शिस्त आणि व्यायामाचे महत्त्व

मित्रांनो, अभ्यासातील शिस्त, प्रामाणिकपणा आणि व्यायामाचे महत्त्व याबाबत आज आपण चर्चा करणार आहोत. इतरांचे बघून कोणीही या क्षेत्रामध्ये येऊ नये.
Importance of discipline
Importance of disciplinesakal
Updated on

- अविनाश शितोळे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक लेखक - द लॉजिक बूस्टर, द ॲनालिस्ट

मित्रांनो, अभ्यासातील शिस्त, प्रामाणिकपणा आणि व्यायामाचे महत्त्व याबाबत आज आपण चर्चा करणार आहोत. इतरांचे बघून कोणीही या क्षेत्रामध्ये येऊ नये. या क्षेत्रातील खाचखळग्यांची माहिती घेऊन, अभ्यासक्रम बघून, त्यासाठी लागणारा कालावधी ठरवून आणि आपण प्रामाणिकपणे आपल्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टींचा त्याग करू शकतो का? याचा विचार करूनच या क्षेत्रामध्ये पाऊल टाकावे, तरच तुम्ही या क्षेत्राला न्याय देऊ शकाल. प्रामाणिकपणे अभ्यास कराल. नाहीतर फक्त अभ्यासिकामध्ये इतर लोक वाचत आहे म्हणून तुम्ही वाचत आहेत, असे होईल.

आपल्या आसपास कोणत्या प्रकारचे लोक आहेत यावरून आपले व्यक्तिमत्त्व घडत असते. नकारात्मक विचारांचे लोक आपल्या जवळ असतील तर आपणही नकारात्मक होतो. त्यामुळे चांगले, अभ्यासू, सकारात्मक मित्र निवडा. त्यामुळे तुमच्या अभ्यासात शिस्त आणि प्रामाणिकपणा राहील. रोज थोडाच पण न चुकता अभ्यास करा. त्यात खंड पडू देऊ नका. काही विद्यार्थी रविवारी ऑफिशियल सुट्टी असल्यासारखे वागतात.यामुळे सातत्य राहत नाही. रविवारी अभ्यास करावासा वाटला नाही, तर रिव्हिजन करावी.

स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात एक वर्ष घालवल्यावर तुम्हाला तुमचे कच्चे दुवे समजायला लागतात. त्यावर काम केले की, यश मिळायला जास्त वेळ लागत नाही. याच काळात आपण खरोखरच ही परीक्षा उत्तीर्ण होऊ की नाही, हे आपल्याला समजायला लागते. त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहून पुढे वेळ द्यायचा की नाही, हे ठरवावे. लक्षात ठेवा, तुम्ही इतर कोणालाही फसवत नसून स्वतःला फसवत आहात. त्यामुळे अभ्यासात प्रामाणिकपणा आणि शिस्त आणा.

शिस्त विद्यार्थ्याला नियमितता राखण्यास मदत करते. गणितासारख्या सतत सरावाची आवश्यकता असलेल्या विषयांसाठी शिस्त खूप महत्त्वाची असते. शिस्त शांत आणि संयमित राहण्यास मदत करते. त्यामुळे योग्य वेळापत्रक राखण्यास मदत होते. शिस्त कामाच्या महत्त्वानुसार प्राधान्य ठरवण्यास मदत करते. शिस्त विद्यार्थ्यांचे निरोगी मन तयार करण्यास मदत करते. त्यामुळेच निरोगी शरीरही विकसित होण्यास मदत होते.

स्वयंशिस्त का असावी?

स्वयंशिस्त म्हणजे आत्म-नियंत्रण. नकारात्मक परिणाम होऊ शकणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा अस्वास्थ्यकर अतिरेक टाळण्याची क्षमता होय. स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात निवड झालेल्या अधिकाऱ्यांकडून आपण ऐकत असतो की, मी दिवसातून १०-१२ तास अभ्यास केला.

मात्र, एवढा वेळ एका ठिकाणी बसून अभ्यास करण्यास आणि मन एकाग्र ठेवण्यासाठी एवढी ऊर्जा येते कुठून? त्यासाठी महत्त्वाचा असतो तो व्यायाम आणि योगासने. दिवसभर ताजेतवाने, प्रसन्न आणि सकारात्मक राहण्यासाठी आपण आपल्या शरीरासाठी किमान एक तास दिला पाहिजे. त्यामुळे आपण शरीरासोबतच मानसिकरीत्याही तंदुरुस्त राहण्यास मदत होते.

व्यायामामुळे होणारे फायदे

स्मरणशक्ती सुधारते

संशोधनात असे सिद्ध झाले आहे की, व्यायामामुळे मेंदूमध्ये जी प्रथिने जातात त्यांमुळे स्मरणशक्ती सुधारण्यास आणि कार्यक्षमता वाढण्यात मदत होते. याचे कारण म्हणजे हिप्पोकॅम्पस - आपल्या मेंदूचे माहिती टिकवून ठेवण्याशी निगडित असलेले क्षेत्र, त्यामुळे तुम्ही परीक्षेसाठी उजळणी करत असाल किंवा एखादं व्याख्यान ऐकत असाल आणि त्याबरोबर तुम्ही नियमित व्यायाम करत असाल, तर तुम्हाला शिकणं अधिक सोपं होतं.

एकाग्रता

जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाल करता,तेव्हा मेंदूमधील रक्तपुरवठा अधिक सुरळीत होतो. यामुळे तुमच्या न्यूरॉन्सला ऊर्जा मिळते आणि पेशींच्या वाढीस प्रोत्साहन मिळते. विशेषतः हिप्पोकॅम्पसमध्ये ही प्रक्रिया होते. याचा अर्थ असा की, अभ्यासापूर्वी फक्त २० मिनिटे व्यायाम केल्याने तुमची एकाग्रता वाढू शकते आणि तुम्हाला तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात मदत होते.

मानसिकस्वास्थ्य

काही विशिष्ट प्रकारच्या शारीरिक हालचाली करून, तुम्ही तुमच्या एंडोर्फिनची पातळी वाढवू शकता. त्यामुळे मेंदू आणि पाठीच्या कण्याद्वारे तयार केलेले शरीरातील ‘फील गुड’ रसायन तुमचा तणाव कमी करते. तुमच्या मेंदूवर सकारात्मक परिणाम होतात. नियमित व्यायामामुळे तणाव कमी होतो.

ऊर्जेत वाढ

तज्ञांना असे आढळून आले आहे की, शारीरिकदृष्ट्या निरोगी असणे आणि उत्तम शैक्षणिक कामगिरी करणे याचा जवळचा संबंध आहे. याचे कारण असे की, व्यायामामुळे सर्जनशीलता आणि मानसिक उर्जा वाढते. व्यायामामुळे मन एकाग्र होण्यास मदत होते. शरीर निरोगी राहते आणि ऊर्जेत वाढ होत असल्याचे जाणवते.

ज्यांना असे वाटते की, त्यांना व्यायामाला वेळ देणे जमत नाही. त्यांना नंतर आजारपणासाठी वेळ काढावा लागतो. याबाबत आपण राकेश झुनझुनवाला यांचे उदाहरण देऊ शकतो. त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या भाषणात त्यांना पत्रकारांनी विचारले होते की, कोणत्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायची राहून गेली, असे तुम्हाला वाटते? त्यावर त्यांनी उत्तर दिले की, शरीरावर! या मुलाखतीनंतर ८ दिवसांतच त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यामुळे व्यायाम आणि शिस्तीला पर्याय नाही, हे लक्षात ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.