Year Ender 2022 : श्रद्धाचे 35 तुकडे ते भट्टीत बापाला जाळले... 'या' 7 घटनांनी देश हादरला

Year Ender 2022
Year Ender 2022esakal
Updated on

नवी दिल्लीः अमानवीपणा आणि क्रूरपणाचा कळस काय असतो, हे 2022 या सरत्या वर्षात दिसून आलं. काळजाचा थरकाप उडविणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांनी देश हादरुन गेला. नुकत्याच झालेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडाने तर प्रेमाच्या सिद्धांतावरचा विश्वास उडतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

1. अंकिता सिंग- पेट्रोल ओतून पेटवून दिलं

झारखंडची अंकिता सिंग ही बारावीमध्ये शिकत होती. दुमका जिल्ह्यातल्या जरुआडीह भागामध्ये हिंदू आणि मुस्लिम वस्ती असलेल्या भागात अकंता वडिलांसह रहायची. अंकिताचे वडील एका बिस्कीट बनवणाऱ्या कंपनीमध्ये काम करतात. तिच्या आईचा पूर्वीच मृत्यू झालेला होता.(Latest Crime News)

याच भागात राहणाऱ्या शाहरुख नावाच्या तरुणाचं अंकितावर एकतर्फी प्रेम होतं. शाहरुखने अंकिताचा काटा काढायचं ठरवलं आणि ऑगस्ट महिन्यात त्या क्रूरकर्माने अंकिताला जिवंत पेटवलं. अंकिता झोपलेली असतांना घरात जावून शाहरुखने तिच्या अंगावर पेट्रोल ओतलं आणि पेटवून दिलं.

आरडा-ओरड करत अंकिता घराबाहेर आली. तिच्या वडिलांना तातडीने तिला रुग्णालयात दाखल केलं. परंतु ती ९० टक्के भाजली होती. २९ ऑगस्ट २०२२ रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. कहर म्हणजे नराधम शाहरुख पोलिसांनी अटक केली त्यावेळी चक्क हसत होता. त्याला कसलाही पश्चाताप नसल्याचं दिसून आलं होतं.

या घटनेनंतर राजकारण चांगलंच तापलं. मोर्चे, आंदोलनं झाली. वातावरण तणावजन्य झाल्याने पोलिसांना जमावबंदी लागू करावी लागली होती. विशेष म्हणजे अंकितावर अंत्यसंस्कारापूर्वी तिच्या नातेवाईकांनी शहरातून प्रेतयात्रा काढली होती. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हेही वाचाः जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

2. नीलम देवी- भररस्त्यात स्तन कापले

बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात ही थरकाप उडवणारी घटना घडली आहे. क्रूरपणाचा कळस या घटनेतून देशाने पाहिला. भागलपूरच्या पीरपँतीमधल्या नीलम देवीचा खून शकील नावाच्या व्यक्तीने भावासोबत मिळून केला होता.

भररस्त्यात आरोपी शकीलने नीलमला धक्का देऊन खाली पाडलं आणि धारदार शस्त्राने तिचा एकेक अवयव कापू लागला. चाकूने त्याने नीलमचे स्तन कापले. त्यानंतर दोन्ही हात, कान आणि इतर अवयव कापू लागला. या हैवानाने नीलमचे पाय कापण्याचा प्रयत्न केला परंतु ते कापले गेले नाहीत.

नीलमच्या पतीचं किराणा दुकान होतं. नीलम दुकानात असतांना शकील तिथे यायचा आणि तासन्तास बसायचा. यातूनच दोघांची ओळख झाली होती.

शकीलच चारित्र्य ठीक नव्हतं, असं नीलमचा पती अशोकने सांगितलं होतं. अशोकने सांगितलं की, हत्येच्या आदल्या दिवशी नीलमने शकीलला दुकानावर येऊ नको, असं सांगितलं होतं. तुझी नियत चांगली वाटत नाही, असं नीलम म्हणाली होती. त्यामुळे शकील दुकानावर थांबला नव्हता. मात्र चारित्र्यावर संशय घेतल्याने शकीलने रागाच्या भरात तिचा क्रूरपणे खून केला.

Year Ender 2022
Year Ender 2022 : श्रद्धाचे 35 तुकडे ते भट्टीत बापाला जाळले... 'या' 7 घटनांनी देश हादरला

3. अंकिता भंडारी- हॉटेलमधल्या अतिथींसोबत लैंगिक संबंध ठेवले नाही म्हणून...

उत्तराखंडमध्ये धर्मनगरी म्हणून ओळख असलेल्या ऋषिकेश येथे आणखी एक घटना घडली. पौंडी जिल्ह्यातल्या यमकेश्वरमधील गंगा भोगपूर येथील वनतारा रिसॉर्टमध्ये १९ वर्षिय अंकिता भंडारी काम करत होती. हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या अंकितावर अतिथींसोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी दबाव येत होता.

१८ सप्टेंबर २०२२ रोजी अंकिता अचानक गायब झाली. पोलिसांनी तपासकार्य सुरु केलं. मीसिंग प्रकरणात पोलिसांनी पाच दिवसांनंतर २३ सप्टेंबर रोजी तिघा आरोपींना ताब्यात घेतलं. २४ सप्टेंबरला पोलिसांना अंकिताचा मृतदेह एका कालव्यातून काढला आणि ताब्यात घेतला. या घटनेमध्ये मुख्य आरोपी हा भाजपच्या बड्या नेत्याचा मुलगा आहे.

या घटनेनंतर अनेक खुलासे समोर आले. व्हीआयपी अतिथींना 'स्पेशल सर्व्हिस' देण्याचा अंकितावर दबाव टाकला जात होता. कसून तपास केल्यानंतर अनेक बाबी समोर आल्या. अंकिताने तिच्या मित्राला व्हाट्सअपवर केलेल्या मेसेजमुळे खऱ्या अर्थाने घटनेचा खुलासा झाला. 'मी गरीब असेल परंतु १० हजार रुपयांसाठी स्वतःला विकणार नाही' असा मेसेज तिने मित्राला केला होता.

या घटनेतला मुख्य आरोपी पुलकित आर्य हा माजी मंत्री डॉ. विनोद आर्य यांचा मुलगा आहे. पुलकित हा वनतारा हॉटेलचा संचालक होता. हॉटेलचा व्यवस्थापक सौरभ भास्कर आणि सहव्यवस्थापक अंकित गुप्ता यांना हाताशी धरुन पुलकित अंकितावर लैंगिक संबंधांसाठी दबाव आणत होता.

ऋषिकेशजवळच्या चीला कालव्यामध्ये ढकलून आरोपींनी अंकिताला संपवलं होतं. पोलिसांनी तिघा आरोपींवर गँगस्टर अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर उत्तराखंडमध्ये खळबळ उडाली होती. एका सामान्य घरातील कष्टाळू मुलीला धनदांडग्यांनी संपवलं होतं. त्यामुळे राजकारण पेटलं होतं.

Year Ender 2022
Year Enders 2022 : हिजाब, सत्तासंघर्ष ते '35 तुकडे'; वर्षभरातील गाजलेले मुद्दे एका क्लिकवर

4. श्रद्धा वालकरचे ३५ तुकडे केले

या वर्षाच्या अखेरीस उघडकीस आलेल्या श्रद्दा वालकर केसने संपूर्ण देशाला स्तंभित केलं. कुणी इतका निर्दयी आणि क्रूर कसा असू शकतो? असा प्रश्न या घटनेनंतर पडू लागला. एकाच कंपनीत काम करणारे आणि लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणारे श्रद्धा वालकर आणि आफताब पूनावाला यांची ही कहाणी आहे.

मे २०२२ मध्ये १८ तारखेला आफताबने दिल्लीत घरामध्ये श्रध्दाचा खून केला. त्याने तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले. त्यानंतर त्याने ते तुकडे साठवण्यासाठी फ्रिज खरेदी केला. मग सोईनुसार त्या तुकड्यांची विल्हेवाट लावू लागला. दिल्लीतल्या महरौली जंगलामध्ये त्यांने श्रद्धाचे अनेक तुकडे फेकून दिले.

सहा महिने मुलाची कसलाच संपर्क होत नसल्याने तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. १२ नोव्हेंबरला पोलिसांनी आफताबला दिल्लीत अटक केली. या घटनेमध्ये अनेक खुलासे समोर आलेले आहेत. आफताबने खुनाची कबुलीही दिलीय. श्रद्धा लग्नासाठी आग्रह करीत असल्याने तिचा खून झाल्याचं प्राथमिक तपासातून पुढे आलं होतं.

या प्रकरणामध्ये आफताबची नार्को टेस्ट झालीय. पोलिसांना श्रद्धाच्या हाडाचे सापडलेले तुकडे आणि तिच्या वडिलांच्या ब्लड सॅम्पलची डीएनए टेस्ट केली. दोन्ही सॅम्पल मॅच झालेले आहेत. तरी अजूनही श्रद्धाचं शीर सापडलेलं नाही. या प्रकरणामध्ये राजकीय नेत्यांकडून लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित केला गेला आहे.

5. पतीच्या मृतदेहाचे १० तुकडे केले

श्रद्धा मर्डर केसप्रमाणेच आणखी एक धक्कादायक घटना दिल्लीमध्ये घडली. पत्नी आणि मुलाने मिळून ३० मे २०२२ रोजी एकाची हत्या केली. एवढ्यावरच ते थांबले नाही तर मृतदेहाचे दहा तुकडे करुन दिल्लीतील दोन भागांमध्ये फेकले. पोलिसांना ५ जून रोजी एका मृतदेहाचं शीर आणि काही अवयव सापडले होते. त्यानंतर पुढील तीन दिवसांमध्ये दोन पाय, दोन मांड्या, एक हात आणि कवटीचा भाग सापडला होता. मात्र अनेक महिने मृतदेहाची ओळख पटत नव्हती.

अंजन दास नावाचा व्यक्ती मिसिंग असल्याची तक्रारही दाखल नव्हती. परंतु सीसीटीव्हीमध्ये पोलिसांना एक धक्कादायक माहिती मिळाली. एक महिला आणि एक तरुण हातात बॅग घेऊन चालत होते. काही अंतराने ते जावून कचरा टाकल्यासारखं काहीतरी टाकत होते. यावरुन पोलिसांना सुगावा लागला. अंजन दासची पत्नी पूनम आणि मुलगा दीपक याला नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पोलिसांनी ताब्यात घेतलं.

''तो मुलांसोबत चुकीचं वागत होता आणि वाईट नियत ठेवत होता'' असा खुलासा आरोपी पत्नी पूनम दासने केला. शिवाय पतीला मी मारलं नसून मुलाने मारल्याचं तिने सांगितलं.

6. बापाचे 32 तुकडे करुन बोअरवेलमध्ये टाकले

कर्नाटकमध्ये अशीच किळसवाणी घटना घडली आहे एका मुलाने पित्याचा खून केला, मृतदेहाचे ३२ तुकडे करुन बोअरवेलमध्ये टाकले. या घटनेने कर्नाटक राज्य हादरुन गेलं होतं.

कर्नाटकच्या बोगलकोट येथे ही घटना घडली आहे. आरोपीचं नाव विठ्ठल आहे. त्याचं वय २० वर्षे असून पोलिसांना त्याला ताब्यात घेतलं. विठ्ठलच्या पित्याचं नाव परशुराम होतं.

पिता कायम दारुच्या नशेत असायचा आणि विठ्ठलला मारहाण करायचा. त्यामुळेच २० वर्षीय मुलाने त्याचा खून करुन मृतदेहाचे ३२ तुकडे केले. ते तुकडे त्याने कुणाला कळू नये म्हणून बोअरवेलमध्ये टाकले. ही घटना ६ डिसेंबर रोजी घडली असून १३ डिसेंबर रोजी उघडकीस आली.

7. पुण्यामध्ये फरसाणच्या भट्टीत बापाला जाळलं

पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना नुकतीच २५ डिसेंबर रोजी उघड झाली आहे. पित्याचे बाहेर प्रेमसंबंध होते म्हणून दोघा मुलांनी त्याची हत्या केली. पित्याचा मृतदेह त्यांनी फरसाणच्या भट्टीत जाळून राखेचीही विल्हेवाट लावली.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये ही घटना घडली आहे. धनंजय नवनाथ बनसोडे असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्याचं वच ४३ वर्षे होतं. नाशिक येथील एका महिलेसोबत धनंजयचे प्रेमसंबंध जुळले होते. ते दोघे सोशल मीडियावरुन चॅटही करत होते. मात्र मुलांना हे खपत नव्हतं.

धनंजयचा मुलगा सुजित बनसोडे (वय २२) आणि अभिजित बनसोडे (वय १८) या दोघांनी मिळून पित्याची हत्या केली. झोपेत असतांना त्यांनी धनंजयच्या डोक्यात लोखंडी वस्तू मारुन खून केला. धनंजयचा फरसाणचा कारखाना होता. या मुलांनी बापालाच त्या फरसाणच्या भट्टीत जाळून टाकलं. मृतदेह जळताना दुर्गंधी येऊ नये म्हणून त्यांनी अगरबत्त्या पेटवल्या होत्या.

यानंतर या दोन हत्याऱ्यांनी पित्याची राख इंद्रायणी नदीमध्ये टाकून दिली आणि भट्टीत दुसरीच राख आणून टाकली. धनंजयच्या प्रेयसीला संशय येऊ नये म्हणून आरोपी मुलगाच तिला चॅटिंग करु लागला. परंतु तिला संशय येऊ लागला.

प्रेयसीने धनंजयबद्दल त्याच्या मित्रांना विचारलं असता तो गायब झाल्याचं तिला कळालं. तिने पिंपरी चिंचवड पोलिसांना याबाबत माहिती दिली. म्हाळुंगे पोलिसांनी तपास केला असता धनंजयचा खून झाल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

माणुकसीला काळीमा फासणाऱ्या आणि क्रूर घटनांनी हे वर्ष व्यापून गेलं होतं. कोरोनाचं सावट कमी झाल्याने श्वास मोकळा झाला होता. परंतु माणसातले हैवानं निर्दयीपणे माणसं संपवत होतं. निदान पुढचं वर्ष तरी पॉझिटिव्हिटी देणारं ठरो, हीच अपेक्षा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.