नवी दिल्ली- उत्तराखडच्या बद्रिकाश्रमच्या ज्योतिर्मठचे शंकराचार्य स्वामी अविमुर्तेश्वरानंद यांनी उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांचे तोंडभरून केले. ठाकरेंसोबत विश्वासघात झाला. विश्वासघात करणारे हिंदू नसतात. ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री झाले तर आवडेल असं ते म्हणाले होते. यावरून राजकारण सुरू झालं आहे.
आपण राजकारण बाजूला ठेवून शंकराचार्यांबद्दल माहिती घेऊया. शंकराचार्यांची परंपरा कधी सुरू झाली? आद्य शंकराचार्य कोण होते? हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सनातन धर्मामध्ये शंकराचार्यांच्या पदाला खूप महत्त्व आहे. शंकराचार्य पदाची स्थापना आद्य शंकराचार्यांनी केली होती. त्यांनी भारताच्या चारही दिशांना चार मठांची स्थापना केली. यात, उत्तरेतील बद्रिकाश्रम ज्योतिर्मठ, दक्षिणतील श्रृंगेरी मठ, पू्र्वेकडील जगन्नाथपुरी आणि पश्चिमेकडील द्वारकेतील शारदा मठ यांचा समावेश होतो.
चारही मठांसाठी शंकराचार्यांचे पद निर्माण करण्यात आले. संस्कृतमध्ये या मठांना पीठ म्हटलं जाते. वरती सांगितल्याप्रमाणे आद्य शंकराचार्यांनी या पिठांची स्थापना केली अन् त्यांच्या शिष्यांना याची जबाबदारी दिली. तेव्हापासून आतापर्यंत शंकराचार्यांची ही परंपरा सुरू आहे.
आदि शंकराचार्य हिंदू धर्माचे तत्वज्ञ आणि धर्मगुरु होते. हिंदू धर्माचे एक प्रमुख गुरु म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सनातन धर्माचा भारतात प्रसार करणे आणि त्याला मजबूत करण्याचा आद्य शंकराचार्यांचा हेतू होता. यासाठीच त्यांनी भारतामध्ये पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर दिशेला मठांची स्थापना केली.
मठ म्हणजे असे ठिकाण ज्याठिकाणी गुरु आपल्या शिष्यांना शिक्षण आणि ज्ञान देत असतात. आध्यात्मिक आणि पौराणिक ज्ञान देण्याचं काम गुरु याठिकाणी करत असतात. याशिवायही अनेक कामे मठाच्या माध्यमातून होत असतात. यामध्ये समाजसेवा, दान याचा समावेश होतो. धार्मिक साहित्यासंबंधात देखील याठिकाणी काम होत असतं.
सनातन धर्मानुसार, शंकराचार्य बनण्यासाठी संन्यासी होणे आवश्यक आहे. गृहस्थ जीवनाचा त्याग, मुंडन, पिंडदान आणि रुद्राक्ष धारण करणे संन्यासी होण्यासाठी आवश्यक आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे शंकराचार्य होण्यासाठी ब्राह्मण असणे अनिवार्य आहे. आतापर्यंत इतर जातीचा व्यक्ती शंकराचार्य बनल्याचा इतिहास नाही.
ज्याने आपल्या इंद्रियांना जिंकले आहे. तन आणि मनाने जो पवित्र आहे. ज्याला चारही वेद आणि सहा वेदांगांचे ज्ञान ज्याला आहे अशाला शंकराचार्य होता येते. शंकराचार्यांचे प्रमुख, आचार्य महामंडलेश्वर, प्रतिष्ठित संतांनी सभेमध्ये मंजुरी आणि काशी विद्वानांच्या परिषदेमध्ये शंकराचार्याच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाते.
1. ओडिशाच्या पुरीमध्ये गोवर्धन मठ आहे. ज्याचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती आहेत. गोवर्धन मठाच्या सन्याशांच्या नावात आरण्य संप्रदाय असा उल्लेख असतो
२. गुजरातच्या द्वारकाधाममध्ये शारदा मठ आहे. ज्याचे शंकराचार्य सदानंद सरस्वती आहेत. शारदा मठाच्या संन्याशाच्या नावामध्ये तीर्थ किंवा आश्रम लावलं जातं
३. उत्तराखंडच्या बद्रिकाश्रममध्ये ज्योतिर्मठ आहे. ज्याचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तश्वरानंद आहेत. ज्योतिर्मठच्या संन्याशांच्या नावामध्ये सागर लावले जाते.
४. दक्षिण भारताच्या रामेश्वरममध्ये श्रृंगेरी मठ आहे. ज्याचे शंकराचार्य जगतगुरु भारती तीर्थ आहेत. संन्याशांच्या नावामध्ये सरस्वती किंवा भारती लावले जाते.
सनातन धर्मामध्ये शंकराचार्य सर्वात मोठे धर्म गुरु आहेत. बौद्ध धर्मामध्ये जसे दलाई लामा असतात किंवा ख्रिश्नन धर्मामध्ये पोप यांना मान असतो, तसेच स्थान शंकराचार्यांना असते. चारही मठांना हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे.
हिंदू धर्माचा प्रचार-प्रसार आणि विकासामध्ये आदि शंकराचार्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. सनातन धर्म संपूर्ण भारतात पसरवण्यासाठी त्यांनी चार मठांची स्थापना केली. त्यांचा जन्म ७८८ सालामध्ये झाल्याचं सांगितलं जातं. वयाच्या ३२ व्या वर्षी म्हणजे ८२० मध्ये त्यांचे निधन झाले. अद्वैत वेदांतचे प्रणेते, संस्कृत विद्वान, उपनिषद व्याख्याता आणि सनातन धर्म सुधारक अशी त्यांची ओळख आहे. त्यांना भगवान शंकराचा अवतार देखील मानला जातो. आद्य शंकराचार्यांनी संपूर्ण भारत प्रवास करून ज्ञान मिळवले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.