अभियंत्यांच्या प्रकारांपैकी आणखी एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे रासायनिक अभियंता. संगणक आणि स्थापत्य अभियांत्रिकीपेक्षा खूपच वेगळ्या प्रकारचे ज्ञान व कौशल्ये या अभियंत्यास लागतात. आपल्या दररोजच्या जीवनात आपण शेकडो प्रकारची वेगवेगळी रसायने वापरत असतो.
दात घासण्यासाठी वापरतो ती टूथपेस्ट, अंघोळीसाठी वापरतो तो व कपडे-भांड्यासाठी वापरतो तो साबण, स्वच्छतागृह साफ करण्यासाठी वापरतो ते फिनेल, स्वयंपाकाचा गॅस, ताप आल्यानंतर घेतो ते औषध, शाई, खडू अशी कितीतरी रसायने ही रसायन उद्योगातून तयार होतात.
मागणी
शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर लागणारी खते, औषधे, पाणी देण्यासाठी लागणारे पाइप्स ही सगळी रासायनिक उत्पादने आहेत. वाहने, कारखान्यांमधील यांत्रिक उपकरणे, घरातील उपकरणे आणि वस्तू यांसाठी लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे धातू आणि प्लास्टिक हीसुद्धा रासायनिक उत्पादनेच होत.
याशिवाय उद्योगांना लागणारे हायड्रोक्लोरिक ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिड, ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजनसारखे वायू ही सारी रासायनिक उत्पादनेच होत. कच्च्या मालापासून दैनंदिन जीवनावश्यक वस्तू तसेच उद्योग क्षेत्रासाठी रसायने बनविण्यासाठी चालणाऱ्या रसायन उद्योगांसाठी रसायन अभियंत्यांची गरज असते.
प्रयोगशाळेत प्रायोगिक तत्त्वावर तयार केल्या गेलेल्या रसायनांचे औद्योगिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी उपकरणांची निर्मिती करणे व दुरुस्ती-देखभाल हे त्यांचे प्रमुख काम असते. म्हणूनच त्यांना रसायनशास्त्र आणि अभियांत्रिकी या दोन्हीचे ज्ञान असणे आवश्यक ठरते.
संधी व जोखीम
पेट्रोलियम उत्पादने, खते, रंग उत्पादने, औषधे, दैनंदिन जीवनातील इतर रसायने यांची आवश्यकता कधीही न संपणारी आहे. आपले सगळे जीवन वेगवेगळ्या प्रकारच्या रसायनांनी व्यापून टाकलेले आहे. त्यामुळे रसायन निर्मिती कारखाने कधीच बंद पडणार नाहीत, किंबहुना लोकसंख्येबरोबरच त्यांची आवश्यकता ही वाढतच चालली आहे.
स्वयंचलित यंत्रांमुळे तांत्रिक मनुष्यबळाची आवश्यकता जरी कमी झाली असली, तरी अभियंत्यांची मात्र आवश्यकता कमी झालेली नाही. बाजारातील रासायनिक उत्पादनांच्या मागणीनुसार नोकऱ्यांचे प्रमाण मात्र कमी-जास्त होत राहते. तेजी-मंदी चालूच असते. असे जरी असले, तरी या क्षेत्रात चांगल्या अभियंत्यांना मोठी मागणी आहे. मात्र, रसायन उद्योग हा अतिशय जोखीम भरलेला उद्योग आहे.
रसायन गळतीमुळे अनेक जण मृत्युमुखी पडल्याच्या बातम्या आपण अधूनमधून वाचत असतो. भोपाळ वायू दुर्घटना ही देशातील सर्वात मोठी दुर्घटना होय. १९८४ साली मिथाइल आयसोसायनेट या रसायनाच्या गळतीमुळे युनियन कार्बाइड या कारखान्यातील कामगार आणि परिसरातील नागरिक मिळून सुमारे १५ हजार व्यक्तींचा मृत्यू झाला. हजारो लोक अंध-अपंग झाले. छोट्याशा चुकांमुळे मोठे अपघात घडू शकतात.
आव्हाने
या प्रकारच्या अभियंत्यांना त्यांच्या भूमिकेनुसार एकाच ठरावीक अथवा तीनही पाळ्यांमधे काम करावे लागू शकते. उत्पादनांचा निर्मिती वेग राखणे आणि उत्पादनांची गुणवत्ता राखणे हे अतिशय ताणाची गोष्ट असते. शिवाय या उद्योगांमधे नफ्याची टक्केवारी कमी असते. त्यामुळे अतिशय काटेकोरपणे काम करावे लागते. पूरक रसायने, पाणी आणि ऊर्जेचा कमीत कमी वापर करून नफा वाढविणे गरजेचे असते.
आर्थिक गुंतवणूक ही मोठी असल्याने उद्योगाची जोखीम आणखी वाढते. विशेष प्रकारच्या यंत्रांना आणि रसायन उत्पादनांना त्यातील तज्ज्ञ व्यक्तीच लागत असल्याने किंचितसा बाह्य घटकांवर अवलंबून असलेला हा उद्योग आहे. प्रदूषणाच्या समस्यांमुळे ही या प्रकारच्या उद्योगांवर अनेक प्रकारचे निर्बंध लादले जात आहेत. अशा परिस्थितीत पर्यावरणपूरक पद्धतीचा वापर करून उत्पादन करणे हे सध्याच्या काळातील एक आव्हान आहे.
रसायन उद्योग हे नेहमीच नागरी वस्त्यापासून दूर लांब असतात. त्यामुळे रोज काही तासांचा प्रवास करावा लागतो, याशिवाय सतत रसायनांच्या संपर्कात राहित्याने अभियंत्याच्या आरोग्याचेही प्रश्न निर्माण होऊ शकतात. असे जरी असले, तरी संपूर्ण देशाची आर्थिक परिस्थिती रसायन उद्योगांवर अवलंबून आहे. खरे तर देशाचे असणे व टिकणेच रसायन उद्योगांवर अवलंबून आहे. जोखमीने भरलेले जरी असले तरी हे कळीचे व आव्हानात्मक काम आहे. मग होणार ना रसायन अभियंता?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.