रेवण्णा म्हणाले की, ‘‘एसआयटीने त्यांच्या घरावर नोटीस चिकटवली आहे. आपण अधिकाऱ्यांना सहकार्य करणार आहे. मी यावर आता बोलणार नाही.’’
बंगळूर : हासनमधील अनेक महिलांवर अत्याचार प्रकरणाची (Women Abuse Case) चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) विद्यमान खासदार प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांच्याविरुद्ध लूकआउट नोटीस जारी केली आहे. मंगळवारी हजर राहण्याच्या नोटीसनंतर प्रज्वल रेवण्णा आणि त्यांचे वडील, माजी मंत्री एच. डी. रेवण्णा दोघेही एसआयटीसमोर हजर न राहिल्याने ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, प्रज्वलच्या वकिलांनी सात दिवसांची वेळ देण्याची केलेली विनंती एसआयटीने फेटाळली. सूत्रांनी सांगितले की, प्रज्वलला नोटीस जारी केली गेली आहे. प्रज्वलला देशात प्रवेश करताच ताब्यात घेतले जाईल आणि इमिग्रेशन पॉईंटवर अहवाल दिला जाईल. २८ एप्रिल रोजी होळेनरसिंपूर टाऊन पोलिस स्थानकात दाखल झालेल्या गुन्ह्यात प्रज्वल आणि त्याचे वडील, होळेनरसींपूरचे आमदार एच. डी. रेवण्णा यांची संशयित म्हणून नावे आहेत.
मात्र, गुन्हा दाखल होण्यापूर्वी प्रज्वल देश सोडून पळून गेला आणि तो जर्मनीत (Germany) असल्याची माहिती आहे. त्यानंतर सरकारने या आरोपींच्या चौकशीसाठी गुन्हे अन्वेषण विभागाचे (CID) अतिरिक्त पोलिस महासंचालक बी. के. सिंग यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन केली.
त्यानंतर बुधवारी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये प्रज्वलने लिहिले, ‘‘मी चौकशीला उपस्थित राहण्यासाठी बंगळूरमध्ये नाही. त्यामुळे माझी माहिती माझ्या वकिलामार्फत सीआयडी बंगळूरला कळवले आहे. लवकरच सत्याचा विजय होईल.’’ प्रज्वलचे वकील अरुण जी. यांनी अपीलमध्ये नमूद केले की, माझा पक्षकार प्रज्वल रेवण्णा बंगळूरच्या बाहेर प्रवास करत असल्याने नोटिसानुसार तुमच्यासमोर हजर होण्यासाठी त्याला आणखी सात दिवस हवे आहेत. माझी विनंती आहे की, तुम्ही प्रज्वलला सात दिवस वेळ द्यावा आणि चौकशीसाठी दुसरी तारीख द्यावी.
तपास पथकाने याचिका फेटाळल्याचे अहवालात सांगितले आहे. तथापि, एसआयटीच्या सूत्रांनी या घडामोडीवर भाष्य करण्यास नकार दिला. सोमवारी प्रज्वलला आरोप झाल्यानंतर धजदमधून निलंबित करण्यात आले आहे. गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर म्हणाले, ‘‘एच. डी. रेवण्णा यांना आज तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहायचे होते. आज ते हजर झाले नाहीत, तर रेवण्णा यांना अटक करावी लागेल. सरकार कोणालाही संरक्षण देत नाही. लैंगिक छळ आणि अत्याचारप्रकरणी दोन महिलांनी यापूर्वीच तक्रार दाखल केली आहे. व्हायरल झालेल्या अश्लील व्हिडिओमध्ये हजारो महिला आहेत. त्यामुळे हे गंभीर प्रकरण असून त्या मुली-महिलांच्या कुटुंबीयांचा विचार व्हायला हवा.
प्रज्वलचे प्रकरण सरकारने गांभीर्याने घेतले आहे. आमच्या सरकारने कोणालाही सोडलेले नाही. प्रज्वल रेवण्णा यांना लूकआउट नोटीस बजावली आहे. प्रज्वलच्या वकिलाने वेळ मागितली आहे. अशा प्रकरणांमध्ये वेळ दिला जात नाही. त्यामुळे त्याला अटक करण्याची जबाबदारी एसआयटीची असेल, असे गृहमंत्री डॉ. परमेश्वर यांनी सांगितले.
धजदचे आमदार आणि माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांनी गुरुवारी अटकपूर्व जामिनासाठी बंगळूर येथील सत्र न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी आज (ता. ३) निश्चित केली आहे. ज्येष्ठ धजद नेते असलेले रेवण्णा यांना महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणासंदर्भात विशेष तपास पथक (एसआयटी) कडून नोटीस मिळाली आहे. त्यांचा मुलगा आणि हासनचे विद्यमान खासदार प्रज्वल रेवण्णा यांनाही नोटीस मिळाली आहे.
बुधवारी बंगळूरमध्ये पत्रकारांशी बोलताना रेवण्णा म्हणाले की, ‘‘एसआयटीने त्यांच्या घरावर नोटीस चिकटवली आहे. आपण अधिकाऱ्यांना सहकार्य करणार आहे. मी यावर आता बोलणार नाही.’’ दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीने तीन पथके तयार केली आहेत. प्रज्वल रेवण्णांचा चालक मलेशियात आहे, असे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.