बदलत्या युद्धनीतीनुसार भारतीय सशस्त्र दलांमध्ये तांत्रिक, आधुनिक प्रणाली, शस्त्रास्त्र अशा अनेक अत्याधुनिक गोष्टींचा समावेश करण्यात येत आहे.
पुणे - बदलत्या युद्धनीतीनुसार भारतीय सशस्त्र दलांमध्ये तांत्रिक, आधुनिक प्रणाली, शस्त्रास्त्र अशा अनेक अत्याधुनिक गोष्टींचा समावेश करण्यात येत आहे. जागतिक पातळीवर सशस्त्र दलांची ताकद वाढविण्यासाठी लष्कराच्या आधुनिकीकरणावर भर देण्यात येत आहे. असे असले तरी मनुष्यबळाची स्थिती पाहता सशस्त्र दलांमध्ये सुमारे दीड लाख पदे रिक्त असल्याची बाब नुकतीच समोर आली आहे.
एकीकडे सशस्त्र दलांमध्ये तरुणांना दाखल करण्यासाठी ‘अग्निपथ’सारखी योजना राबविण्यात येत असून महिलांना देखील आता एनडीए, आरआयएमसी सारख्या प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश देण्याची संधी मिळत आहे. सशस्त्र दलांमध्ये प्रवेशासाठी अनेक योजना तसेच प्रवेश परिक्षा, प्रक्रियांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यासाठी लाखोंच्या संख्येने तरुण-तरुणी अर्ज करतात. परंतु पात्रता निकषांच्या आधारावर केवळ काहींची निवड सशस्त्र दलांमध्ये होते. परिणामी अधिकारी, जवान यांची मोठ्या संख्येने पदे रिक्त आहेत. यामध्ये सर्वाधिक रिक्त पदे सैन्यदलात असून तिन्ही दलांमध्ये एकूण एक लाख पदे रिक्त आहेत. सशस्त्र दलांमध्ये अधिकारी, जवान यांची संख्या, रिक्त पदे, पदे भरण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या पदांची संख्या, तसेच यासाठी सरकारने उचललेली पावले या संदर्भातील माहिती नुकतीच लोकसभेत संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी लेखी उत्तरात दिली.
सशस्त्रदलातील भरती प्रक्रिया ही तिन्ही दलांच्या गरजेनुसार पार पडते. सशस्त्र दलातील सर्व रिक्त पदे कालबद्ध पद्धतीने भरण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. रिक्त पदांना भरण्यासाठी सरकारद्वारे अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामध्ये करिअर मेळावे, प्रदर्शने, लष्करातील विविध संधींबाबत तरुणांमध्ये जागृकता निर्माण करणे, संरक्षण क्षेत्रातील फायदे तसेच, सशस्त्र दलातील नोकरी आकर्षक करण्यासाठी पदोन्नतीच्या संधींमध्ये सुधारणा अशा वेगवेगळ्या माध्यमातून पदे भरण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत, असे ही भट्ट यांनी नमूद केले.
‘अग्निपथ’चा फायदा होऊ शकतो ?
कोरोनामुळे भरती प्रक्रिया देखील रखडल्या होत्या. त्यामुळे रिक्त पदांची संख्या ही जवळपास दीड लाखांच्या घरात आहे. केवळ जवानांच्या रिक्त पदांना पाहिलं तर तो आकडा अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांच्या तुलनेत मोठा आहे. वर्षातून दोन वेळा भरती प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियांना वेळ लागतो. तसेच दरवर्षी ४५ ते ५० हजार जवान निवृत्त होतात. त्यामुळे त्या रिक्त जागा आणि आता असलेली रिक्त पदे भरण्यासाठी किमान सात वर्षांचा कालावधी लागू शकतो. अग्निपथ योजने अंतर्गत दरवर्षी किती अग्निवीरांची निवड केली जाईल, ही माहिती देण्यात आली नाही. याची माहिती मिळाल्यास पुढील पाच वर्षांत किती जागा भरल्या जाऊ शकतात याबाबत स्पष्टपणे समजेल. असे संरक्षण तज्ज्ञ मेजर जनरल राजन कोचर (निवृत्त) यांनी सांगितले.
रिक्त पदांची कारणे
- अधिकाऱ्यांच्या तुलनेत जवानांच्या रिक्त पदांची संख्या जास्त
- मागील दोन वर्षांत कोरोनामुळे भरती प्रक्रिया झाली नाही
- दरवर्षी सुमारे ५० हजार जवान सेवानिवृत्त होतात
तिन्ही दलांमधील रिक्त संख्या
सैन्यदल - ११६४६४
नौदल - १३५९७
हवाईदल - ५२१७
विविध पदांसाठी इतक्या जागा भरण्याची मंजुरी
१) सैन्यदल -
अधिकारी - ५६९७२
नर्सिंग अधिकारी - ४३९६
जेसीओ/जवान - १२४१७६८
२) नौदल -
अधिकारी - ११८२१
सेलर - ७५८६६
३) हवाईदल -
अधिकारी - १२७४५
एअरमेन - १५६३६२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.