प्राण्यांचा डॉक्टर होणे हे सुद्धा उत्तम करिअर आहे. त्यासाठी शिक्षण हवे बीव्हीएस्सी अँड एएच, म्हणजेच बॅचलर इन व्हेटरिनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंडरी. बीव्हीएस्सी म्हणजे प्राण्यांचा तज्ज्ञ, जनावरांचा डॉक्टर. खासकरून प्राण्यांसाठी पालन, पोषण, उपचार आणि प्रजनन क्षेत्रात आवडीने काम करू इच्छिणाऱ्यांसाठी ही पदवी शास्त्रोक्त पद्धतीने कार्य करण्यासाठी चांगली आहे. हा बारावी सायन्सनंतर नियमित पूर्ण वेळ वैद्यकीय अभ्यासक्रम आहे. बारावी सायन्समध्ये पीसीबी ग्रुप आवश्यक असून ‘नीट’च्या परीक्षेतील मेरीटनुसार प्रवेश ठरतो. कोर्सचा कालावधी साडेपाच वर्षांचा असून, त्यात दहा सत्रे असतात. एक वर्षाची इंटर्नशिप असते. भारतात या कोर्सची सुमारे ५० महाविद्यालये आहेत.
शैक्षणिक पात्रता
बीव्ही एस्सी अँड एएच पदवीचे शिक्षण झाल्यानंतर पदव्युत्तर उच्चशिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉक्टर म्हणून अधिक व्यापकपणे करिअर सुरू करता येते. शेतीमधील जनावरे, पाळीव प्राणी यांच्या आरोग्यविषयीचे काम या प्राणीतज्ज्ञांना पाहावे लागते. त्यांचे आरोग्य, आजार, लसीकरण, आहार, प्रजनन समस्या आदी मोठी कामे या कार्यक्षेत्रात प्राणितज्ज्ञ (डॉक्टर्स ) करतात. परदेशात डीव्हीएम (डॉक्टर ऑफ व्हेटरिनरी मेडिसीन ) हा चार वर्षांचा कोर्स करता येतो. त्यासाठी ‘जीआरई’ची परीक्षा द्यावी लागेल. काही परदेशी विद्यापीठांमध्ये ‘जीआरई’ऐवजी मेडिकल कॉलेज ॲडमिशन टेस्ट (MCAT ) किंवा व्हेटरिनरी कॉलेज ऍडमिशन टेस्टचे गुण ग्राह्य धरले जातात. शस्त्रक्रिया हा सुद्धा कामाचा भाग असू शकतो. त्यासाठी सर्जरीमधील स्पेशलायझेशन असावे. व्हेटरिनरी वैद्यकीय अधिकारी यांची ही जबाबदारी असते. काही मंडळी आहार विषयातील तज्ज्ञ बनतात, तर काही प्राण्यांच्या केअर टेकिंग विषयात रस घेतात.
संशोधन संधी
प्राण्यांच्या आरोग्याविषयी सखोल संशोधन होणे अजून अपेक्षित आहे. या संदर्भात आवड असणारी मंडळी व्हेटरिनरी रिसर्चमध्ये मोठे करिअर करू शकतात. हे करिअर आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगले यश देऊ शकते. प्राण्यांसंबंधित असणाऱ्या मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, पॅथॉलॉजी, औषधनिर्माण आदी क्षेत्रात सुद्धा हे पदवीधर आणि उच्च पदवीधारक यांना नोकरीच्या संधी असतात. पोल्ट्री, मांस, दूध ही मोठ्या मागणीची कार्यक्षेत्रे आहेत जिथे प्राण्यांचे तज्ज्ञ डॉक्टर्स अपेक्षित असतात.
काही डॉक्टर्स श्वान, मांजर अशा पाळीव प्राण्यांवर उपचार करतात. त्यांचे स्वतंत्र क्लिनिक असते किंवा ते प्राण्यांच्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत असतात. भारतात शासकीय रचनेतून सुद्धा प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. काही डॉक्टर्स शेतात काम करणाऱ्या गुरांसाठी काम करतात. प्राणी आणि माणसे यांना एकमेकांपासून आजार उद्भवू नयेत म्हणून संशोधन आणि प्रतिबंधात्मक काम करणारे काही तज्ज्ञ डॉक्टर्स असतात. स्पर्धांसाठी असणाऱ्या घोड्यांना, तर आरोग्याच्या संवेदनशील शुश्रूषेची गरज असते.या क्षेत्रात काम करायचे असेल तर उत्तम संभाषणकौशल्य असायला हवे. ग्रामीण भागातील लोक, शहरातील मंडळी यांच्याशी संपर्क नीट करता आला पाहिजे.प्राण्यांविषयी प्रेम असले तरच हे काम नीट करता येईल.
स्पेशलायझेशन
प्राण्यांचे हृदयविकार, त्वचारोग, दातांचे आरोग्य, पचनसंस्थेचे विकार, सर्जरी आदी महत्त्वाचे विषय हाताळावे लागतात. त्यासाठीचे स्पेशलायझेशन करता येते. भारतात शासकीय रचनेतून कामाच्या संधी बीव्हीएस्सी पदवीधरांसाठी असतात. शासकीय रचनेच्या ताब्यात असलेले प्राणी, संरक्षण दलातील आणि पोलिस दलातील प्राणी खासकरून प्रशिक्षित श्वान, शेतीविभागाशी संबंधित प्राणी, प्राणी उद्यानातील जंगली प्राणी, अभयारण्ये, वन्यजीव विषयात काम करणाऱ्या संस्था याठिकाणी अशा पदवीधरांना कामाची संधी असते. काही मंडळी शिक्षक, अभ्यासक , संशोधक आणि प्रशिक्षक म्हणून सुद्धा काम पाहतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.