Latest New Delhi News: गहू पुरवठ्यातील कमतरतेमुळे राज्यांच्या कथित नाराजीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत लाभार्थींसाठी अतिरिक्त ३५ लाख टन गहू मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच, सणासुदीच्या आगामी काळात जीवनावश्यक वस्तुंचे दर नियंत्रणात राहतील, अशी ग्वाही देखील सरकारतर्फे देण्यात आली आहे.
केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने तिसऱ्या कार्यकाळाचे १०० दिवस पूर्ण केले असून त्यानिमित्त अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाच्या निर्णयांची माहिती देण्यासाठी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी ही माहिती दिली. सद्यःस्थितीत राज्यांना वार्षिक १८४ लाख टन गहू केंद्रातर्फे दिला जातो.