‘फाइव्ह-सी’ कौशल्ये

आज अस्तित्त्वात असलेल्या नोकऱ्या, करिअर आणि संधींपैकी ५० टक्के संधी १० वर्षांपूर्वीही अस्तित्वात नव्हत्या आणि यापुढे तुमची मुले पदवीधर होतील, तेव्हाच्या संधी, करिअर, आव्हाने पूर्णपणे भिन्न असतील.
5C skills
5C skillssakal
Updated on

- प्रांजल गुंदेशा, संस्थापक, द इंटेलिजन्स प्लस

शैक्षणिक प्रगतीसाठी अभ्यासाकडे दिलेलं प्रचंड लक्ष, त्याबाबतचा ताण आणि त्यासाठी गुंतवलेले तास हे सगळं खरोखरच आपल्या मुलाच्या भविष्यासाठी उपयुक्त ठरेल का? आपली प्रगती होण्यासाठी आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी हे पुरेसं आहे का? असे विचार आपण थांबवू शकत नाही. हे वास्तव आहे.

आज अस्तित्त्वात असलेल्या नोकऱ्या, करिअर आणि संधींपैकी ५० टक्के संधी १० वर्षांपूर्वीही अस्तित्वात नव्हत्या आणि यापुढे तुमची मुले पदवीधर होतील, तेव्हाच्या संधी, करिअर, आव्हाने पूर्णपणे भिन्न असतील. मग आपण त्यांना उद्यासाठी आज कसं तयार करू शकतो? आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, केवळ पदवी घेतल्याने आजच्या काळात नोकरी किंवा पगारवाढीची हमी मिळते का? तर, नाही! नोकरीच्या बाजारपेठेतील सर्व सर्वोत्तम कंपन्या पदवीच्या पलीकडे काही तरी शोधत आहेत.

‘इनोव्हेशन’चे युग

जर आपण इतिहासाचा अभ्यास केला, तर त्यातून आपण भविष्यासाठी तयार होण्यास सक्षम होऊ शकू. मानवी युगातील प्रचंड मोठा काळ केवळ दोन प्रमुख आयुधांवर बेतलेला होता. ती आयुधे म्हणजे, दगडाचे अणकुचीदार तुकडे आणि कुऱ्हाड. औद्योगिक युगात मात्र दर २० वर्षांनी नवे कारखाने आणि यंत्रे तयार करण्यात आली आणि आताच्या काळात तर ६-७ वर्षांनी बदल होताना दिसतात.

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात दर तीन महिन्यांनंतर नवनवीन प्रणाली किंवा प्रारूपे (मॉडेल्स) बाजारात दाखल होतात. याचाच अर्थ असा की, प्रत्येक युगात बदल हा अपरिहार्यतेने होत गेला आहे आणि त्यामुळे केवळ बदल हाच स्थिर आहे. आता आपण ‘इनोव्हेशन’च्या (नवोन्मेष) युगात आहोत.

नवोन्मेषाच्या या काळात संपूर्ण शिक्षण प्रणालीला ‘कंटेन्ट’मधून ‘कॉन्टेक्स्ट’मध्ये बदलणं आवश्‍यक आहे. आताच्या काळात काही सेकंदांत बोटांच्या एका क्लिकवर सर्व माहिती उपलब्ध होऊ शकते. मात्र, उपलब्ध होणारी माहिती योग्य त्या संदर्भात वापरणे आणि तिचा नीट उपयोग करणे ही क्षमता असावी लागते. ती निर्णायक ठरते.

‘फाइव्ह- सी’

जागतिक आर्थिक परिषदेच्या (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, भविष्यासाठी सर्वांत महत्त्वाचे कौशल्य म्हणजे - ‘५ सी’ आहे. ते कोणते, हे जाणून घेऊया...

क्रिएटिव्हिटी (सर्जनशीलता) :

चौकटीच्या बाहेरच्या कल्पनांचा विचार करण्याची क्षमता, प्रश्‍न सोडवणाऱ्याची मानसिकता, नवनवीन कल्पना शोधणं आणि त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यावर काम करणं या प्रकारच्या कौशल्यांची खूप आवश्‍यकता असते. सरधोपण काम करण्याने तुम्ही फार काळ टिकू शकत नाही.

कम्युनिकेशन (संज्ञापन/संवाद) :

तुमच्या कल्पना व्यक्त करण्याची, मते मांडण्याची, विरोधी मत व्यक्त करण्याची, मन वळवण्याची, इतरांना प्रेरणा देण्याची, नवा दृष्टिकोन देण्याची आणि स्वतःची भूमिका समजून घेण्याची क्षमता महत्त्वाची ठरते. ही क्षमता असल्यास तुम्ही नेतृत्व करू शकता.

क्रिटिकल थिंकिंग (विचार) :

माहितीच्या महासागरात आपल्या हाती लागणारा विविध प्रकारचा ‘डेटा’, नवनवीन संदर्भ, विविध पर्याय, त्यावरील विश्लेषण आणि त्यांचे मूल्यांकन करण्याची क्षमता असायला हवी. त्यातून जे निष्कर्ष समोर येतात त्यावरून योग्य ते निर्णय घेता यावेत.

कोलॅब्रेशन (सहयोग) :

जग अधिकाधिक प्रमाणात एकमेकांशी जोडले जात आहे. त्यामुळे अधिक संधी निर्माण होत असून, नवनवीन पर्याय, स्पर्धा निर्माण होत आहे. त्यामुळे या पुढचा काळ हा एकट्याने प्रवास करण्याचा नसून नवनवीन उत्तम गोष्टी एकमेकांच्या सहयोगाने घडवून आणण्याचा आहे. त्यामुळे हे कौशल्य असणे महत्त्वाचे ठरते.

कॉग्निटिव्ह फ्लेक्जिबिलिटी (संज्ञानात्मक लवचिकता) :

वेगवान नवकल्पना उदयास येत असताना बदलते ट्रेंड, नवा दृष्टिकोन, तंत्रज्ञान, काम करण्याच्या पद्धती आणि वेगवान जगाच्या विविध गरजा हे सगळं समजून घेण्यासाठी आपण लवचिक असणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ - एआय तुमची नोकरी काढून घेणार नाही, परंतु एआय कसे वापरायचं? हे माहीत नसेल तर ती संधी दुसरं कोणी तरी घेईल. यासाठी लवचिकता आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची, नवं शिकण्याची, पर्यायांकडे उत्सुकतेने पाहण्याची क्षमता असणं आवश्‍यक आहे.

‘५- सी’वर प्रभुत्व मिळवल्याने केवळ आपल्या करिअरमध्ये फायदा होतो असं नाही, तर आपल्या जीवनातही अनेक बदल घडून येतात. सात वर्षांपासूनच्या पुढच्या वयोगटांतील शाळांच्या विद्यार्थ्यांमध्ये ही कौशल्ये निर्माण व्हावीत यासाठी आतापासूनच प्रयत्न करायला हवेत.

इनोव्हेशनच्या या युगात पालक म्हणून तुम्ही तुमच्या मुलासाठी काय निवडता हे खूप महत्त्वाचे ठरते. अशाच प्रकारची विविध माहिती वाचण्यासाठी आणि त्यावरील व्हिडिओ पाहण्यासाठी इन्स्टाग्रामवर Pranjal_gundesha या पेजला आणि यू-ट्यूबवर TheIntelligencePlus या चॅनेलला भेट द्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.