचारतलं वेगळेपण मान्य केलं तर या हक्कांचं पालन होऊ शकेल. हुकूमशाही सत्तेमुळे होणारे नागरिकांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन, निर्वासितांच्या हक्कांचा प्रश्न, अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार आणि या प्रश्नांची मीडियाने घेतलेली गंभीर दखल यामुळे मानवी हक्कांविषयीची जागरूकता वाढण्यास मोठ्या प्रमाणावर मदत झाली आहे. एखाद्या सरकारकडून जनतेच्या हक्काचं उल्लंघन होणं याप्रकारच्या अशा घटनांची चर्चा झालेली आपल्याला दिसून येते, पण या जगात मिनिटागणिक अशा अनेक घटना घडतात ज्याला बळी पडलेल्या व्यक्तीचं मानसिक खच्चीकरण होतं. कदाचित त्या बळी पडलेल्या व्यक्तीलासुद्धा त्याच्याबरोबर काही चुकीचं घडलंय याची जाणीव नसेल, पण परिणाम हा तितकाच गंभीर असतो आणि घटनाही त्या व्यक्तीच्या मानवी हक्काचं उल्लंघन करणाऱ्याच असतात.
संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकारांच्या वैश्विक घोषणापत्रातील अनुच्छेद १५ नुसार - 'No one shall be subjected to torture or to cruel, inhuman or degrading treatment or punishment.' म्हणजेच, 'कोणालाही छळाची, क्रूर, अमानुष किंवा अपमानस्पद वागणूक आणि शिक्षा दिली जाऊ नये'. हा अनुच्छेद अधोरेखित करण्याचे कारण म्हणजे, सध्याच्या काळात प्रचलित झालेल्या ट्रोलिंग, रॅगिंग सारख्या विकृत संकल्पना होय. अशा गोष्टींना थेट मानवी हक्कांबरोबर जोडणे कितपत योग्य आहे यावर काही लोकांच्या मनात शंका नक्कीच उत्पन्न होईल. कारण आपल्या समाजात अशा गोष्टींकडे नेहमी 'तेवढीच मजा' म्हणून बघितलं जातं. पण आपली ही मजा काही लोकांसाठी आयुष्यभराची सजा होऊ शकते. याचं गांभीर्य आजही आपल्यातील अनेकांना नाही. सोशल मीडियावरील ट्रोलिंग, कॉलेज मधील रॅगिंग, ऑफिसमधील सहकाऱ्यांकडून झालेली मस्करी यामुळे आत्महत्या केल्याच्या अनेक घटना आपल्यासमोर आहेत. या घटनांमुळे अनेक जण डिप्रेशनचा सामना करत आहेत. याला जबाबदार कोण? अशा घटनांची मुळे ही वर्चस्ववादाच्या विकृत मानवी मानसिकतेत जडलेली आहेत. या घटनांना बळी पडलेल्या व्यक्तीच्या मानवी हक्कांचं उल्लंघन झालंय याबाबत किती लोक जागरूक आहेत? एखाद्या बरोबर असं वर्तन करणं हे चुकीचं आहे आणि याचे गंभीर परिणाम समोरच्या व्यक्तीवर होऊ शकतात हे समजणं आणि आपल्यामुळे कोणच्या आत्मसन्मानाला हानी पोहोचत नाही ना, याची काळजी घेणंही तितकच महत्वाचं आहे. महान तत्त्ववेत्ता 'प्लेटो'ने देखील मानवी आत्मसन्मानाला थेट न्यायाच्या संकल्पनेशी जोडलं होतं. यातूनच मानवी आत्मसन्मानाचं महत्त्व अधोरेखित होतं.
मुळात मानवी स्वभाव हा व्यक्तिसापेक्ष बदलत जातो. व्यक्तिसापेक्ष राहणीमान, हावभाव, आवडी या बदलत जातात आणि आपल्या आवडीनुसार राहण्याचा अधिकार प्रत्येक मानवाला आहे, आणि त्या आवडींचा आदर करणं, हे इतर नागरिकांचं कर्तव्य! जर मानवी हक्कांची पाळंमुळं आपल्याला खोलवर रुजवायची असतील, तर तसे संस्कार हे प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये असायला हवेत. याची सुरुवात ही कुटूंब, शाळा, महाविद्यालय या सामाजिक संस्थांमधून व्हायला हवी. या संस्कारांशिवाय 'सुजाण नागरिक' ही संकल्पना अपूर्ण आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.