पुणे - ब्रिटनच्या विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळावा म्हणून ऋतुजाने सर्व पात्रता चाचण्या पार केल्या. आता तिला ऑगस्ट महिन्याच्या आत निकालाची गरज होती. शुक्रवारी (ता.२८) तिच्या अभ्यासक्रमाचा अर्थात बीबीएचा निकालही घोषित होतो. मात्र, नेमकं त्यातून तीच महाविद्यालय वगळले जाते. अन् तिच्या स्वप्नांवर पाणी फेरले जाते. केवळ ऋतुजा नाही तर अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य अडकलेल्या निकालांमुळे अंधारमय झाले आहे.
पदव्युत्तर अभ्यासक्रमांबरोबरच परदेशातील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑगस्ट महिन्यात प्रत्यक्ष निकालपत्र मिळणे गरजेचे आहे. पण कोरोनामुळे अजूनही शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले असून, उन्हाळ्यातील परीक्षा जून- जुलै महिन्यात पार पडत आहे. पर्यायाने निकालांना उशीर होत आहे. याचा थेट फटका विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशांना आणि करिअरला बसत आहे.
बीबीएच्या निकालामध्ये काही महाविद्यालयांचे निकाल राखीव ठेवल्याने अनेकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. विद्यापीठाने दिलेल्या विहित वेळेत अंतर्गत मूल्यमापन आणि उत्तरपत्रिका तपासणीचे गुणदान न झाल्यामुळे काही कॅप सेंटरचे निकाल अजून घोषित झाले नाही. पर्यायाने त्या महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे.
झालंय काय?
- बॅचलर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (बीबीए) अभ्यासक्रमांच्या काही महाविद्यालयांचे निकाल बाकी
- संबंधित महाविद्यालयांनी अंतर्गत गुणदान केले, मात्र कॅप सेंटरवरील गुणांची आकडेवारी विद्यापीठात पोचली नाही
- विहित वेळेत कॅप केंद्राकडून गुणांची माहिती न आल्याने, परीक्षा विभागाने पुढील निकाल पक्रियेस सुरवात केली.
- बहुतांश महाविद्यालयांचे गुण आल्यामुळे परीक्षा विभागाने निकाल घोषित केला
विद्यार्थ्यांचे प्रश्न..
- सर्वांचे निकाल घोषित झाले आमचे का नाही?
- आम्ही अभ्यास केला, परीक्षा दिली मग आमचा निकाल कुठे आहे?
- आमची चूक नसताना भुर्दंड आम्हाला का?
परीक्षा विभागाच्या संकेतस्थळावर निकाल घोषित झाला पण आमचाच निकाल नसल्याने सर्वांना धक्का बसला. थोडी चौकशी केल्यावर दोन टप्प्यात निकाल लागणार असल्याचे महाविद्यालयाने सांगितले. पण तोपर्यंत माझी पुढील प्रवेशाची मुदत आणि परदेशात शिक्षणासाठी जाण्याचे स्वप्नही संपते.
- विद्यार्थिनी
एका कॅप सेंटरवरील गुण उशिराने गेल्यामुळे विद्यापीठाने संबंधित विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवल्याचे समजते. आम्ही विद्यापीठाला लवकर निकाल लावण्याची विनंती करत आहोत.
- प्राचार्य (नाव न सांगण्याच्या अटीवर)
विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता लवकरात लवकर निकाल लावण्याला आमचे प्राधान्य आहे. संबंधित कॅप सेंटरने विहित मुदतीत आवश्यक गुणदान पाठविले नाही. त्यामुळे त्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहे. उर्वरीत ९५ टक्के विद्यार्थ्यांचे गुण आल्याने निकाल घोषित केला असून, यांचाही निकाल पुढील आठ दिवसात निकाल घोषित होईल.
- डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.