संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची घोषणा झाली आहे. अधिवेशन 25 नोव्हेंबर ते 20 डिसेंबरपर्यंत पार पडणार आहे. संसदीय कार्यमंत्री किरण रिजूजी यांनी मंगळवारी ही माहिती दिली. हिवाळी अधिवेशनात 'वन नेशन वन इलेक्शन' विधेयक तसेच 'वक्फ विधेयक' पास होण्याची शक्यता आहे. कॅबिनेटने या दोन्ही प्रस्तावांना मंजूरी दिली आहे. अधिवेशनात जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव देखील पास केला जाण्याची शक्यता आहे.
संविधानाचे 75वे वर्ष साजरे होत आहे. यानिमित्त अधिवेशनादरम्यान 26 नोव्हेंबरला जुन्या संसदेच्या सेंट्रल हाॅलमध्ये संयुक्त सत्र आयोजित केले जाऊ शकते. 18व्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन 22 जुलै ते 9 आॅगस्टपर्यंत संपन्न झाले, त्यावेळी 12 विधेयकं मांडण्यात आली. यामधील वित्तविधेयक 2024, विनियोग विधेयक 2024, काश्मीर विनियोग विधेयक 2024, आणि भारतीय वायुयान विधेयक ही चार विधेयके पास करण्यात आली.