Shooting on Jaipur Mumbai train
मुंबई- सोमवारी जयपूर येथून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वेतील सुरक्षा दलाच्या जवानाकडून गोळीबार झाल्याचे घटना घडली होती. या घटनेमध्ये एक आरपीएफ एएसआय जवान आणि तीन प्रवाशांचा गोळी लागल्याने मृत्यू झाला होता. याप्रकरणातील आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंह याला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर कॉन्स्टेबल चेतन सिंह याने आपल्या वरिष्ठ सहकाऱ्यावर आणि तीन प्रवाशांवर गोळीबार का केला, हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. पोलिसांकडून याबाबत जुजबी माहिती देण्यात आली होती. अखेर याप्रकरणात चेतन सिंग याच्याच सहकाऱ्याकडून खुलासा करण्यात आला आहे.
कॉन्स्टेबल चेतन सिंह याने सहकारी आणि अन्य प्रवाशांवर गोळ्या मारण्याचे टोकाचे पाऊल का उचलले? याबाबत रेल्वेमध्ये घटनेवेळी उपस्थित असलेल्या एका आरपीएफ कॉन्स्टेबलची प्रतिक्रिया समोर आली आहे. रेल्वे सुरक्षादलाचे कॉन्स्टेबल घनश्याम आचार्य हे कॉन्स्टेबल चेतन सिंह आणि सहाय्यक उप-निरीक्षक टीकाराम मीना यांच्यासोबत रविवारी रात्री सुफरफास्ट रेल्वेत ड्युटीवर होते. त्यांनी या घटनेसंबंधी संपूर्ण माहिती दिलेली आहे.
आचार्य यांनी सांगितलं की, जयपूर-मुंबई रेल्वेत एक सहकारी आणि तीन प्नवाशांना गोळी मारणाऱ्या आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंह याने घटनेच्या काही तासापूर्वी आपल्या सहकाऱ्यांना अस्वस्थ वाटत असल्याचे सांगितले होते. आचार्य यांनी सांगितलं की, ते टीकाराम मीना (५८), कॉन्स्टेबल चेतन सिंह (३३), आणि कॉन्स्टेबल नरेंद्र परमार (५८) यांच्यासोबत ड्युटीवर होते. ते जवळपास २.५३ वाजता सुरत ते मुंबई जाणाऱ्या रेल्वेमध्ये चढले. चेतन सिंह आणि टीकाराम मीना एसी कोचमध्ये ड्युटीवर होते, तर आचार्य आणि परमार स्लीपर कोचमध्ये होते.
चेतन सिंह याला अस्वस्थ वाटत असल्याने त्याला रेल्वेमधून उतरायचं होतं, पण त्याला आपली ड्युटी पूर्ण करण्याचे सांगण्यात आले. तसेच मुंबई येथे पोहोचल्यानंतर औषध घेण्याचे सुचवण्यात आले. चेतन सिंह याला याचा खूप राग आला आणि यामुळेच वादाला सुरुवात झाली. रागाने बेभान झालेल्या चेतन सिंहने आपल्या एक कर्मचाऱ्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने रागात गोळी चालवली. तसेच कोचमधील वेगवेगळ्या डब्ब्यात जाऊन प्रवाशांवर गोळ्या चालवल्या. ज्यात तीन प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू झाला.
रेल्वे थांबवण्यासाठी प्रवाशांनी चेन ओढली. यावेळी चेतन सिंह याने रेल्वेतून उतरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला असताना रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सिंह याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन सिंह याचे लग्न झालेले असून ६ आणि ८ वर्षाची दोन मुलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.