भारतासह संपूर्ण जगभरात नुकतीच स्वामी विवेकानंद यांची जयंती १२ जानेवारीला साजरी करण्यात आली. विवेकानंदांचे चरित्र आणि त्यांनी मांडलेले तत्त्वज्ञान हे महासागरातील उत्तुंग दीपस्तंभाप्रमाणे गेली १०० वर्षे जगाला मार्गदर्शन करत आहे. विवेकानंदांच्या या विजिगीषू तत्त्वज्ञानाची आणि त्यांच्या जीवनातील विविध टप्प्यांतील प्रेरणादायी प्रसंगांची मांडणी करणारे पुस्तक म्हणजे सुनील चिंचोलकर लिखित मानवतेचा महापुजारी - स्वामी विवेकानंद.
या पुस्तकाच्या सुरुवातीच्या प्रकरणांमध्ये विवेकानंदांचे तत्त्वज्ञान मांडण्यात आले आहे. भारतीय तत्त्वज्ञान जरी अत्यंत व्यापक असले, तरी ते तितकेच गूढ आणि गहन आहे. स्वामी विवेकानंदांनी हेच तत्त्वज्ञान सध्याच्या गतिमान जगात आणि विज्ञानयुगातही लागू पडेल अशा अर्थाने सोपे करून सांगितले आहे.
हे तत्त्वज्ञान केवळ संन्यासी आणि ईश्वरप्राप्तीची अपेक्षा ठेवणाऱ्या साधकांसाठीच नसून, व्यवहारिक जीवनात विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळवण्यासाठी, युवकांना त्यांचे करिअर चांगले घडविण्यासाठी, पालकांना आपल्या पाल्यावर चांगले संस्कार करण्यासाठी आणि सामान्य व्यक्तीला असामान्य बनण्यासाठी मार्गदर्शक ठरणारे आहे.
विवेकानंदांच्या जीवनातील प्रेरक प्रसंगांची मांडणी या पुस्तकात केली आहे. विशेषतः ज्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती फारशी चांगली नाही किंवा ज्या युवकांना अद्याप त्यांच्या करिअरमध्ये फारसे यश मिळवता आलेले नाही, त्यांच्यासाठी तर विवेकानंदांच्या विद्यार्थीदशेतील आणि युवावस्थेतील प्रसंग हे वाटाड्याचे काम करतात.
शिकागो येथील ज्या व्याख्यानामुळे संपूर्ण जगभरात भारतीय तत्त्वज्ञानाचा डंका वाजविला गेला आणि विवेकानंद जगाला समजले, त्या शिकागो परिषदेत सहभागी होण्यासाठी स्वामी विवेकानंदांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, या आत्मसाक्षात्कारी पुरुषाने ज्या कमालीच्या धीराने या सर्व प्रसंगांना तोंड दिले त्या सर्व घटना या पुस्तकात मुळातून वाचायलाच हव्यात.
आपल्या सर्वांच्या आयुष्यात कधी तरी अपयश येणे आणि समस्या निर्माण होणे स्वाभाविक आहे, पण या अपयशाने अथवा समस्यांनी खचून न जाता प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची प्रेरणा आणि त्यातून विजयाची शाश्वती हे पुस्तक म्हणजेच यातील विवेकानंदांचे विचार देतात.
(संकलन - रोहित वाळिंबे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.