भारताची तिसरी चांद्रमोहीम असणाऱ्या चांद्रयान-३ चे शुक्रवारी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. यानंतर आता हे चांद्रयान चंद्राच्या दिशेने प्रवास करत आहे. आंध्र प्रदेशमधील श्रीहरीकोटा येथे असणाऱ्या सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रावरून हे प्रक्षेपण करण्यात आले. मात्र, या प्रक्षेपणासाठी हेच ठिकाण का निवडलं?
केवळ याच नाही, तर भारतातून अंतराळ मोहिमेसाठी पाठवण्यात येणारे प्रत्येक यान, उपग्रह इथूनच प्रक्षेपित केले जातात. याला कारण आहे, श्रीहरीकोटाचं भौगोलिक स्थान. या ठिकाणाहून पहिला ऑर्बिट उपग्रह रोहिणी १A १० ऑगस्ट १९७९ रोजी प्रक्षेपित करण्यात आला. पण त्यात असलेल्या कमतरतेमुळे १९ ऑगस्ट रोजी तो नष्ट झाला.
असा लागला शोध
भारताने ६० च्या दशकात जेव्हा स्वतःचे उपग्रह स्वतःच अवकाशात सोडण्याचा निर्णय घेतला. तेव्हा इस्रोचे संस्थापक विक्रम साराभाई यांनी आपले जवळचे सहकारी ई.व्ही. चिटणीस यांच्यावर लाँचिंगसाठी एक खास जागा शोधण्याची जबाबदारी सोपवली.
यानंतर १९६८ साली चिटणीस यांनी आंध्र प्रदेशातील काही ठिकाणांची यादी तयार केली. यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात विक्रम साराभाई यांनी श्रीहरीकोटाची पाहणी केली. त्यांनी हिंदू वृत्तपत्राच्या विमानाचा यासाठी वापर केला. हीच जागा फायनल केल्यानंतर इस्रोने तिथे ४० हजार एकर जागा मिळवली.
ही जागा का खास आहे?
या ठिकाणाचं विशेष महत्त्व म्हणजे, ही जागा विषुववृत्तापासून जवळ आहे. तसंच, ही जागा पूर्व किनारपट्टीवर असल्याने इथून ०.४ किलोमीटर प्रति सेकंद इतकी जास्त व्हेलॉसिटी मिळते. त्यामुळेच पूर्व दिशेला जाणाऱ्या उपग्रहांच्या लाँचिंगसाठी ही जागा उत्तम मानली जाते. पृथ्वीवरून बहुतांश उपग्रह हे पूर्व दिशेलाच प्रक्षेपित केले जातात.
याशिवाय आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, या ठिकाणी जास्त लोकसंख्या नाही. इथं एकतर इस्रोचे कर्मचारी राहतात किंवा स्थानिक मच्छिमारांची वस्ती आहे.
या ठिकाणाला पूर्वी SHAR (श्रीहरीकोटा रेंज) असं नाव देण्यात आलं होतं. २००२ साली याचं नामांतर करुन ते सतीश धवन स्पेस सेंटर (SDSC SHAR) असं करण्यात आलं. इस्रोचे माजी चेअरमन आणि थोर गणिततज्ज्ञ सतीश धवन यांच्या स्मरणार्थ त्यांचं नाव या स्पेस सेंटरला देण्यात आलं.
श्रीहरीकोटाला जायचं कसं?
हे ठिकाण राष्ट्रीय हायवे NH – 5 वर आहे. सर्वात जवळचं रेल्वे स्थानक २० किलोमीटर अंतरावर आहे. सुल्लुर्पेता हे जवळचं शहर असून हेच जवळचं रेल्वे स्थानकही आहे.
चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ही जागा ७० किलोमीटर अंतरावर आहे. इस्रोच्या परवानगीने श्रीहरीकोटा इथलं लाँचिंग स्टेशन पाहता येईल. प्रत्येक बुधवारी इथं पर्यटकांना प्रवेश दिला जातो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.