नवी दिल्ली : कोरोनाचा लॉकडाऊन लागू झाल्यानंतर अनेकजण वेगवेगळ्या ठिकाणी अडकून राहिले. आपल्या जवळच्या लोकांना अडकलेल्या ठिकाणाहून परत घरी आणण्यासाठी अनेकांची वेगवेगळ्या प्रकारची कसरत केल्याच्या अनेक बातम्या आपण लॉकडाऊनच्या काळात ऐकल्या आहेत. तुम्हाला ती बातमी आठवतेय का? एप्रिल 2020 मध्ये रझिया बेगम नावाची एक महिला आपल्या मित्राच्या घरी अडकलेल्या मुलाला परत आणण्यासाठी तब्बल 1400 किमी तिच्या स्कूटरवरुन गेली होती. आणि तिने कडक लॉकडाऊनच्या काळात आपल्या मुलाला परत घरी आणलं होतं. ही बातमी तेंव्हा चांगलीच चर्चेत होती, त्यामुळे तुम्हाला ती आठवत असेलच. आता पुन्हा एकदा हा मुलगा अडकला आहे आणि ही आई पुन्हा एकदा चिंतेत आहे. त्या घटनेच्या दोन वर्षांनंतर आता तो पुन्हा अडकला आहे, मात्र, यावेळी युद्धग्रस्त युक्रेनमध्ये...!
'इंडियन एक्स्प्रेस'शी याबाबत बोलताना रझिया बेगम यांनी म्हटलंय की, माझा मुलगा खूपच धाडसी आहे. यावेळीही तो असंच म्हणतोय की, काळजी करु नकोस, मी अगदी सुखरुपपणे घरी येईन. तो म्हणतोय की, तू युद्धाबाबतच्या बातम्या पाहू नकोस. त्याला भीती वाटतेय की मी त्या बातम्या सहन करु शकणार नाही. तो म्हणतोय की, मी तुझी बातमी आहे आणि मी सुखरुप आहे. मी तुझ्या संपर्कात राहीन. मात्र, गेल्या आठवड्यापासून ही आई आपल्या मुलाचा आवाज ऐकण्यासाठी तडफडत आहे.
मोहम्मद निझामुद्दीन अमन (21) हा सुमी स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये MBBS च्या पहिल्या वर्षाला शिकतो आहे. इतर हजारो विद्यार्थ्यांप्रमाणेच तोही तिथे अडकला आहे. अन्न-पाण्याचा तुडवडा, तुटपुंजा वीजपुरवठा आणि इंटरनेट कमी होत असताना तो त्याच्या हॉस्टेलच्या बेसमेंटमध्ये इतर 800 जणांसह अडकून पडला आहे. प्रत्येक वेळी जेव्हा तो व्हिडिओ कॉलवर येतो तेव्हा तो आपल्या आईसमोर हसतमुख चेहऱ्यानेच येतो आणि तिला खंबीर राहण्यास आणि देवावर विश्वास ठेवण्यास सांगतो.
दोन वर्षांपूर्वी देखील असंच काहीसं घडलं होतं मात्र, त्यावेळी अमन भारतातच होता. कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेमध्ये अमनला सुरक्षितपणे घरी परत आणण्यासाठी तिने तिच्या गावापासून शेजारच्या आंध्र प्रदेश राज्यातील नेल्लोरपर्यंत स्कूटरवर एकट्याने प्रवास करून त्याला परत आणलं होतं. तिचा हा थक्क करणारा प्रवास सर्वांनाच अचंबित करुन गेला होता. सध्या या खंबीर आईने राज्य सरकारकडे आपल्या मुलाला परत आणण्याचे आवाहन केलंय. निजामाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तिला सहकार्याचं आश्वासन दिलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.