Women's Day Special : कॉलराने कसा घेतला होता मुलींच्या पहिल्या शाळेचा बळी ?

अमेरिकन मराठी मिशनने देशात पहिल्यांदाच आधुनिक पद्धतीच्या शाळा उघडण्याचे मोठे काम केले.
Girl's School
Girl's Schoolgoogle
Updated on

मुंबई : अमेरिकन मराठी मिशनचे गॉर्डन हॉल सॅम्युएल नॉट आणि त्यांच्या पत्नी रॉक्सना नॉट या तीन व्यक्ती म्हणजे आधुनिक काळात भारतात मुंबईच्या बंदरावर १२ फेब्रुवारी १८१३ रोजी पाऊल ठेवणारे पहिले तीन मिशनरी होते.

अमेरिकन मराठी मिशनने देशात पहिल्यांदाच आधुनिक पद्धतीच्या शाळा उघडण्याचे मोठे काम केले. त्यांच्यानंतर काही वर्षांतच स्कॉटिश मिशनरींनीही पश्चिम किनाऱ्यावर, पुण्यात आणि मुंबईत मुलींच्या शाळा सुरू केल्या.

या शाळा सर्वांना खुल्या होत्या.  ख्रिस्ती मिशनरींच्या धोरणांनुसार स्त्री-पुरुष  असा लिंगभेद न करता, जात-धर्म म्हणजे उच्च जाती किंवा अस्पृश्य असा विचार न करता शिक्षणाची कवाडे अशाप्रकारे पहिल्यांदाच सर्वांना खुली करण्यात आली होती.

मात्र ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी आलेल्य मिशनरींनी मुलामुलींच्या शाळा सुरु करणे आणि एतद्देशीयांच्या  शिक्षणप्रसारात रस घेणे याचा काय संबंध असा प्रश्न उभा राहू शकतो.  अमेरिकन मराठी मिशनच्या धर्मप्रसाराच्या कार्याबाबत १८८१च्या  मेमोरियल पेपरमध्ये   लिहिताना रेव्हरंड एस. बी. फेयरबँक यांनी यासंदर्भात म्हटले आहे :  ``मिशनरी कार्य करताना मिशनरींनी तीन बाबींवर भर दिला. त्यापैकी पहिले कार्य होते शिक्षण, दुसरे कार्य होते धर्माची शिकवण आणि तिसरे कार्य होते धर्मशास्त्रे आणि ख्रिस्ती साहित्य मराठी भाषेत छापणे. ‘’

हेही वाचा - परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर

Girl's School
Anandibai Joshi : आनंदीबाई जोशी या एकट्याच पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होत्या का ?

 श्री. म. पिंगे यांनी `युरोपियनांचा मराठीचा अभ्यास व सेवा' या आपल्या ग्रंथात म्हटले आहे : ``हॉल व नॉट हे मुंबईत राहिल्यानंतर व मराठी शिकल्यानंतर सन १८१५ मध्ये त्यांनी इंग्रजी शाळा काढली. त्यात  प्रथम २५ मुले होती. याशिवाय दोन व्हर्नाक्युलर शाळांत ४० मुले होती, प्रथम त्यांना शिक्षक मिळण्यात अडचण आली.

पण पुढे दोन ब्राह्मण  शिक्षक त्यांना मिळाले व ते व्हर्नाक्युलर शाळांत शिकवू लागले. पुढील वर्षी शाळांची संख्या वाढली व एकंदर ३०० विद्यार्थी झाले. इ. स. १८१८ मध्ये ११ शाळा व ६०० विद्यार्थी होते. ’’ हिंदुस्थानात पहिल्यांदाच अशा प्रकारे सर्व जातीधर्माच्या आणि स्त्री-पुरुषांना साक्षर करणाऱ्या आधुनिक शिक्षणपद्धतीचा पाया रचला केला.’’

 सरोजिनी बाबर यांनी 'स्त्रीशिक्षणाची वाटचाल' या आपल्या पुस्तकात लिहिले आहे. ``ख्रिश्चन मिशनऱ्यांनी खासगी प्रयत्नांच्या बळावर बंगाली मुलींना सार्वजनिक शाळा काढून देण्याचा प्रयत्न केला होता (इ. स. १८१९ व १८२४ मध्ये),'' ``इ.स. १८२१ मध्ये स्थापन झालेल्या कलकत्त्यामधील मुलींच्या शाळेत संपूर्ण वेळ शिक्षकाचे काम करण्यासाठी म्हणून कु. मेरीअँन कुक या इंग्लंडहून मुद्दाम आल्या होत्या  व याच शाळेतून त्या इ स, १८४५ ला सेवानिवृत्तही  झाल्या  होत्या.''

सरोजिनी बाबर पुढे लिहितात : इ स १८२४ मध्ये अमेरिकन मिशनऱ्यांनी मुंबईस एतद्देशीय मुलींच्याकरिता म्हणून एक खास अशी स्वतंत्र शाळा स्थापन केली होती. मुंबई इलाख्यातील ही मुलींची पहिलीच शाळा होय. त्यानंतर दोनतीन वर्षांतच  मुलींच्या शाळांचीही संख्या नवावर गेली व सुमारे ३०० मुली शिक्षण घेऊ लागल्या.

इ स १८२९ मध्ये विद्यार्थिनींची संख्या ४०० वर गेली. त्या वेळच्या एका शाळेस जोडून मुलींचे वसतिगृहदेखील होते हे विशेष होय. ही शाळा मुंबईत भायखळ्यास चालू होती.'' 

अमेरिकन मराठी  मिशनची भायखळ्याची ही शाळा आणि वसतिगृह सिंथिया फरार चालवत होत्या.     

``इ स १८३०च्या सुमारास हिंदुस्थानभर खास मुलींच्या अशा तीसेक तरी शाळा स्थापन झाल्या होत्या आणि त्यांमधून ५०० च्या आसपास मुली शिक्षण घेत होत्या ही वस्तुस्थिती आहे. मिस कुक (मिसेस विल्सन ) यांच्या प्रयत्नामुळे इ स १८४० मध्ये बंगाल इलाख्यात ५०० मुली शिक्षण घेत होत्या हेही विशेष होय. त्याच साली प्रसिद्ध झालेल्या शिक्षण खात्याच्या वृत्तांतातील माहितीवरून त्यावेळी पुण्यात मुलींच्या पाच शाळा होत्या असे दिसते,''  असे सरोजिनी बाबर यांनी लिहिले आहे.  

नरेंद्र चपळगावकर यांनी `सावलीचा शोध' या पुस्तकात स्कॉटिश मिशनरी जॉन विल्सन आणि त्याची पत्नी मार्गारेट यांच्या शिक्षणकार्याची माहिती दिली आहे. त्यानुसार  ‘’स्कॉटिश मिशनने कोकणात मिशनकार्य सुरु केले होते. डोनाल्ड मिचेल हा मिशनरी रत्नागिरीपाशी असलेल्या बाणकोट येथे १८२३च्या जानेवारीत पोहोचला होता, तेथे मराठी शिकून त्याने तेथे लगेच एक मराठी शाळा काढली.

जेम्स मिचेल आणि अलेक्झांडर  क्रॉफर्ड हे स्कॉटिश मिशनरीही तेथे त्याच्या कामात सहभागी झाले.  बाणकोट आणि हर्णै येथे स्कॉटिश मिशनचे कार्य चालू होते. सण १९२९ च्या दरम्यान या भागातल्या स्कॉटिश मिशनच्या शाळांची संख्या ८० पेक्षा जास्त होती, त्यात तीन हजारांहून अधिक विद्यार्थी शिकत होते आणि विशेष म्हणजे त्यात तीनशेपेक्षा अधिक मुली होत्या. .

विल्सनची पत्नी मार्गारेट हर्णैला असताना स्कॉटिश मिशनने सुरू केलेल्या मुलींच्या शाळांत रस घेऊ लागली. हेच काम मुंबईत सुरु करण्याचे तिने ठरविले. अमेरिकन मराठी मिशनने त्यापूर्वीच मुंबईत मुलींच्या शाळा सुरु केल्या होत्या.

 १८२९च्या सप्टेंबरात विल्सन दाम्पत्य मुंबईत आले आणि  अंब्रोळीच्या मिशन हाऊसमध्ये त्यांनी शाळा सुरु केली. मुलींना मार्गारेट शिकवत असे. या शाळेत पहिल्या तीन महिन्यांतच ५३ मुली दाखल झाल्या होत्या. मार्गारेट विल्सन यांनी आपल्या घरातच मुलींची शाळा चालू केली होते, त्यापैकी काही मुली अपंग तर काही अनाथ होत्या. 

मार्गारेटने पुढील सहा महिन्यांत  सहा शाळा मुंबईत सुरु केल्या आणि या शाळांत १२५ मुली शिकत होत्या. या शाळांत सर्वाधिक हिंदू मुली होत्या, पारशी आणि मुस्लिम मुलीही होत्या. प्रामुख्याने मराठी माध्यम होते. विल्सनने २९ मार्च १८३२ रोजी अंब्रोळी इंग्लिश स्कुल सुरु केली.  या शाळेची परिक्षा सार्वजनिकरीतीने होई. 

या शाळेला नंतर कॉलेज डिव्हिजन जोडण्यात आले. या शाळेत इंग्रजी वाचन, व्याकरण, गणित, भूमिती, भूगोल इतिहास बायबल हे विषय शिकवले जात असत. हिंदुस्थानात अशा प्रकारे पहिल्यांदाच आधुनिक शिक्षणाचा पाया रचला जात होता. १९ एप्रिल १९३५ला मार्गारेटचे  मुंबईतच निधन झाले.  

Girl's School
Government Scheme : मुलींसाठी का महत्त्वाची आहे 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' योजना ?

 रेव्हरँड आय बिस्सेल यांनी अमेरिकन मराठी मिशनच्या सुरुवातीपासून १८१३  ते  १८८१ पर्यंत  शैक्षणिक कार्याच्या लिहिलेल्या अहवालानुसार  १८१५ च्या मे महिन्यात हिंदू मुलींच्या पहिल्याच आणि एकमेव शाळेचा उल्लेख करण्यात आला आहे. 

त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यातल्या  नोंदीनुसार या मिशनरींच्या शाळेत अंदाजे २५ विद्यार्थी होते. अमेरीकन मराठी मिशनच्या ऑगस्ट १८२६च्या अहवालात पुढील माहिती देण्यात आली होती :  

``आता आमच्या मुलींच्या शाळांची संख्या नऊ असून त्यातील विद्यार्थिनींची संख्या २०४ आहे.  या मुलींमध्ये ब्राह्मणांच्या मुली मोठ्या  संख्येने असून त्याशिवाय इतर वरच्या जातींतील खूप मुली आहेत.  या विद्यार्थींनींना वाचन, लिखाण आणि गणित शिकवले जाते. त्याशिवाय त्यांच्याकडून दहा आज्ञा तोंडपाठ करून घेतल्या जातात आणि त्यांच्यासाठी तयार केलेला कँथेखिझम (ख्रिस्ती धर्माची ओळख) शिकवला जातो. या मुलींपैकी जवळपास ८० मुली आता लिहिण्यास शिकल्या आहेत. '' 

सावित्रीबाई फुले यांचे एक चरित्रकार असलेल्या मा. गो. माळी यांनी महात्मा फुले गौरव ग्रंथातल्या  `क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले : काळ व कर्तृत्व'  या लेखात म्हटले आहे : 

एकोणिसाव्या शतकात स्त्री व अतिशूद्र यांच्या शिक्षणाचे कार्य करणे किती महाकठीण काम होते याची कल्पना येते. त्यातल्यात्यात पुण्यासारख्या ठिकाणी मुलींसाठी व अतिशूद्रांसाठी शाळा सुरू करणे आणि ती चालवून दाखविणे म्हणजे तर एक दिव्यच होते, प्राणावरचा प्रसंग होता. कारण पुणे म्हणजे एकोणिसाव्या शतकातील भटभिक्षुकांच्या भाकड व भोगळ लोकांचे माहेरघर, भटभिक्षुक निर्मित धर्म व धर्माचाराची राजधानी. मग अशा ठिकाणी स्त्रीशूद्रांना शिक्षण देण्यासाठी शाळा चालू करणे हे तत्कालीन मिशनरी लोकांनासुद्धा जमले नाही. 

मिस (मेरी अँन )  कुक यांनी १८२० साली बंगालमध्ये काही शाळा चालू केल्या. त्यानंतर त्या १८२९ साली मुंबईस आल्या. त्यांनी मि. विल्सन साहेबाशी लग्न केले. त्या मिसेस विल्सन झाल्या. मुंबई इलाख्यात त्यांनी सहा शाळा काढल्याची नोंद आढळते.

त्या बाई मोठ्या जिद्दीच्या व कल्पक होत्या. पण पुण्यामध्ये मात्र त्यांची डाळ शिजली नाही. १८३० साली पुण्यात त्यांनी शनिवारवाडयात शाळा काढल्याचा दाखला मिळतो. सरकारने ही जागा दिली होती. बार्ट फ्रिअर हा मिशनरी म्हणतो की या शाळेत फक्त आठ मुली येत होत्या. त्या ५-६ वर्षांपेक्षा मोठया नव्हत्या. तरीपण त्यांना शिकविण्याचे काम फार गुप्तपणे चाले. त्या शाळेत मुली शिकायला लपत-छपत येत व शाळेतून बाहेर पडताच चोरट्यासारखे घरी निघून जात. ही शाळा कशीबशी १८३२ पर्यंत चालली. शेवटी यशस्वी म्हणून गाजलेल्या मिसेस विल्सन हिला ती बंद करावी लागली.

त्या दरम्यान नुकत्याच खिस्ती झालेल्या मोडक नावाच्या व्यक्तीने महार- वाड्यात एक मुलीची शाळा काढली. परंतु कर्मठ भटभिक्षुकांनाही मागे टाकणाऱ्या रुढीप्रिय शूद्र-अतिशूद्रांनी ती बंद करण्यास भाग पाडले.  १८४४ साली चर्च  ऑफ स्कॉटलंड मिशनने मंगळवार पेठेत एक मुलींची शाळा काढली, तीत युरोपियन शिक्षिका व पुरेशी साधनसामग्री अशी सर्व सोय केली होती. परंतु १८४७ साली ही शाळा बंद पडली. या तपशिलावरून पुण्यामध्ये एकोणिसाव्या शतकात स्त्री व शूद्र यांच्यासाठी शाळा सुरू करून त्या पुढे चालविण्याचा सर्व प्रयत्न विफल झाल्याचे दिसून येईल.’’

याच काळात अमेरीकन मराठी मिशनचे  रेव्हरंड अँलन ग्रेव्हज आणि त्यांच्या पत्नी मेरी हे दाम्पत्य अनेक वर्षे  महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी मुलींच्या शाळा चालवत असत.

 अमेरिकन मराठी मिशनच्या वतीने मुलींची पहिली शाळा मुंबईत १८२४च्या मार्चमध्ये उघडण्यात आली. देशाच्या या भागात मुलींची ही  पहिलीच शाळा होती. गंगाबाई या नावाच्या एक भारतीय शिक्षिका या शाळेत शिकवत असत.  मुलींची ही शाळा उघडताच मुंबईतल्या दोन ब्रिटिश महिलांनी या शाळेचा सर्व खर्च उचलण्याची तयारी दाखवली. दुर्दैवाने त्यानंतर लगेचच मे महिन्यात प्राणघातक कॉलराची भीषण  साथ पसरली. या रोगाच्या साथीत मुंबईतील हजारो लोकांचा बळी गेला. या लोकांमध्ये या मुलींच्या शाळेतील स्कुलमिस्ट्रेस असलेल्या गंगाबाई यांचाही समावेश होता. मृत गंगाबाईंची जागा घेण्यासाठी इतर कुणीही नसल्याने ही शाळा बंद करावी लागली.

अमेरिकन मराठी मिशनच्या १८८१च्या  वर्धापनानिमित्त एका अहवालात मिसेस एल. एस. गेट्स लिहितात : ``माझ्या माहितीनुसार मुलींसाठी पहिली शाळा पश्चिम भारतात १८२४ साली स्थापन करण्यात आली. गंगा या नावाच्या मुलीला मिशनरी महिलांनी शिकवले होते. मुलींच्या या पहिल्या शाळेत शिकवण्याचे काम त्यांना  देण्यात आले होते.  काही ब्रिटिश महिला आणि पुरुषांनी या शाळेचा आर्थिक भार उचलण्याची तयारी दाखवली होती. मात्र कॉलरा साथ आली आणि निष्ठावान गंगा यांचा या  प्राणघातक रोगाने बळी घेतला.''  

या पहिल्या मुलींच्या शाळेतल्या पहिल्या एतद्देशीय महिला शिक्षिका असलेल्या या गंगाबाईंबद्दल इतर काहीच माहिती उपलब्ध नाही हे सांगायला आम्हाला खूप खेद  होतो असे अमेरिकन मराठी मिशनच्या या वर्धापनावेळी सांगितले गेले. 

या गंगाबाई स्वतः कुठे शिकल्या होत्या ? स्त्रीशिक्षणाबाबत प्रचलित समाजात अत्यंत प्रतिकूल भावना असताना या मुलींच्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करण्याचे धाडस त्यांनी कसे केले ? असे अनेक प्रश्न काळाच्या उदरात गडप होऊन आतापर्यंत अनुत्तरित राहिले आहेत असे या अहवालात म्हटले आहे. 

यदाकदाचित भविष्यकाळातील संशोधनातून देशातील आधुनिक काळातील या पहिल्यावहिल्या एतद्देशीय शिक्षिकेबद्दल माहिती उपलब्ध होऊ शकेल.

अमेरिकन मराठी मिशनच्या मुंबईत टाऊन हॉल येथे ७ नोव्हेंबर १९१३ रोजी झालेल्या शताब्दीसोहोळ्यात भारतीय ख्रिश्चनांच्या वतीने बोलताना बापुराव एन आठवले (बीए, एलएलबी, जेपी) यांनीं म्हटले  होते ``- 

``भारतीय ख्रिस्ती समाजाच्या वतीने येथे बोलताना अमेरीकन मराठी मिशनच्या आमच्या बंधूंनीं केलेल्या  कार्याचे आम्ही कौतुक करतो आणि या मिशनच्या शताब्दी सोहोळ्यात आनंदाने सहभागी होत आहोत. या मुद्द्यावर बोलत असताना  या देशात स्त्रियांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ करणाऱ्या अमेरिकन मराठी मिशनची आपण  सर्वांनी स्तुती करावी असे मी तुम्हा सर्वांना आवाहन करत आहे.  गॉर्डन हॉल आणि सॅम्युएल नॉट यांच्या १८१३ सालच्या आगमनानंतर केवळ अकरा वर्षांतच  भायखळा येथे मुलींची पहिली शाळा गंगाबाई नावाच्या महिला शिक्षिकेच्या देखरेखीखाली सुरु झाली.. त्याकाळी अंधश्रद्धेच्या खडकातून बाहेर पडलेला  हा  पाण्याचा झरा वाढत्या ताकदीने देशाच्या  कानाकोपऱ्यांत इतक्या प्रमाणात  वाढला आहे की आता आपण पाहतोच आहे की महिला हल्ली त्यांच्यासाठी स्वतंत्र कॉलेजेस आणि विद्यापीठे उघडण्यात यावी यासाठी संघर्ष करत आहेत.'' 

``मराठीत उपलब्ध  असलेल्या एकोणिसाव्या शतकाच्या इतिहासाचा जेव्हा आपण मागोवा घेतो तेव्हा भारतात झालेल्या ख्रिस्ती धर्माच्या आगमनाने येथील एकूण जीवनांत जे काही बदल झाले त्यांचा सविस्तर, साद्यन्त, तर्कशुद्ध आणि तटस्थ इतिहासच लिहिला गेला नाही याची आपणास जाणीव होते असे ज्येष्ठ साहित्यिक आणि समिक्षक सुधीर रसाळ यांनी म्हटले आहे.

`` भारताच्या सामाजिक इतिहासाची कितीतरी सामग्री ख्रिस्ती साहित्यात दडलेली आहे.  जोपर्यंत ख्रिस्ती साधनसामुग्रीचा वापर करून एकोणिसाव्या शतकाचा इतिहास लिहिला जात नाही तोपर्यंत तो पूर्ण झाला असे म्हणता येणार नाही,’’ असे सुधीर रसाळ यांनी माजी न्यायमुर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या `सावलीचा शोध’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे.

ही टिपण्णी सर्वार्थाने खरी आहे याची प्रचिती अमेरीकन मराठी मिशनच्या कार्याचा आणि या संस्थेने मागे ठेवलेल्या अमूल्य दस्तऐवजांचा अभ्यास करताना येते. 

मुंबईत भायखळा इथली  मुलीची ही पहिली शाळा बंद पडल्यावर लगेचच पुन्हा नव्या जोमाने मुलींची शाळा उघडण्याचे प्रयत्न झाले. 

हिंदुस्थानात ब्रिटिश अमदानीत सर्वप्रथम आगमन केलेल्या  आणि या देशात पहिल्यांदाच मुला-मुलींसाठी शाळा सुरु करणाऱ्या  आद्य मिशनरी गॉर्डन हॉल यांचे २० मार्च १८२६ रोजी वयाच्या अवघ्या ४१व्या वर्षी नाशिकजवळ दोडी दापुर या गावी निधन झाले, हा अमेरिकन मराठी  मिशनला मोठा धक्का होता.

त्यानंतर अमेरिकेतून या मिशनच्या आणखी काही मिशनरींचे मुंबईत आगमन झाले. डेव्हिड ओ अँलन, त्यांच्या पत्नी एज्युबा अँलन,  सायरस स्टोन, त्यांच्या पत्नी अँटोसा स्टोन यांचे आगमन झाले होते आणि त्यांच्या बरोबर आणखी एक व्यक्ती होती. 

ती व्यक्ती म्हणजे  स्टोन यांच्या जवळच्या नातेवाईक, बहुधा चुलतबहिण, (कझन ) असलेल्या मिस सिंथिया फरार.  हिंदुस्थानात येणाऱ्या पहिल्या अविवाहित महिला ख्रिस्ती मिशनरी.

सिंथिया फरार यांची एक अत्यंत महत्त्वाची ओळख म्हणजे समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या आणि  त्यांच्या सहकारी फातिमा शेख  या दोघींच्या  या शिक्षिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.