Social service
Social servicesakal

समाजसेवेची संधी देणारे क्षेत्र

सामाजिक काम करण्याची आवड असणारे लोक सध्याच्या काळात खूप कमी दिसतात.
Published on

- प्रा. विजय नवले, करिअरतज्ज्ञ

सामाजिक काम करण्याची आवड असणारे लोक सध्याच्या काळात खूप कमी दिसतात. कामातून मिळणारी प्रसिद्धी, योगदान दिल्यामुळे मिळणारी प्रतिष्ठा, समाजातील स्थान, आदरयुक्त कर्तृत्व या करिअरच्या प्राप्ती अप्रत्यक्षपणे आणि न मागता मिळतातच.

आयुष्य सत्कारणी लागले असे मनोमन वाटण्यासाठी केवळ पैसा हेच एकमेव साधन असू शकत नाही. अशा पद्धतीने विचार करणाऱ्यांसाठी एक शिक्षणव्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे. त्यासाठी सामाजिक कार्यातील पदवी म्हणजेच ‘बीएसडब्ल्यू’ (बॅचलर ऑफ सोशल वर्क) घ्यावी लागते.

कालावधी व पात्रता

बारावीनंतर हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. काही संस्थांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे चार वर्षांचा अभ्यासक्रम जाहीर करण्यात आला आहे. कोणत्याही विद्याशाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र आहे. बारावीमधील किमान ५०% गुणांची अट स्वाभाविकपणे लागू असली तरीही काही संस्थांच्या नियमांप्रमाणे यात अंशतः सवलत असू शकते. राष्ट्रीय स्तरावरील ‘सीयूईटी’सारखी प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण होऊन विद्यार्थ्यांना प्रथम वर्षास प्रवेश मिळतो.

शिकविले जाणारे विषय

सामाजिक कामांची ओळख, समाजशास्त्र, मानसशास्त्र, भारतीय समाजरचना, पर्यावरण, संशोधन आणि सांख्यिकी, सामाजिक न्याय, मानवाधिकार, सामाजिक धोरणे आणि नियोजन, समुपदेशन, सामाजिक कामाचे प्रशिक्षण, व्यसनमुक्ती, युवकांचे प्रबोधन, आरोग्यासंदर्भात काम, कायद्याची तोंडओळख, सामाजिक संस्थांचे व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, विविध सामाजिक घटकांच्या समस्या, समस्या निराकरणाचे प्रकार, अर्थशात्राची ओळख, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, सीएसआर आदी विषयांवर अध्यापन केले जाते.

स्वरूप

हा कोर्स थेअरी विषयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अवगत केला जातो. त्याचसोबत प्रात्यक्षिके असतात. प्रकल्पभेटी असतात. त्या अनुषंगाने प्रवास असतात. ‘सेमिस्टर पॅटर्न’ असणाऱ्या या अभ्यासक्रमात असाइनमेंट्स, प्रोजेक्ट, इंटर्नशिप, केस स्टडीज, लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, गेस्ट लेक्चर्स, रीसर्च स्टडी या सर्व बाबी असतात.

उच्च शिक्षण व स्कोप

या पदवीनंतर एमएसडब्ल्यू आणि पीएचडी या माध्यमातून उच्च शिक्षण घेता येते. निव्वळ सामाजिक काम हा जरी उद्देश असला, तरीही विविध समस्या हाताळताना संशोधन करणे, वर्तमानपत्रे आणि पुस्तकांच्या माध्यमातून लेखन करणे, समुपदेशन करणे, व्याख्याने देणे, प्रबोधन करणे आदी अनेक कामांच्या संधी या क्षेत्रात मिळतात. पैसे म्हणजेच करिअर नसून आयष्याला ध्येय असावे आणि इतरांच्या कामी येता यावे असे वाटणाऱ्यांसाठी हे मोठे कर्तृत्वक्षेत्र आहे.

कोर्स कुणी करावा?

सामाजिक कामाची आवड असणाऱ्या युवकांनी या पदवीचा विचार करावा. लहान मुले, महिला, अपंग, अनाथ, पीडित, शोषित आदींसंदर्भात काम करावेसे वाटणारे या आणि अशा असंख्य विषयांच्या मुळाशी जाऊन भिडणारे या क्षेत्रात पाय ठेवतात. शैक्षणिक उपक्रम, आर्थिक सबलता उपक्रम, संकटमोचन कार्य, दीर्घकालीन कार्यनियोजन अशा कामांच्या माध्यमातून कार्यरत राहू इच्छिणारे नक्कीच या अभ्यासक्रमाचा विचार करतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.