शिक्षण क्षेत्रातील ‘एआय’

मानवाला असा भ्रम आहे की, तो जगातील सर्वांत बुद्धिमान प्राणी आहे. मात्र, आपण निसर्गातील काही गोष्टी नीट बघितल्या असतील, तर काही प्रश्न नक्कीच पडतील.
artificial intelligence
artificial intelligencesakal
Updated on

- प्रा. डॉ. गणेश काकंडीकर

मानवाला असा भ्रम आहे की, तो जगातील सर्वांत बुद्धिमान प्राणी आहे. मात्र, आपण निसर्गातील काही गोष्टी नीट बघितल्या असतील, तर काही प्रश्न नक्कीच पडतील. जसे की, पक्ष्यांचा थवा इतक्या शिस्तबद्धपणे अन्नाच्या शोधात कसा उडतो? त्यांचं नेतृत्व आणि नियंत्रण कोण करत असेल? मासे इतक्या शिस्तबद्धपणे पाण्यात कसे पोहतात? आपण कधीच उडणाऱ्या पक्ष्यांचा अपघात का अनुभवला नाही? कारण निसर्गाने इतर प्राण्यांना मानवापेक्षा अधिक नैसर्गिक बुद्धिमत्ता प्रदान केली आहे. अशाच नैसर्गिक बुद्धिमत्तेच्या संदर्भातून कृत्रिम बुद्धिमत्तेचा जन्म झाला.

कृत्रिम बुद्धिमत्ता

संगणक आज्ञावली, जी क्लिष्ट निर्णय घेताना मानवाच्या आणि प्राण्यांच्या वागणुकीचे अनुकरण करते तिलाच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) म्हटले जाते. बघता बघता कृत्रिम बुद्धिमत्तेने सगळ्या क्षेत्रात शिरकाव केला असून, त्यातून वस्तू, उत्पादने आणि सेवा अधिक अद्ययावत झाल्या आहेत. आता हळूहळू एआयचा उपयोग अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेत आणि एकूणच शिक्षण क्षेत्रात सुरू झाला आहे.

एआयच्या वापरातून विद्यार्थ्यांसाठी अध्ययनप्रक्रिया सुलभ करता येईल. सगळ्यात पहिला अनुप्रयोग म्हणजे शिक्षणाचे वैयक्तिकरण. वर्गातील तीस ते साठ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांचे आकलन करणे एका शिक्षकाला अत्यंत अवघड आहे. कारण प्रत्येक विद्यार्थी हा जन्मतः वेगळे व्यक्तिमत्त्व आहे. प्रत्येकाला एक वेगळी सामाजिक, आर्थिक आणि मानसिक पार्श्वभूमी आहे.

शिक्षणप्रक्रियेतील वापर

एआयच्या वापराने प्रत्येक विद्यार्थ्याचे सामर्थ्य आणि दुर्बलता, अध्ययनातील गती यांचा विचार करून शिक्षण देता येईल. प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययनाची शैली आणि त्याला अवगत असलेले ज्ञान, यांवर आधारित शिकवणी आणि मदत देण्यास एआय उपयोगी ठरेल. मूल्यांकनातून शिक्षकांना योग्य अभिप्राय मिळविण्यासाठी एआय लागू पडेल. उदाहरणार्थ, अनेक विद्यार्थ्यांनी एखाद्या विषयाच्या परीक्षेत लिहिलेल्या उत्तरांच्या विश्लेषणावरून तो विषय त्यांना नीट समजलाय की, नाही ह्याची माहिती एआय शिक्षकांना देऊ शकते.

ज्यावरून शिकविण्याची पद्धत/शैली, वेग आणि अध्यापनातील साधने यांत योग्य बदल करणे साध्य होईल. ‘जनरेशन झेड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पिढीला शिकवताना शिक्षकांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. काही विद्यार्थी अंतर्मुखी असतात. त्यांच्या चुकांबद्दल वर्गात दिलेला अभिप्राय त्यांना दुखवू शकतो. म्हणूनच अशा परिस्थितीत एआयआधारित प्रणाली शिक्षकांच्या मदतीला येईल.

विविध उपयोग

एआयचा उपयोग दिव्यांग विदयार्थ्यांसाठी साहाय्यक तंत्रज्ञान म्हणून अत्यंत कार्यक्षमतेने करून त्यांना न्याय देता येईल. जसे की, अंध विद्यार्थ्यांना एआय प्रणाली वाचून दाखवेल. त्यावर त्यांना प्रश्न विचारेल आणि त्यांनी दिलेली उत्तरे किती बरोबर आहेत हेही सांगेल. डिजिटल परीक्षांमध्ये एआयच्या वापराने अनेक फायदे साधता येतील. विद्यार्थांना कॅमेरा वापरून घरून परीक्षा देता येईल. ती सुरक्षित आणि अचूकही असेल.

परीक्षांसाठी एक विशिष्ट कालावधी ठरवता येईल. त्यात विद्यार्थाला वाटेल तेव्हा त्याच्या तयारीनुसार तो परीक्षा देऊ शकेल. यामुळे परीक्षा केंद्राचे वातावरण आणि तेथील तणावापासून विद्यार्थी मुक्त होतील. परीक्षांचे ओझे आणि त्यातून होणाऱ्या आत्महत्या ही एका सामाजिक समस्या बनली आहे, कदाचित एआयसारखे तंत्रज्ञान हा यावरचा उपाय असू शकेल. एआय प्रणालीच्या उपयोगाने इतर भाषा शिकणे अत्यंत सोपे होऊन जाईल. वाङ्‌मयचौर्य ही आजच्या काळात मोठी समस्या आहे. एआयच्या वापराने यावर चाप बसवता येईल.

विद्यार्थी हिताचा विचार

विद्यार्थ्यांची लेखन क्षमता आणि शब्दसंग्रह वाढवण्यासाठी एआयचा वापर सुरू झाला आहे. एआय प्रणालींचा उपयोग कार्यालयीन कामासाठी करून बरेचशे कागदी घोडे कमी करता येतील. शैक्षणिक प्रशासनात जसे की, वेळापत्रक तयार करणे, वर्गखोल्यांचे आणि प्रयोगशाळांचे योग्य उपयोजन, अभ्यासक्रमाचे नियोजन, वीज आणि पाणी यांचा योग्य वापर, माहितीचे विश्लेषण करून योग्य निर्णय घेणे, बसच्या वेळचे नियोजन या बाबींसाठी एआय अत्यंत उपयुक्त ठरेल. अशा प्रणाली सुरुवातीला खर्चिक असल्या तरीही तंत्रज्ञानाच्या विस्तारानुसार त्या किफायतशीर होतील, पण शिक्षकांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा जास्तीत जास्त वापर विद्यार्थ्यांच्या हितासाठी कसा करता येईल, याचा नक्की विचार करावा.

(लेखक ‘एमआयटी’च्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संकुलात सहयोगी अधिष्ठाता आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.